Wednesday, October 03, 2007

जाणीव

टायची गाठ सैल करत आनंदने सोफ्यावर अंग टाकले आणि अनिता ने आणलेला पाण्याचा ग्लास तोंडाला लावला... आजही तो दमला होता आणि आजही त्याला घरी यायला उशीर झाला होता. अनिताला काही हे नवे नव्हते. सारखे येणारे foreign delegations, त्यांच्याशी होणारया meetings, contracts, कंपनीत सांभाळावी लागणारी वरिष्ठांची मर्जी, ह्यातच आनंदचा दिवस रात्र एक व्हायचा. हे सारे अनिता जाणुन होती...

तेव्हढ्यात अमेयचा रडण्याचा आवाज आला आणि अनिता भानावर आली. अमेयला गेले दोन दिवस बरं नव्हतं त्यामुळे त्याची सारखी किरकिर सुरु होती. ती लगेच त्याला शांत करायला गेली कारण आता आनंदला घरी आल्यावर peace of mind हवा असतो हे तिला माहिती होतं. अमेयच्या रडण्याने त्याची अजुन चिडचिड झाली असती... तिला पुढे स्वयंपाकघरातलं काम सुद्धा दिसत होतं.

अनिता सुद्धा आनंद प्रमाणेच उच्चशिक्षित होती. पण अमेयच्या जन्मानंतर तिने काही वर्षे नोकरी सोडुन अमेय कडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला... त्याच सुमारास आनंदला कंपनीत बढती मिळाली पण बढती बरोबरच त्याच्यावरची जबाबदारी देखिल वाढली... त्यामुळे आनंदला आता अनिता आणि अमेय साठी वेळ काढणे कठीण व्हायला लागले होते...

जेवणं आटोपली आणि मागचं आवरुन अनिता आपल्या खोलित आली... अपेक्षेप्रमाणे आनंद laptop वर काम करत होता... आज अनिता खुपच वैतागली होती तिला पण वाटायचं की आपण आनंद बरोबर चार घटका बोलावं रोजच्या आयुष्यातलं काही बाही बारिक सारीक share करावं पण आनंदला वेळच नसायचा... शेवटी अनिता कंटाळली आणि डोळ्यांवर आडवा हात ठेवुन झोपी गेली...


Laptop
वर काम संपत आल्यावर आनंदने नेहेमीप्रमाणे mails check करायला सुरुवात केली... त्याची दुसरया दिवशीची foreign delegation सोबत असणारी meeting अचानक रद्द झाली होती. त्यामुळे त्याला दुपारनंतर चा वेळ मोकळाच होता. खुप दिवसांनी त्याला असा वेळ मिळणार होता. आणि त्याला एकदम लक्षात आले की किती दिवस त्याने अनिताशी मनसोक्त गप्पा मारल्या नव्हत्या... अमेयला प्रेमाने जवळ घेतले नव्हते की त्याच्याशी खेळला नव्हता... त्या तिघांनी एकत्र असा वेळच घालवला नव्हता. घरचं, बाहेरचं आणि अमेयचं करताना अनिताची होणारी तारांबळ त्याने पाहिली होती. आता झोपेतही तिचा चेहरा त्याला ओढलेला आणि थकलेला दिसत होता. आनंदला फारच अपराधी वाटू लागलं. त्याने मग ठरवलच की काही झालं तरिही आता उद्यापासुन चार दिवस रजा घ्यायची आणि मस्त बाहेर कुठेतरी फिरून यावं. अनितालाही तेव्हढाच बदल आणि आपण तिघे सोबत असु. हा विचार मनात आल्याबरोबर आनंदचा थकवा कुठल्याकुठे पळाला आणि त्याने हलकेच अनिताच्या चेहेरयावरची बट बाजुला सारली. त्याला उगाचच वाटु लागले की अनिताही झोपेत हळुच आपल्याकडे बघुन हसतेय...

Friday, September 28, 2007

मनाचिये गुंती

येता एकेक आठवण

जागे होती मृत क्षण

ताकदीने विलक्षण

प्रसन्न तर कधी सुन्न !


कधी कुणाचे ते बोल

कधी कुणाचा चेहरा

कधी कस्तुरी सुगंध

कधी मोराचा पिसारा !


आभासावर भास

खोल खोल जाई श्वास

मृगजळाची ही कास

जीव घेणारच खास !


काय होई ते नकळे

जसे जीवा लागे पिसे

सत्य आणि असत्यातील

कसे अंतर मिटले !


