Saturday, September 08, 2007

शब्द

शब्द कधि हसरे आणि नाचरे

रडताना हसवणारे,

शब्द कधि दु:खद आणि बोचरे

हसता हसता टचकन पाणी आणणारे...


शब्द कधि लाघवी कधि प्रेमळ

मायेची फुंकर घालणारे,

शब्द कधी कठोर आणि निष्ठुर

रेशिमबंध तोडणारे....


शब्द कधि उन्मत्त, कधि मस्तवाल

आपल्याच गुर्मीत गुरगुरणारे,

शब्द कधि लाचार आणि आश्रित

लाजेने झाकोळणारे...


शब्द कधि चकचकीत आणि साखर पेरलेले

फसवुन सख्य साधणारे,

शब्द कधि अबोल आणि मुग्ध

संयत अनुनय करणारे...


शब्द कधि खोटे कधि फसवे

खोल गर्तेत ढकलणारे,

शब्द कधि खरे आणि आश्वासक

गड्या कामाला लाग म्हणणारे...


शब्द कधि सख्खे आणि जवळचे

पण जवळच्यांना दुरावणारे.

शब्द कधि परके कधि दुरचे

पण हळुवार जवळिक जपणारे...


कधि सारे शब्द विसरुन

नि:शब्द असे जगायचे आहे

शब्दांच्याही पलिकडचे

शब्दांशिवाय जाणायचे आहे...

;;