Wednesday, December 20, 2006

मी एकटी एकाकी भावशून्य झाले होते
भावनांचा झाला गुंता गुंत्यात अडकले होते

अदृष्य विकलतेने मती गुंग होत होती
जाणीवाही बोथट झाल्या अस्पृश्य वंचने पोटी

चेतनांचे जागृत गाव निद्रिस्त जाहले होते
सुखस्वप्नांच्या चांदण्याला ग्रहण बधिरतेचे होते

नि:शब्द निस्तब्ध अशी काय अवस्था झाली
डोळ्यात अश्रु एकाकी एकटेच डोलत होते...

Monday, December 11, 2006

दिवस रातिंच्या विरहानंतर
तुज भेटीचा योग घडे
भिरभिर डोळे उरात धडधड
मिलनास मी आतुरले

उत्कंठित मन लाज लाजरे
दृष्टभेट ही हळुच चुकवे
पुन: भेटण्या उत्सुकले
मिलनास मी आतुरले

तव स्पर्शाची ओढ लागता
कोमल तनुला कंप सुटे
नखशिखांत मी मोहरले रे
मिलनास मी आतुरले!

Friday, December 08, 2006

संपता संपेना भय इथले अनामिक
कोळियाने विणले जाळे परि घट्ट किती ही विण

एक स्वच्छंदी पाखरू मौजेत उडे बागडे
अवचित दिसता रेशिम मोहात पडे बापडे

मऊसुत रेशिमावर पडे सूर्यकिरण अलवारं
पाखरास केले काबीज चमके सप्तरंगी ऊनं

त्या रंगीत रेशिमलडीस मोहुन पाखरू गेले
शिरताच रेशिमात त्यासी हे उलगडले

मार्ग आत शिरण्याचा असे इंद्रधनु मृगजळ
सुटकेचा मार्गच नाही केले कितीही यत्न

कोळियाने विणले जाळे पाखरू भुलुनी फसले
आकांत ऐकण्या त्याचा एकांती कोण असे?

संपता संपेना भय इथले अनामिक
कोळियाने विणले जाळे परि घट्ट किती ही विण
परि घट्ट किती ही विण!!

Hmmm... परत तोच प्रश्न... हे असे का होते?

आपल्या अवतीभवती असणारी, ज्यांना आपण आपली म्हणतो अशी 'आपली' माणसं. परिस्थिती, काळ, वेळ, माणसं अनुरूप नसता हक्काने आपल्यावर हक्क गाजवणारी माणसं. विश्वासाने खांद्यावर डोकं ठेवून रडणारी माणसं. आपणही त्यांना तत्परतेने खांदा पुरवतो. आपल्याला जमेल तसे, जमेल त्या पद्धतीने त्यांची समजुत घालतो. नवी दिशा दाखवण्याचा प्रयत्न करतो. नवे जीवन, नव्या मार्गाने जगण्याची उमेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतो.अशा वेळेस बहुतांशी डोक्यात त्यांचाच विचार असतो की अरे असे केले तर त्याल बरे वाटेल, हे त्याला आवडते, हे त्याल रूचणार, अमुक तमुक केले तर त्याचा mood चांगला होतो इ.इ. अगदी बारीक सारीक बाबतीत ज्यांचा विचार केला जातो, अशी ही आपली माणसं

पण...