काहितरी करा

कोणितरी हे थांबवा

मनाचिये रोग

कोणि करेल का बरा?

आटपाट नगरात कोणी एक डोंबारी होता. घरी अठराविश्वे दारिद्र्य आणि त्यात बायको आणि तीन कच्याबच्यांची जबाबदारी... दिवसभर उन्हातान्हात, पावसापाण्यात तो डोंबारयाचा खेळ करत वणवण करायचा आणि लोकांचं मनोरंजन करुन मिळतील ते चार पैसे कमवायचा... संध्याकाळी घरी परतताना मिळाळेल्या चार पैश्यातून मिठ-मिर्ची घेउन तो जायचा तेव्हा कुठे घरात चुल पेटायची... दिवसभर राबल्यावर, संध्याकाळी बायको पोरांसोबत ओलंसुकं खाताना त्याला परत माणसात आल्यासारखं वाटायचं आणि त्याचा डोंबारयाचा मुखवटा पार गळुन जायचा...

एक दिवस असाच तो घरी परतत होता... दिवसभर वणवण करुन शरीर अगदी आंबुन गेलं होतं. शिवाय आज काहीच कमाई झाली नव्हती आणि त्याच्या डोळ्यांसमोर भुकेने केविलवाणे झालेले त्याच्या पिल्लांचे चेहरे दिसत होते... दु:खाने आणि निराशेने त्याचा रापलेला चेहरा पिळवटुन निघाला. त्याला असे बघुन त्याची बायको कावरीबावरी झाली आणि त्याचे रिकामे हात बघुन आज जेवण मिळणार नाही ह्याची मुलांना कल्पना आली आणि ते रडु लागले... पोटात पेटलेली भुकेची आग त्या चिमण्यांना शांत होऊ देत नव्हती... तो डोंबारी आणि त्याची बायको सुद्धा पोरांचं रडणं काही थांबवु शकले नाहीत... आणि एकाएकी तो डोंबारी उठुन उभा राहिला आणि त्याने आपला डोंबारयाचा खेळ सुरु केला... त्याच्या मुलांना हे सारे खेळ नवे होते... डोंबारयाच्या उड्या, त्याचे हावभाव बघुन पोरं आपली भुक विसरले आणि टाळ्या वाजवुन हसु लागले...तात्पुरता तरी भुकेचा प्रश्न सुटला होता...

आणि आयुष्याने त्याला माणसातुन परत डोंबारयात बदलले होते!!

Sunday, September 23, 2007

संवेदनशील आणि भिडस्त मनाने टिपलेले काही बरे वाईट अनुभव,

सामाजिक आणि वैयक्तिक जवाबदारीची पाळेमुळे खोलवर रुजलेल्या डोक्यात

अविरत चाललेले विचारांचे थैमान

आणि माझी सुरु असलेली धडपड!

मोकळे होण्याची!!

मनात साचलेले, दाटलेले share करण्याची...

पण विचारांची श्रीमंती शब्दांपुढे कंगाल ठरते!

समोरच्याला खुप काही सांगायचे असते,

मुखदुर्बळता असतेच आणि आता त्याला शब्ददुर्बळतेचा साज चढतो...

आणि अभिव्यक्तिचे सारे मार्गच खुंटल्यासारखे होतात.

मनात खुप असते पण ते व्यक्त करता येत नाही...

मनाची अक्षरश: कोंडी होते

आणि मग ही अवस्था

असहाय होऊन डोळ्यांतून वाहु लागते!

कोणी वाचु शकेल का मनाच्या पाटीवरली ही अक्षरे,

न उठलेली?

कोणापर्यंत पोहोचु शकतील का ह्या भावना

नि:शब्द आणि अबोल?

तुमच्यासोबत कधी असे होते का हो?

नाहीतर मीच वेडी म्हणायची...

आणि पुन्हा एकदा

एकला चोलो रे!!

Thursday, September 20, 2007

कळत - नकळत

नकळत कळते सारे

शब्दांची गरज नुरे

तव मनात जे जे दडले

ह्या मनास अलगद उमजे


सरसरत शिरवे येता

हा धुंद गंध दरवळतो

मृण्मयीन होउन जाता

जलदाला भानही विसरे

नकळत कळते सारे

शब्दांची गरज नुरे


हळुवार कळीस हा समीरण

स्पर्षाने फुलवत जातो

मोहक सुवासित मग ते

मुदे तयासंग डोले

नकळत कळते सारे

शब्दांची गरज नुरे


नाते असेच अपुले

हलकेच मुग्ध मोहरते

अबोल विश्वासाने

दृढ अन गहिरे होते

नकळत कळते सारे

शब्दांची गरज नुरे


तव मनात जे जे दडले

ह्या मनास अलगद उमजे!!

