Friday, October 23, 2009

वासाचे घर

काल झी मराठी वर हसा चकटफू चा जुना भाग बघत होते... तो एपिसोड दीवाळी विषेश होता. त्यात एक सेल्समन फराळाच्या वेगवेगळ्या वासांचे परफ्युम्स विकत होता. जरा हटकेच कल्पना. तेव्हाच लक्षात आलं की आपल्या मनात / डोक्यात कितीतरी वास घर करुन असतात. दीवाळी च्या नुसत्या आठवणिनेच आपसुकच नाकाला फराळाच्या पदार्थांचे वास येऊ लागतात. मी लहान असताना आई मला विचारायची 'अगं रवा भाजल्याचा वास आला का गं?' किंवा 'बेसनाचा खमंग वास येतोय ना?' तेव्हा मी असायचे खेळत नाहितर दीवाळीचा होमवर्क पुर्ण करत. आणि आई फक्त मलाच विचारायची असं नाही तर त्यावेळेस घरात जो कोण असेल प्रत्येकाला विचारायची. आणि प्रत्येकाचा होकार आला की मगच तिचं समाधान व्हायचं. तिचं पदार्थ करण्याचं गणित असं बरेचदा वासावर अवलंबुन असायचं. तेव्हा मला तो प्रकार जरा गमतिशीर वाटायचा पण माझ्याही नकळत पुढे मी सुद्धा स्वयंपाक करताना वासावर काही गोष्टी ठरवु लागले.

असाच एक वास माझ्या मनात घर करुन बसलाय तो म्हणजे एका खोलीचा. बाबांच्या गावी आमचा खुप मोठा वाडा होता. त्यात एक प्रशस्त असे देवघर होते. जरासे अंधारे. पण तिथे मला खुप छान वाटायचे. एकप्रकारचा शांतपणा असायचा त्या खोलीत. आजोबा दररोज सकाळी तास दोन तास तिथे पुजा करायचे. मग उगाळलेलं चंदन, देवासमोर लावलेली मंद वासाची उदबत्ती, घरची ताजी खुडुन वाहिलेली मोगरा, गुलाब, कण्हेर, स्वस्तिक, जाई, जुई आणि चमेलीची फुलं, नुकतीच शांत झालेली समई आणि निरांजन, असा सगळ्यांचा मिळुन एक खुप छान प्रसन्न पण शांत, एक प्रकारचा गुढ गंभिरपणा असलेल्या वासाने ती खोली भरून जायची.

नव्या पुस्तकांचा वास कुणाला आवडत नाही? मी आणि दादा शाळा सुरु व्हायच्या आधी बाबांसोबत उड्या मारत जायचो नवीन वह्या पुस्तकं आणायला. तेव्हा अभ्यासाची ओढ कमी आणि त्या कोर्‍या वासाचेच आकर्षण जास्त असायचे. ती नवी कोरी न हाताळलेली पुस्तकं, त्यांना येणारा छापखान्यातील शाहिचा निसटता ओला वास, करकर वाजणारी नवी पानं आणि काही चिकटलेली पाने मिळाली तर खजिना सापडल्याचा आनंद. कारण ती चिकटलेली पाने सोडवायला मला आणि दादाला भयंकर आवडायचे आणि बरेचदा आमची त्यावरुन भांडणे पण झाली आहेत :) ... आई बाबांनी आम्हाला वाचनाची गोडी लागावी म्हणुन, वाचनालय चा निटस उच्चार सुद्धा करता येत नव्हता त्या वयापासुन आमच्यासाठी लहान मुलांच्या वाचनालयाची मेंबरशिप घेतली. तरीसुद्धा पुढे कधिमधी चंपक, चांदोबा, कुमार, कीशोर अशी नविन मासिक विकत आणली की सगळ्यात आधि मी त्या पुस्तकांचा भरभरुन वास घ्यायचे :).

मला आवडणारा आणि माझ्या मनात घर करून बसलेला असाच एक वास म्हणजे माझी आई जी उशी वापरते त्या उशीचा वास. त्या उशीला शिकेकाईचा मंद सुवास येतो. माझी आई अजुनही केस धुवायला शिकेकाईच वापरते. त्यामुळे तिच्या केसांना जसा शिकेकाईचा सुंदर वास येतो तसाच तिच्या उशीलाही येतो. आताही मी जेव्हा केव्हा माहेरी जाते मला आईच्या उशीवर डोके ठेवुन झोपायला खुप आवडते.

