Tuesday, December 08, 2009

मन वढाय वढाय

काय करू अन काय नको असं झालंय. मन आनंदाने गिरक्या काय घेतंय, मधेच एखादी आठवण येऊन डोळे काय भरून येताहेत. काहितरी गमतीशीर आठवुन एकटीच हसतेय काय. काही विचारू नका.. का? मी जातेय माझ्या देशात. माझ्या भारतात. ओळखिच्या देशात, ओळखिच्या वातावरणात आणि ओळखिच्या भाषांत.

तेच ओळखिचे गंध, तेच ओळखिचे आवाज, तेच ओळखिचे आपुलकिचे स्पर्श सगळं पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी, अनुभवुन मनाच्या डबीत घट्ट बंद करून कधिही निसटू न देण्यासाठी.

आजीने बोटे मोडीत कडकडून काढलेली दृश्ट, बाबांचा डोक्यावरून फिरणारा हात, दादाने ओढलेले केस, आईने सुकली गं पोर माझी म्हणुन कुरवाळलेले गाल, आवडता पदार्थ केल्यावर सासुबाईंनी पाठीवर दिलेली शाबासकीची थाप, सासर्‍यांच्या फोटोशी केलेला मुक संवाद आणि माझ्याच मनात आलटुन पालटुन चालणार्‍या डायलॉग्स वर फोटोतीलच त्यांचं टिपीकल फौजी हसणं, एकमेकींचे ( सगळ्यांत चांगले )कपडे घालण्यासाठी वहिनीशी केलेली झटापट :) आणि नंतर गळ्यांत गळे घालुन वाटुन खाल्लेला एकच पेरू. हे सगळं सगळं मला परत भेटणार आहे.

प्रत्येकासाठी भेटवस्तु घेताना त्यांच्या सोबत घालवलेले असंख्य क्षण आठवणी बनुन मनाभोवती फेर धरताहेत. मग हे नको तेच घेऊया. छे! हा रंग तिला नाही आवडायचा. ही नक्षी किती सुंदर दिसेल नाही, असे निवांत चवीचवीने शॉपींग सुरु आहे.


सासुबाईंच्या खास फर्माईशी पुर्ण करण्यासाठी पाककृतींची सारखी उजळणी सुरु आहे. आणि दादाने माझे केस ओढल्यावर त्याचे क्रु कट असलेले केस हातात कसे पकडायचे ह्याची प्रॅक्टीस नवर्‍याच्या डोक्यावर सुरु आहे :). आणि थंडीमुळे बाबांच्या भेगाळलेल्या पायांना रोज रात्री कोकम तेल लावायचं बुकिंग ही आधिच करून ठेवलंय.

आई आवाजावरून जरा ( जरा बरं का आई ! :) ) दमल्यासारखी वाटतेय. तिच्यामधे नवा उत्साह भरण्यासाठी तिच्यासोबत बाहेर भरपुर भटकणार आहे आणि मनसोक्त खादाडी करणार आहे. आताच ऑर्कुट वर एका कम्युनिटी वरून बाहेर खायचे छान छान ठिकाणं उतरवुन घेतले आहेत :). चक्क लिस्ट केली आहे. नवरा कामात बिझी आहे म्हणुन नाहितर ही लिस्ट बघुन त्याने मला माझ्या वाढणार्‍या वजनावरून चांगलेच चिडवले असते :).


आणि हो ह्या सगळ्यांतुन वेळ काढुन मी तुम्हा सर्वांचे ब्लॉग्स देखिल वाचते आहे पण तुमचे ब्लॉग वाचता वाचता मन परत काहितरी आठवणींत हरवते आणि प्रतिक्रिया द्यायचीच राहते. त्याबाद्दल मोठ्या मनाने माफ करा बरं का :).

सकाळपासुनच माझं अतिशय आवडतं गाणं सतत गुणगुणतेय. मुळ कविता आहे कृ. ब. निकुंब ह्यांची आणि हे गाणं गायलं आहे सौ. सुमन कल्याणपुर ह्यांनी.



घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात!

"सुखी आहे पोर" सांग आईच्या कानात
आई भाऊ साठी परी मन खंतावतं!

विसरली का गं भादव्यात वर्सं झालं
माहेरीच्या सुखालागं मन आचवलं!

फिरून फिरून सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो!

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगनिया करी कशी गं बेजार!

परसात पारिजातकाचा सडा पडे
कधि फुलं वेचायला नेशिल तु गडे!

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय!

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला!

हे गाणं तुम्ही ऐकु शकता इथे...

;;