Sunday, September 09, 2007

पैलतिर

दुर्लक्षितच जगले

आता कोणि विचारले तरच नवल आहे

दुखावलेल्या मनाला

फुलापेक्षा काट्याचेच अप्रुप जास्त आहे


हळुवार भावनांचा

चुरडुन केर झाला

खोट्या मोहक हास्ये

नात्यांना जपायचे आहे


ह्या फसव्या दुनियेत

उभे आयुष्य ठाकले आहे

डोळे मात्र आताच

पैलतिरावर आहे...

Saturday, September 08, 2007

शब्द

शब्द कधि हसरे आणि नाचरे

रडताना हसवणारे,

शब्द कधि दु:खद आणि बोचरे

हसता हसता टचकन पाणी आणणारे...


शब्द कधि लाघवी कधि प्रेमळ

मायेची फुंकर घालणारे,

शब्द कधी कठोर आणि निष्ठुर

रेशिमबंध तोडणारे....


शब्द कधि उन्मत्त, कधि मस्तवाल

आपल्याच गुर्मीत गुरगुरणारे,

शब्द कधि लाचार आणि आश्रित

लाजेने झाकोळणारे...


शब्द कधि चकचकीत आणि साखर पेरलेले

फसवुन सख्य साधणारे,

शब्द कधि अबोल आणि मुग्ध

संयत अनुनय करणारे...


शब्द कधि खोटे कधि फसवे

खोल गर्तेत ढकलणारे,

शब्द कधि खरे आणि आश्वासक

गड्या कामाला लाग म्हणणारे...


शब्द कधि सख्खे आणि जवळचे

पण जवळच्यांना दुरावणारे.

शब्द कधि परके कधि दुरचे

पण हळुवार जवळिक जपणारे...


कधि सारे शब्द विसरुन

नि:शब्द असे जगायचे आहे

शब्दांच्याही पलिकडचे

शब्दांशिवाय जाणायचे आहे...

Monday, August 27, 2007

अशी ही बनवाबनवी!

भर दिवसाच्या उजेडात

कृष्णकृत्ये सुरु असतात;

डोळे मिटणारया मांजराला

सर्व लोकच आंधळे भासतात!


गुंड आणि शिपाई सुद्धा

लाचेपायी त्रस्त असतात;

एका हाताने घेउन

दुसरयाने देत असतात!


नेते मंडळींचा इथे

सुरु असतो वेगळाच खेळ;

पुढील निवडणुक येईपर्यंतं

आश्वासनांवरच निभते वेळ!


रात्र आणि दिवसामागुन

सुरु असतो हाच खेळ;

एकीला हाताशी धरुन

दुसरीशी ठरवली जाते वेळ!


बाहेरचे काय घेउन बसलात

घरात सुद्धा असेच असते;

आज नक्की करतो म्हणुन

उद्यावर ढकलले जाते!


शेवटी सगळे लोक हे

मांजराचीच जमात असतात

जाता जाता डोळसाला

चक्क आंधळं ठरवुन जातात!!

Friday, August 24, 2007

पत्रं

तु तिथे अन् मी इथे....

तु तुझ्या कामात व्यस्त आणि मी इथे अवघडलेली,

उदरात होणारी प्रत्येक हालचाल तुझ्या अस्तित्वाची जाणीव करुन देणारी,

तुला मात्रं अजुन पुरेशी sink in न झालेली!

दोघांचाही डोळा आहे उद्यावर पण संदर्भ वेगळे,

प्रत्येकचजण शोधतयं आकाश आपले मोकळे...

माझं जग, माझी Identity, माझी space’, तुझे लाडके शब्द,

तुझ्याच असणारया मला करतात सतत विद्ध!

तुझ्या कविता वाचुन जग तुझ्या जवळ आले

मी मात्रं प्रेमाचे दोन शब्द वाचायला आसुसले!

फार काही अपेक्षा नाही एकच मागणे मागते

वेळात वेळ काढुन मला लिहिशील का दोन ओळी?

Tuesday, August 21, 2007

वळणावरचे दोघे

एकमेकांवर निर्व्याज प्रेम करणारे ते दोघे

आयुष्याच्या एका वळणावर...


तो जिब्रान जाणणारा,

ती फुलराणी त रमलेली...