कालान्वये परिस्थिती, वेळ, माणसं बदलतात. favourable होऊ शकतात / होतात. तेव्हा ह्या आपल्या माणसांजवळ आपल्यासाठी वेळ नसतो. एकाएकी ते कामात व्यस्त होतात. आधिच्या परिस्थितीतही ते व्यस्त असतातच पण तेव्हा त्यांना सहवासाची गरज असते. नंतर नसते असे नाही पण बहुतेक तिव्रता कमी होते.त्यांना आता आधारासाठी खांद्याची गरज नसते. नवी दिशा स्वत: शोधण्याचे बळ त्यांच्यात आलेले असते. अशा वेळेला आपल्याकडे कळत नकळत दुर्लक्ष होते. पण नेमक्या ह्याच वेळेस त्यांनी आपल्या जवळ असावे असे मला वाटते. शरीराने नाही तर मनाने. मला आजही हात समोर करावासा वाटतो पण अश्रु पुसायला, मदतील नाही तर, पाठीवर कौतुकाची थाप मारायला, आजही खांदा पुरवावासा वाटतो पण त्यांनी रडावे म्हणुन नाही तर श्रांत मनाला विसावा देण्यासाठी. त्यांच्या दु:खात सहभागी झाल्यामुळे त्यांचे सुखाचे दिवस मलाही अनुभवावेसे वाटतात. त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी माझेही मन आतुर असते.पण जे वाटते ते प्रत्यक्षात होतेच असे नाही.
शेवटी ह्या अंतरीच्याच कळा...

खरचं असे का होते?

Sunday, December 03, 2006

तुझ्याविना काढलेले दिवस
अन् राती

माझं तुझ्यावर प्रेम आहे
ह्याचीच देतात पावती

डोक्यात आहे अभ्यास
आणि ह्रुदयात तुझी आठवण

डोळ्यांखाली फिरतोय Corporate Law
आणि मनाला आलयं उधाण

की आता थोडेच दिवसात
तू येणार आहेस ...

अंतरी आजही तुझी याद आहे
डोळ्यांत अश्रु तुझी वाट पाहे

करी मंत्रमुग्ध तो पतंग मनाला
मनही प्रेमज्योतीत मिसळून पाहे

मोराचा केका ठाव घेई जिवाचा
जिवलगास माझ्या हे का न कळावे

अशी साद माझी का मनीतच विरावी
विराणीस प्रतिसाद देउन पाहे

थांब रे चकोरा नको व्याकूळ होऊ
सांत्वनास मेघ हे बरसणार आहे

Thursday, November 30, 2006

मत्त दर्पाच्या
मैत्रिखाली
ओझ्याने दबले
स्वत्वाला मुकले

नाते म्हणे हे
जन्मोजन्मीचे
परि ते अडखळले
स्वत्वाला मुकले

प्रयास का कधी
कमी जाहला
शब्दांसाठी
प्राण ठेविला
तव हे ना रुचले
स्वत्वाला मुकले

धुके कुठे हे
युगायुगांचे
दवबिंदुंची
पहाट कोठे
धुकेच तू वरले
स्वत्वाला मुकले

लाज, मान, मर्यादा
ह्यांवर
तुळसपत्र ठेवीले
स्वत्वाला मुकले

सख्या मी
स्वत्वाला मुकले...

Saturday, November 25, 2006

कोमल जल
भरूनी आले
जलद भरूनी आले

शितल तनु
चपल चरण
'जलद' जलद आले

मंद मंद
हासत बघ
अवखळत आले

सप्तरंगी
नाचत बघ
हळद पिवळे
झाले

भवतृष्णा
शमविण्यास
तिव्रगती आले

बरस बरस
बरसुनी हे
मनमोकळे झाले

Sunday, November 19, 2006

पूर्णत्व म्हणजे तरी काय? ते व्यक्तिसापेक्ष आहे का? तसं असेल तर, प्रत्येक जीव , मर्यादांनी बद्ध. मर्यादांची, अद्न्यानाची जेवढी जास्त विपुलता, विशालता, तेवढ्या प्रमाणात एखाद्याला कोणतीही मामुली गोष्ट परिपूर्ण वाटेल. वास्तवाशी इमान राखणं अत्यंत आवश्यक. वास्तव म्हणजे काय नेमकं?


स्वत:ची पात्रता.


