Monday, July 20, 2009

कालच काकुशी बोलणं झालं. बोलता बोलता काकु म्हणाली की आज पुडाच्या वड्या केल्या आहेत. आणि इकडे माझ्या जिभेवर पुडाच्या वड्यांची चव रेंगाळली. महेंद्रजींचं कालचं पोस्ट आणि नंतर काकुशी झालेलं बोलणं, माझं मन नकळत बालपणीच्या खादाडी च्या आठवणिंत रमलं.

तशी मी मुळची नागपुरची. ज़न्मगाव भंडारा पण सगळं बालपण आणि शालेय शिक्षण नागपुरात. दहावी नंतर मात्र वडीलांच्या बदली मुळे आम्ही पुण्याला आलो आणि तिथेच स्थिरावलो. पण अधुन मधुन नागपुरला जाणं होतंच. नागपुरला गेल्यावर पहिलं काम करायचं म्हणजे खादाडी चे प्लॅन्स ठरवायचे आणि ते अमलांत आणायचे. नागपुरला अश्या बर्‍याच जागा आहेत पण वेळेअभावी नेहेमीच सगळीकडे जाता येतं असं नाही. तरिही जास्तीतजास्त जागी जाता येइल असा प्रयत्न असतो.

माझी सगळ्यांत पहिली आवडती जागा म्हणजे पंचशिल टॉकीज जवळचं शांती भवन. मी दक्षिण भारतीय पदार्थांची अस्सल भक्त आहे. आणि शांती भवन मधे मिळणारे जवळ जवळ सगळेच दक्षिण भारतीय पदार्थ म्हणजे लाजवाब. गरम गरम, एकदम मउ आणि हलकी ईडली आणि त्यावर वाफाळता सांबार म्हणजे माझा जीव की प्राण. ईडली शिवाय तिथला दोसा, उत्तपा आणि मैसूर बोंडा पण मस्त असतो. शांती भवन ला जायचं तर सकाळी सकाळी नाश्ता करायला 07.30 / 08.00 पर्यंत. त्यावेळेस जी काही क्षुधाशांती होते ती केवळ अवर्णनीय. दुपारनंतर त्याच पदार्थांना सकाळसारखी चव नसते हे माझं मत.

शांती भवन खालोखाल नंबर लागतो तो धरमपेठेत वेस्ट हायकोर्ट रोडवर असणार्‍या साउथ इंडीया मेस चा. तिथला कुरकुरीत दोसा म्हणजे अहाहा. पण हल्ली तिथली चव पुर्वीसारखी राहिली नाही. असेच छान छान दक्षिण भारतीय पदार्थ मिळण्याची अजुन दोन ठिकाण म्हणजे नैवेद्यम आणि सिव्हील लाईन्स मधले ---स्वामी त्याचं पुर्ण नाव मला आठवत नाही पण तिथे उभं राहुन खावं लागायचं एवढं मला नक्की आठवतं. धरमपेठेत चौकातच नंद भंडार आणि त्याच्या थोडच पुढे राज भंडार नावाची दोन दुकानं आहेत. तिथे समोसा, कचोरी आणि साधा पेढा खुप छान मिळतो. सकाळी 8 / 9 वाजता आणि दुपारी 3 / 4 वाजता तिथुन गेलात तर समोसा आणि कचोरी तळण्याचे खमंग वास येतात. तिथुन थोडं पुढे गेलं की शंकरनगर चौकात संध्याकाळी ठेल्यांवर चटपटीत चाट आणि पाणिपुरी मिळायची. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली की बाबांसोबत मी आणि दादा जायचो तिथे चाट आणि पाणिपुरी खायला शिवाय येताना वाटेत दिनशॉ चं आइस्क्रीम खाल्ल्याशिवाय आमची खादाडी पुर्ण व्हायची नाही. आता तिथे ते ठेले आहेत की नाही माहिती नाही.

आनंद भंडार तर माझं अतिशय लाडकं. तिथे निरनिराळ्या बंगाली मिठाया खाल्ल्या की रसना कशी तृप्त होते. रसदार, तोंडात टाकल्याबरोबर विरघळणार रसगुल्ला असु दे नाहि तर त्याचिच बहिण चमचम. सोबतिला मऊ लुसलुशीत ताजे संदेश आणि मिष्ठी दोइ खावे तर तिथलेच. माझ्या (जुन्या) माहितीप्रमाणे त्यांच्या दोन शाखा आहेत. एक धरमपेठेत वेस्ट हायकोर्ट रोड्वर आणि एक सिताबर्डी वर. पुर्वी आनंद भंडार मधे फक्त बंगाली मिठाई मिळायची आता तिथे अनेक प्रकारचे स्नॅक्स पण मिळतात. आनंद भंडार सारखच अजुन एक ठिकाण म्हणजे हल्दिराम.हे देखिल धरमपेठ आणि सिताबर्डी दोन्ही ठिकाणी आहे. हल्दिराम आणि आनंद भंडार म्हणजे एकमेकांचे प्रतिस्पर्धी. एकाच एरियात असल्यामुळे आपल्याकडे गिर्‍हाइकांना कसे खुश ठेवता येइल आणि गिर्‍हाइक जोडुन ठेवता येइल ह्याकडे त्यांचे सतत लक्ष असते. त्याचा परिणाम म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला दर्जेदार पदार्थ प्रसन्न वातावरणात उपभोगता येतात. हल्दिराम मधे पेपर दोसा / मसाला दोसा, मऊ तरिही कुरकुरीत भटुरा आणि स्पाईसी छोले असं काय काय तुडुंब खाऊन झाल्यावर शेवटी हल्दिरामचाच रसरशीत मोतीचुर चा लाडु किंवा अनारकली नावाची बंगाली मिठाई म्हणजे सोने पे सुहागा.

असच अजुन एक ठिकाण म्हणजे सेमिनरी हिल्स जवळ टेकडीवर हनुमानाचं एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या पायथ्याशी असंख्य प्रकारचे समोसे, वेगवेगळ्या कचोर्‍या, आणि अनेक चट्पटीत पदार्थ मिळतात. पानाच्या द्रोणात गरम गरम चटकदार समोसा किंवा कचोरी खायला जी काही मजा येते ती शब्दातीत. फिरायला जाताना मंदिरात जाणे हा तर एक बहाणा असतो. खरं उद्दिष्ट्य असतं ते पायथ्याशी मिळणारा प्रसाद खाण्याचं :).

गणगौर च नाव घेतलं नाही तर खादाडीची ही सफर पुर्ण होऊच शकत नाही. गणगौर मधे मिळणारी राज कचोरी नुसती आठवली तरी तोंडाला पाणि सुटतं. सिताबर्डी सारख्या बाजाराच्या ठिकाणी असल्यामुळे इथे कायमच गर्दी असते. शिवाय जगत ची थाली, दिलीप कुल्फी, घुगरे ह्यांची कचोरी आणि तिच्यासोबत मिळणारी लाल चटणी आणि संत्रा बर्फी, सिताबर्डी मेन मार्केट रोडवर अपना बझार च्या गल्लिच्या कोपर्‍याशी मिळणारा चना जोर गरम, लोकमत बिल्डिंग च्या चौकात कोपर्‍यातल्या दुकानात (नाव आठवत नाही) मिळणारे चाट चे असंख्य प्रकार, धंतोलीत अहिल्यादेवी मंदीरात मिळणारे टिपीकल महाराष्ट्रियन पदार्थ.... अशि अजुन बरीच ठिकाणं आहेत त्यामुळे आता आवरतं घेते, खुप भुक लागली आहे. काहितरी खायला हवं :)

;;