मला आणि बहुतेकांना आवडणारा असाच एक वास म्हणजे लहान बाळांचा वास. लहान बाळांना काय सुंदर वास येतो. नुकतेच न्हाऊ माखु घातल्याचा वास, मालिश केलेल्या तेलाचा वास, मऊ उबदार मलमलच्या कपड्यांचा वास, जावळाचा वास, मऊ मऊ हाताचा वास, आणि कळस म्हणजे जॉन्सन च्या पावडर चा वास. मन कितीही उदास झालं असेल, राग आला असेल, हताश वाटत असेल तरीही लहान बाळाला छातीशी घट्ट धरलं आणि भरभरून त्याचा वास आपल्या नाकात भरुन घेतला की कसं आश्वासक वाटतं. अनुभव घेतला नसेल तर नक्की घेऊन बघा मी काय म्हणते ह्याची कल्पना तुम्हाला येईल.

मला अजुन एक आवडणारा वास म्हणजे बैंगनफल्ली आंब्याचा. आता काही जण म्हणतील हा कुठला बरं आंबा? विदर्भातल्या लोकांना तर सांगायलाच नको. पण बाकिच्यांना हा आंबा कदाचित बदामी आंबा म्हणुन ठाऊक असेल. आम्ही खुप लहान असताना नागपुरला हापुस आंबा काही मिळायचा नाही. त्यामुळे आंबा म्हणजे बैंगनफल्ली असं समीकरण डोक्यात फिट्ट बसलं होतं. बैंगंफल्लीचा रस, मिल्कशेक, किंवा तोच रस आणि मिल्कशेक उरवून आता जात नाहिये मला म्हणुन गुपचुप फ्रिज मधे जमवलेलं आणि नंतर दादाला चिडवत चिडवत खाल्लेलं आईसक्रिम आणि कुल्फी, ते खाल्ल्यावर डेझर्ट कुलर च्या गारव्यात आईच्या जुन्या सुती साड्यांची पांघरलेली गोधडी आणि साखर(आंबा)झोपेत सरलेली रणरणती दुपार. अश्या बर्‍याच आठवणी ह्या आंब्याशी जोडल्या आहेत. पुण्याला येईपर्यंत तर मला हापुस आंबा अजिबात आवडत नसे. आता माझं मलाच खरं वाटत नाही. पण तेव्हा हापुस विरुद्ध बैगनफल्ली ह्या लढाईत बैंगनफल्ली साठी प्राणापलिकडे लढायची. मग हळुहळु हापुस वरचा राग ओसरला.असली हापुस आंब्याची गोडी कळली आणि हापुस आंबा माझा झाला. पण आजही कदाचित हापुस आणि बैगनफल्ली दोन्ही आंबे माझ्यासमोर ठेवले तर कदाचित माझ्या लहानपणिच्या सुवासाच्या आठवणी परत ताज्या करण्यासाठी कुणासठाऊक मी बैंगनफल्लीच उचलेन :).

आता मी तुम्हाला सांगेन तर तुम्ही हसाल पण मला ना पेट्रोल चा वास प्रचंड आवडतो. काही जण नाकं मुरडतील ही कसली आवड. पण खरच मला पेट्रोल चा वास खुप आवडतो. त्यामुळे मी लहान असताना जेव्हा केव्हा बाबा पेट्रोल भरायला जायचे तेव्हा मला जायचच असयाच त्यांच्या सोबत. बाबांना तेव्हा ही आवड काही माहिती नव्हती. आता हा लेख वाचल्यावर मात्र बाबांना कळेल की लहान असताना पेट्रोल भरायला जाताना का जायचा हट्ट करायची.


असे अजुन बरेच वास माझ्या मनात रुजले आहेत. आय आय टी मधे असताना सगळ्या मोसमात रस्त्यांच्या दुतर्फा भरलेल्या, फुललेल्या आणि लगड्लेल्या झाडांचा वास, शेजारच्या बेकरीमधे भाजल्या जाणार्‍या ताज्या ब्रेड चा वास, आजीने घातलेल्या आणि नाकाला झोंबणार्‍या लाल मिरचीच्या चुरचुरीत फोडणीचा वास, शेणाचा सडा घातलेल्या ओल्या अंगणाचा वास, नवर्‍याने रोज सकाळी पुजा केली की त्याच्या हाताला येणारा अष्टगंधाचा वास आणि असेच अनेक वास. लिहायला बसले तर प्रत्येकावर एक एक स्वतंत्र लेख होईल. पण तूर्तास इथेच थांबवते :). Wish you a fragranceful day ahead :).


फोटो - गुगल इमेजेस वरून.

;;