Friday, December 08, 2006

संपता संपेना भय इथले अनामिक
कोळियाने विणले जाळे परि घट्ट किती ही विण

एक स्वच्छंदी पाखरू मौजेत उडे बागडे
अवचित दिसता रेशिम मोहात पडे बापडे

मऊसुत रेशिमावर पडे सूर्यकिरण अलवारं
पाखरास केले काबीज चमके सप्तरंगी ऊनं

त्या रंगीत रेशिमलडीस मोहुन पाखरू गेले
शिरताच रेशिमात त्यासी हे उलगडले

मार्ग आत शिरण्याचा असे इंद्रधनु मृगजळ
सुटकेचा मार्गच नाही केले कितीही यत्न

कोळियाने विणले जाळे पाखरू भुलुनी फसले
आकांत ऐकण्या त्याचा एकांती कोण असे?

संपता संपेना भय इथले अनामिक
कोळियाने विणले जाळे परि घट्ट किती ही विण
परि घट्ट किती ही विण!!

Hmmm... परत तोच प्रश्न... हे असे का होते?

आपल्या अवतीभवती असणारी, ज्यांना आपण आपली म्हणतो अशी 'आपली' माणसं. परिस्थिती, काळ, वेळ, माणसं अनुरूप नसता हक्काने आपल्यावर हक्क गाजवणारी माणसं. विश्वासाने खांद्यावर डोकं ठेवून रडणारी माणसं. आपणही त्यांना तत्परतेने खांदा पुरवतो. आपल्याला जमेल तसे, जमेल त्या पद्धतीने त्यांची समजुत घालतो. नवी दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतो. नवे जीवन, नव्या मार्गाने जगण्याची उमेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.अशा वेळेस बहुतांशी डोक्यात त्यांचाच विचार असतो की अरे असे केले तर त्याल बरे वाटेल, हे त्याला आवडते, हे त्याल रूचणार, अमुक तमुक केले तर त्याचा mood चांगला होतो इ.इ. अगदी बारीक सारीक बाबतीत ज्यांचा विचार केला जातो, अशी ही आपली माणसं

पण...

कालान्वये परिस्थिती, वेळ, माणसं बदलतात. favourable होऊ शकतात / होतात. तेव्हा ह्या आपल्या माणसांजवळ आपल्यासाठी वेळ नसतो. एकाएकी ते कामात व्यस्त होतात. आधिच्या परिस्थितीतही ते व्यस्त असतातच पण तेव्हा त्यांना सहवासाची गरज असते. नंतर नसते असे नाही पण बहुतेक तिव्रता कमी होते.त्यांना आता आधारासाठी खांद्याची गरज नसते. नवी दिशा स्वत: शोधण्याचे बळ त्यांच्यात आलेले असते. अशा वेळेला आपल्याकडे कळत नकळत दुर्लक्ष होते. पण नेमक्या ह्याच वेळेस त्यांनी आपल्या जवळ असावे असे मला वाटते. शरीराने नाही तर मनाने. मला आजही हात समोर करावासा वाटतो पण अश्रु पुसायला, मदतील नाही तर, पाठीवर कौतुकाची थाप मारायला, आजही खांदा पुरवावासा वाटतो पण त्यांनी रडावे म्हणुन नाही तर श्रांत मनाला विसावा देण्यासाठी. त्यांच्या दु:खात सहभागी झाल्यामुळे त्यांचे सुखाचे दिवस मलाही अनुभवावेसे वाटतात. त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी माझेही मन आतुर असते.पण जे वाटते ते प्रत्यक्षात होतेच असे नाही.
शेवटी ह्या अंतरीच्याच कळा...

खरचं असे का होते?

;;