Friday, August 14, 2009

स्कॅंडिनेविया - 1

मॉस्को - सेंट पिटर्सबर्ग

23 जुलै ला प्रवासाला सुरुवात करायची हे नक्की ठरले आणि आम्ही तयारीला लागलो. हातात अवघा दिड दिवस होता. 21 ची संध्याकाळ / रात्र आणि 22 चा पुर्ण दिवस. तेवढ्या वेळात सामान एकत्र करुन भरणे जरा धावपळीचेच झाले कारण बर्‍याच गोष्टी बाहेरुन विकत आणायच्या होत्या. विकत आणलेल्या वस्तु, कपडे, खाण्याच्या वस्तु, हाताशी असलेली बरी म्हणुन घेतलेली आमची औषधे, लेकीची औषधे, गरम कपडे , पादत्राणे, लेकीचे खाण्याचे हाल नको म्हणुन मग वरण भातासाठी डाळ तांदुळ (पाठोपाठ सगळे मसाले आलेच :-) ) शिजवायला राईस कुकर, असं करत करत सामान वाढतच गेलं आणि हा ढिग झाला. मनात जरा धाकधुकच होती की एवढं सामान बघुन नवरा नक्कीच ओरडणार पण अहो आश्चर्यम नवरा म्हणला 'आपलीच गाडी आहे मग काय हवं ते घे. शेवटी प्रवास सोयीचा आणि सुखकर व्हायला हवा'. झालं मग काय माझ्यातली सुगृहिणी जागृत झाली आणि मी सामानाच्या त्या ढिगात चारदोन गोष्टी अजुन घातल्या.

मनासारखे आणि गरज असलेले व नसलेले ( गरज नसलेल्या वस्तु कुठल्या हे घरी परत आल्यावर कळले :-) ) सामान जमवुन 22 च्या रात्री 2 वाजता आमचं गाठोडं बांधुन तयार झालं आणि रामप्रहरी सहा वाजता प्रवासाला सुरुवात करायची असे ठरवुन पहाटे पाच चा गजर लावुन आम्ही निश्चिंत मनाने गाढ झोपी गेलो. गजराने आपले काम चोख बजावले होते, पाच वाजता त्याने उठा उठा म्हणुन ठणाणा केला पण 10 मिनिटात उठतो असे सांगुन नवर्‍याने त्याला गप्प केले आणि अशी काही साखरझोप लागली की सरळ सकाळी सात वाजता जाग आली. मग पळापळ, धावाधाव, आरडाओरडा, एकमेकांवर चिडणे, आरोप प्रत्यारोप करणे असे सगळे प्रकार करुन आणि उरलेल्या वेळात आन्हिकं आवरुन 9 वाजता आम्ही प्रयाण केले.

आम्ही निघालो तोपर्यंत मॉस्को च्या रहदारीने चांगलेच बाळसे धरले होते त्यामुळे मॉस्को च्या बाहेर पडायला आम्हाला दुप्पट वेळ लागला. नंतर चा प्रवास मात्र छान झाला. मधे मधे रस्ता दुरुस्तिची कामं पुण्याची आठवण करुन देत होती. तेवढे वगळुन संपुर्ण रस्ताभर हिरवीगार शेतं, रंगीवबेरंगी फुलं, हलकेच खळाळत हसणार्‍या तब्बल 12 छोटुकल्या नद्या आणि गर्द हिरवी घनदाट जंगलां नटलेल्या निसर्गराजाने आम्हाला सोबत केली. वाटेत ट्रेन चे दोन डबे जोडुन एक मस्त उपहारगृह केलं होतं. ते बघुन मजाच वाटली.

प्रवासात आमचे आणि कॅमेर्‍याचे तोंड अखंड सुरु होते. निरनिराळे चिप्स, छान छान चवीचे फळांचे रस, सॅंडविच असा सगळा खाउ आम्ही गट्टम करत होतो आणि आमचा कॅमेरा जे जे सुंदर दिसत होते त्यांना टिपण्यात मग्न होता. माझ्या माकड उड्या सुरु होत्या. कधी नवर्‍यासोबत पुढे तर कधी लेकी बरोबर मागे. कधी नवर्‍याला सोबत तर कधी लेकीला. मज्जा आली. लहानपणी झाडावर चढुन एका फांदी वरुन दुसर्‍या फांदीवर उडी मारायचे त्याची आठवण झाली. पाच तास सलग गाडी चालवुन नवर्‍याला जरा कंटाळ आला होता, गाडीत पेट्रोल ही भरायचं होतं आणि आम्हालाही रेस्टरूम ला जायचं होतं. तसं एक छानसा पेट्रोल पंप बघुन आम्ही गाडी थांबवली. इथे शहराबाहेरचे पेट्रोल पंप खुपच देखणे असतात. निसर्गरम्य ठिकाणी बांधतात. आणि तिथेच सगळ्या सोयी सुविधा असतात. स्वच्छ आणि प्रशस्त रेस्टरूम्स, एक छोटसं स्टोअर आणि छोटेखानी पण अतिशय स्वच्छ आणि बर्‍यापैकी पदार्थ असलेले उपहारगृह. आणि बरेच ठिकाणी बाहेर बाकडी टाकलेली असतात. एकदम ढाब्याचा फील येतो. प्रदुषण मुक्त गार झुळकांत उन्हाची ऊब घेत आणि वाफळत्या कॉफिचे घोट रिचवण्यात वेगळिच मजा येते. या पेट्रोल पंपावर आम्ही साधारण तासभर घालवला. मस्त मजा आली. उपहारगृहातील पीटर ने तर अफलातुन कॉफी बनवली होती. छान तरतरीत होउन आम्ही पुढे निघालो.