त्याचे सारेच अफाट आणि भव्य,

ती छोट्या सुखांनी हरखणारी...


त्याला ध्यास नाविन्याचा,

ती गोधडिची ऊब जपणारी...


तो घर पसरवणारा,

अन् ती ते सावरणारी...


तो आकाशाला गवसणी घालणारा,

ती मुठितील निसटणारी वाळू धरू बघणारी...


आयुष्याच्या एका वळणावर,

उभे ठाकलेले ते दोघे...

Wednesday, January 31, 2007

उगाचच...

आज उगाचच खुप छान वाटते आहे...
अनपेक्षितपणे भरून आलेले काजळमाखले आभाळ आणि सातभाईंची उडालेली गडबड...
एकाएकी सुरु झालेला,निलगिरी,आंब्याच्या गर्द झाडीत उनाड पोराप्रमाणे शिळ वाजवणारा, आणि पानगळतीचे निमित्त साधुन डोक्यावर पर्णवर्षाव करणारा तो खोडकर वारा...
वारयाच्या साथीने अलगद आपल्याभवतीच फेरया मारणारे धुलिकणांचे लोट...
रिमझिम चे संकेत मिळताच डौलात नाचणारे फुलारलेले, पिसारलेले मोर...
हळुवार आलेली पावसाची सर आणि तिच्या पाठोपाठ बेभान होउन आलेला ओल्या मातीचा सुगंध...
आज उगाचच खुप छान वाटते आहे...

Friday, January 26, 2007

Spice

मला नेहमी विचारला जाणारा प्रश्न... काय करतेस तु घरी दिवसभर? तुला कंटाळा येत नाही? येत जा की संध्याकाळी कट्ट्यावर... आम्ही मस्त गप्पा मारतो, टाइमपास करतो, मजा येते...इति आमच्याच शेजारच्या काही बायका... काही नवपरिणीत, तर काही सासुपदाला 'पोचलेल्या' अश्या सर्वच वयोगटातील...माझी नुकतीच परीक्षा संपली होती, म्हणुन विचार केला की एवढा आग्रह होतो आहे तर जाउया जरा... कुणास ठाउक, खरच मजा येइल ...

म्हणुन गेले एका संध्याकाळी. पण तिथे गेल्यावर माझा विरसच झाला... कुणाचं लफडं कुणासोबत आहे, कुणाचा नवरा कोणाच्या बायकोवर लाईन मारतो, आज कुणाचं भांडण झालं? अश्या अनेक ताज्या विषयांवर चर्चा सुरु होत्या... मला पण बरेच प्रश्न विचारण्यात आले, पण मला मुळात gossip करायला आवडत नसल्यामुळे बहुतेकांची उत्तरे मला माहिती नव्हती... त्या बायकांची प्रचंड निराशा झाली... मला म्हणायला लागल्या काय गं तु अशी, तुझ्याजवळ काही spice च नाहिये... काय करते दिवसभर घरी राहुन कुणास ठाउक... दोन माणसं तर आहेत घरी.एवढं काम तरी काय असतं? काही कसली माहिती नसते आणि 'माहिती काढण्यात' काही interest पण नसतो...

घरी आल्यावर मी जरा विचारातच पडले... खरच आपल्यामधे, आपल्या आयुष्यामधे काही spice नाही का?

पण विचार करता करता मला जाणवु लागलं की अभ्यास आणि घरकाम झाल्यावर उरलेल्या फावल्या वेळात चांगलं वाचन करणे, शेजारच्या चिमुरडिला origami शिकविणे, कागदातुन एक नवं विश्व साकारल्यावर, तिच्या चेहेरयावरची,आश्चर्यचकित आणि आनंदी,कुतुहल मिश्रित भावांची रंगपंचमी बघणे, त्याला आवडते म्हणुन त्याच्या आवडिचा पदार्थ करणे आणि त्याने दाद दिल्यावर मनातल्या मनात गिरकी घेणे, अंगणात रोज येणारया मोराला खायला घालता घालता त्याच्याशी उगाचच पोरकट बोलणे आणि त्याने आपले पिस टाकले की ते त्याची आठवण म्हणुन जपुन ठेवणे... ह्या सारया गोष्टी म्हणजेच माझ्या छोट्याश्या आयुष्यातला spice आहे... हे सर्व नसेल तर मात्र खरच माझं जगणं बेचव होईल... हे देवा, माझ्या लहानश्या आयुष्यात, निरागसपणा असाच भरभरुन वाहु दे, हीच तुला प्रार्थना...

