Thursday, July 09, 2009

मराठी की इंग्रजी?

मराठी की इंग्रजी...मराठी की इंग्रजी...सध्या ह्या विचाराने डोकं भणभणायला लागलं आहे...

आत्ता कुठे माझी पोर बोबडे बोल बोलु लागली ( वय 1 1/2 वर्षे ) आणि हौसेने आम्हीही तिला चित्रांचं पुस्तक आणुन 'तो बघ काऊ , ती बघ चिऊ, हा वाघोबा बरं का..असे काही बाही शिकवायला लागलो. पण थोड्याच दिवसात लक्षात आलं की पुढे वर्ष दिड वर्षाने जेव्हा शाळेत ऍडमिशन साठी इंटरव्यु होइल तेव्हा हे काऊ, चिऊ आणि वाघोबा कामी येणार नाही... तेव्हा तिला A for Apple हेच उत्तर द्याव लागेल.


झालं हा विचार जेव्हापासुन डोक्यात आला तेव्हापासुन सारखं वाटतं की मराठीत शिकवायचं की इंग्रजीत शिकवायचं? आम्ही परदेशात जरी राहात असलो तरी घरी पुर्णपणे मराठी वातावरण आहे आणि घरी बोलतो पण मराठीतच. त्यामुळे आताकुठे लेकिची मराठी भाषेशी ओळख व्हायला सुरुवात झाली आहे तर लगेच दुसरी भाषा तिच्यावर लादणे कितपत योग्य आहे? ( ह्या वरताण म्हणजे शेजारी पाजारी तिच्याशी अजुन तिसर्‍याच भाषेत बोलतात :-) ) आणि पुढे तिच्या शालेय शिक्षणाचा विचार करता इंग्रजीत शिकवणेच योग्य ठरतं.

आम्हीसुद्धा आधि सगळं मराठीतच शिकलो पण आज दोघांनाही इंग्रजीची उत्तम जाण आहे. पण परत मनात असाही विचार येतो की समजा आज शिकवलं सगळं मराठीत तरी आमचं विंचवाचं बिर्‍हाड. आज इथे तर दोन / तिन वर्षाने अजुन कुठे. त्यामुळे शिक्षण पुढे उच्चशिक्षण हे सगळं इंग्रजीत होणार हे नियतीने आधिच ठरवलेले. मग अश्यात इंग्रजीत शिकवणेच योग्य. पण म्हणुन आपल्या मातृभाषेत शिकवायचं नाही का? मग तिला मराठी येइल कसे? परदेशात राहुन मोडकं तोडकं मराठी बोलणारे पण मराठी वाचता न येणारे, मराठीत बोललेलं कळणारे पण मराठीत बोलता न येणारे किंवा अजिबातच मराठी न येणारे अनेक लहान मुलं बघितली आहेत. आपली लेक तशी होउ नये असे मनापासुन वाटते.

हे सगळे विचार हल्ली डोक्यात गर्दी करतात. पण मला असं वाटतं की ही पण एक पासिंग फेज़ आहे. आपण नेटाने प्रयत्न केला तर तीला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषा निट अवगत होतिल. गरज आहे ती फक्त थोड्या संयमाची. बघुया पुढे काय होते ते :-) ...

;;