यथावकाश 722 किमी अंतर 9 तासात पुर्ण करुन संध्याकाळी 6 वाजता आम्ही सेंट पिटर्सबर्गमधिल आमचे वास्तव्य असणार्‍या हॉटेल ला जाउन पोचलो. नवर्‍याचा खुप जवळचा एक मित्र सुद्धा ऑफिस च्या कामानिमित्त तिथेच राहायला होता. आम्ही 3 वर्षांनी भेटत होतो. मग काय त्या संध्याकाळी आम्ही धमाल केली. रात्री तंदुरी नाईट्स ला भारतीय जेवण जेवलो ( जेवण ठिकठाकच होतं पण अनेक दिवसांनी बाहेर भारतीय जेवण जेवलो त्याचच अप्रुप ) आणि दुसर्‍या दिवशीची आखणी करण्यात कधीच मध्यरात्र झाली.

Wednesday, August 05, 2009

खरचं शिर्षका सारखचं होतं ते सगळं अगदी. चित्रवत, अद्भुत आणि निसर्गरम्य...

स्कॅंडिनेविया च्या ट्रिप ला जायचे असे बरेच दिवसापासुन नवर्‍याच्या डोक्यात घोळत होते. आणि मुळातच भटकायला आवडणारी मी त्याच्या विचाराला जमेल तसे खतपाणि घालत होते :). तर तिथे जायला हवं ते उन्हाळ्यातच. पण सुरुवातच झाली ती सुट्टी मिळेल की नाही ह्या शंकेने. नवर्‍याच्या ऑफिस मधे एकाची बदली ड्यु होती. आणि त्याच्या जागी नवा माणुस यायचा होता. त्या दोघांची ऑफिशियल जबाबदारी नवर्‍याची असल्यामुळे त्याला सुट्टी मिळायची सुतराम शक्यता नव्हती. पण हे बदली प्रकरण विमानाची तिकिटे न मिळाल्यामुळे पुढे ढकलले गेले आणि आम्हाला ट्रिप प्लॅन करायला उत्साह आला. थोडिफार माहिती काढुन ठेवली आणि व्हिसा साठी अप्लाय करणार त्याच दिवशी नवर्‍याच्या असिस्टंट ची गर्भार बायको थोडी गुंतागुंत झाल्यामुळे हॉस्पिटल मधे ऍड्मिट झाली. त्यामुळे ती जोवर पुर्ववत होत नाही तोवर व्हिसा साठी अप्लाय करायचं नाही असं आम्ही ठरवलं. त्यात काही दिवस गेलेत.

नंतर सगळं ठिक सुरु आहे बघुन आम्ही व्हिसा साठी अप्लाय केला. पण व्हिसा मिळाला आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी ऑफिस च्या कामाने तातडिने नवर्‍याला बाहेरगावी जावे लागले. काम ठरलेल्या वेळेत संपले तर ठिक नाही तर अनिश्चित कालावधी साठी नवर्‍याला तेथे रहावे लागणार होते. पण तिसर्‍याच दिवशी नवरा परत आला आणि आम्ही लगेच दोन दिवसाने जाण्याचे ठरवले. आता एवढ्या वेळेवर आम्हाला रहायला जागा मिळेना त्यामुळे आम्हाला आमच्या प्लॅन मधे फेरफार करावे लागले. कोपेनहेगन ला जाण्याचे रद्द केले आणि बाकिची ट्रीप रिशेड्युल केली. आम्ही कारनेच जाणार होतो त्यामुळे बाकी तिकिट बुकिंग चा प्रश्न नव्हता. त्यामुळे शेवटी जायला मिळेल की नाही हा बरेच दिवस सुरु असलेला गोंधळ एकदाचा संपला आणि आम्ही 23 जुलैला सकाळी प्रयाण केले. मॉस्को - सेंट पीटर्सबर्ग - हेलसिंकी - स्टॉकहोम - ग्योतेबर्ग - ओस्लो - वॉस - स्टॉकहोम - हेलसिंकी - सेंट पीटर्सबर्ग - मॉस्को असा एकुण प्रवास जवळपास 4,500 किमी होता.

सगळा प्रवास छान झाला आणि छोटीने पण त्रास दिला नाही. मस्त मजा आली. खुप फिरलो, खुप फोटो काढले, पायाचे तुकडे पडेपर्यंत चाललो आणि मस्त तुडुंब खाल्लं सुद्धा. कालच आम्ही परत आलो. पुढिल लेखांमधे आम्ही कुठे कुठे फिरलो, कुठले फोटो काढले, काय खाल्लं सगळं सविस्तर लिहीन. आता मात्र पाटी टाकते. खुप दमायला झालं आहे आणि अशक्य झोप येते आहे. तोपर्यंत तुम्ही स्कॅंडिनेविया ची माहिती इथे वाचु शकता.

;;