Saturday, January 20, 2007

Then Almitra spoke again and said, And what of Marriage, master?

And he answered saying:

You were born together, and together you shall be for evermore.

You shall be together when the white wings of death scatter your days.

Aye, you shall be together even in the silent memory of God.

But let there be spaces in your togetherness.

And let the winds of the heavens dance between you.Love one another, but make not a bond of love:

Let it rather be a moving sea between the shores of your souls.

Fill each other's cup but drink not from one cup.

Give one another of your bread but eat not from the same loaf.

Sing and dance together and be joyous, but let each one of you be alone,

Even as the strings of a lute are alone though they quiver with the same music.Give your hearts, but not into each other's keeping.

For the only hand of life can contain your hearts.

And stand together yet not too near together

For the pillars of the temple stand apart,


And the oak tree and the cypress grow not in each other's shadow.

......................................................................................................................

Kahlil Gibran - Book One

Monday, January 15, 2007

आज बरेच दिवसांनी मी आजारी पडले... उत्तरेतल्या कडाक्याच्या थंडीत निरनिराळ्या चवदार पदार्थांवर ताव मारत मी बहुदा माझ्या पचनशक्तिवर जरा जास्तच ताण दिला असावा... त्याचा परिणाम आज पहाटेपासुन दिसुन आला ... जुलाब आणि उलट्यांनी मी त्रस्त झाले आहे, पण मी खुश आहे... कारण मी आजारी आहे... आजारी पडण्यात पण एक वेगळाच आनंद असतो... आज मी चक्क सकाळी कधी नव्हे ते अकरा वाजता झोपुन उठले... वर्तमानपत्र, दुध, पाणी, औषध इ.इ. सगळ हातात... आज स्वयंपाक पण करावा लागला नाही... वाह वाह...

असं अधुन मधुन आजारी पडायला हवं... ( त्याचं एक कारण असही आहे की घरच्या पुरुषांना तेव्हा बाई ची किंमत कळते... एरव्ही सगळा आनंदी आनंदच असतो... घर की मुर्गी दाल बराबर ... I know समस्त भगिनी वर्गाचा मला इथे support मिळणार आहे ;-) ) असो...

तर आज सकाळपासुन मी माझं आजारपण enjoy करते आहे... ( on serious note I hope this doesnt last long... otherwise it would be exactly contrary to the enjoyment... ;-) )

Anyways... आजचा दिवस तर मी मजेत घालवणार आहे... आज मला माझ्या साठी वेळच वेळ आहे... किती दिवसांपासुन खलिल जिब्रान चं पुस्तक मला खुणावतयं... आज नक्कीच मी त्याच्याशी संवाद साधणार आहे... आणि पण बरयाच गोष्टी करायच्या आहेत... सगळ्या जरी पुर्ण नाही झाल्यात तरी काही गोष्टी तरी नक्कीच करता येतील... उरलेल्या पुढच्या आजारपणासाठी due...

मग तुम्ही काय विचार करताय.. उचला पेन आणि यादी करायला घ्या की आजारी पडल्यावर काय काय करायचयं म्हणजे आजारी पडल्यावर विचार करण्यात वेळ न घालवता तुम्हाला तुमची आवडती गोष्ट लगेच करता येईल...

एक मात्र नक्की की आजारी पडण्यात सुख असतं !!!

Enjoy you all आजारी people out there... Cheers...

Wednesday, January 03, 2007

काल रात्री झोपताना आई ने दिलेली गोधडी पांघरली...

एवढी मउसुत आणि हळुवार! जणु काही आईच अंगावरून अलगद हात फिरवत होती...
काय नव्हते त्या मृगजळ स्पर्षात... प्रेम, काळजी, माया आणि बरेच काही...
तिव्रतेने तिची आठवण आली पण शेकडो मैल दूर असलेली मी अर्ध्या रात्रीच्या काळोखात आठवणींचा झरा वहावण्या पलिकडे काहिच करु शकले नाही...
तिच्या प्रेमाची ऊब अनुभवत मी परत बाळ झाले होते...

माझे वाहणारे डोळे आणि पाठीवरून फिरणारा तिचा हलका कापरा हात... ह्यातच सारी रात्र सरली...

I miss you aai ...

कितने अजीब रिश्ते हैं यहां पे

दो पल मिलते हैं साथ साथ चलते हैं
जब मोड आयें तो बचके निकलते हैं

कितने अजीब रिश्ते हैं यहां पे !!

;;