समाजात आपणा आपल्याबद्दल जी प्रतिमा उभी केली असेल किंवा आपल्या आणि समाजाच्याही नकळत आपली जी प्रतिमा तयार झाली असेल, ती पुसण्याचं सामर्थ्य पाहिजे. एकांतात, एकाकीपणात, प्रत्येकानं आत डोकावून पाहावं. जाहीरपणे मान्य करण्याच सामर्थ्य नसेल, तर तीही वास्तवता. स्वत:ची स्वत:ला संपूर्ण ओळख असते, कारण माणूस स्वत:पासून पळू शकत नाही.स्वत:च्या सावलीवर जो भाळला, तो फसला.

एक मांजर सकाळी रस्त्यावर आलं. सूर्याच्या तिरक्या किरणांमुळं मांजराला स्वत:ची लांबपर्यंत पसरलेली सावली दिसली. मांजर म्हणालं,
'आज कमीत कमी एखादा घोडा मारून खाल्ल्याशिवाय भूक भागायची नाही.'
सूर्य वरवर येऊ लागला.
सावलीकडे पाहून मांजर म्हणालं,
'घोड्याची काही जरूरी नाही. एखादी शेळी सुद्धा चालेल.'
सूर्य आणखी वर आला. सावलीची लांबीही त्याप्रमाणात कमी झाली.
मग मांजर म्हणालं,'एखादा ससाही चालेल.'
ऐन दुपारी सावली पायांतळीच आली. तेंव्हा मांजर व्याकूळ होत म्हणालं,
'फक्त एक उंदराचं पिल्लू पुरे.'


व्याकुळावस्थेत स्वत:ची जी ओळख होते, ती 'वास्तवता'. स्वत:ची ओळख. त्या प्रमाणातच प्रत्येकाची 'पूर्णत्वाची' व्याख्या वेगळी असणार.
एखाद्या कलाकृतीत कोणत्याही माणसाला कुठलाही पर्याय किंवा बदल सुचवता येत नाही, तेंव्हा ते 'पूर्णत्व'.

( आपण सारे अर्जुन - व. पु. काळे )

Tuesday, November 14, 2006

...

तिन्ही सांज...
काळजात एक अनामिक हुरहूर..
उगाचच...

मी एकटी...
डोक्यात गर्दी, कोलाहल करणारे असंख्य विचार...

बहुतेक सगळे gloomy आणि negative...
थोडक्यात सतावणारे, छळणारे...

पण...

ह्रुदयात दाटलेले सख्यावरचे अपार प्रेम
क्षणाक्षणाला दिलासा आणी नवी ऊर्जा देणारे...

आणि ह्याला साक्षी आहेत
मावळतीचा सूर्य आणि
डोळ्यांतले अश्रु...

नाच...

रानात नाचे कोणी
काटा रूते कुणाला
अंतरीत पेटे काहू्र
वणव्यात वाट उमजेना

रानात नाच रंगताना
वणव्यात लागे चकवा
पोळून घेई अंग
तरी नाच हा सुटेना

नाचता नाचताच कधी
लागते समाधी
काहूर, वणवा, चकवा
सुटतात सारी कोडी...

Wednesday, November 01, 2006

शब्द शब्द हरवले
रेषांच्या रानात
पाऊलखुणा दिसाव्यात
ऊजेडाची व्हावी साथ ...

सारे कसे शांत शांत
पाने फुले ही निवांत
मंद झुळूक येई अन
स्तब्धतेचा होई अंत ...

Monday, October 30, 2006

ऊर्मी

हे असं का होतं किंवा हे असं का झालं? असे प्रष्ण बहुतेक सगळ्यानांच पडत असतील....निदान मला तरी ते पडतात....

आय़ुष्यात अश्या अनेक घटना घडतात जेंव्हा माणुस काहिसा हताश होतो आणि असे प्रष्ण स्वत:ला विचारु लागतो.... गम्मत म्हणजे अश्या घटना खुप गंभीर असायला हव्या असेहि नाहि....

पण का कोण जाणे मला हे प्रष्ण सारखे पडत असतात.....

तेरा वर्षांची मैत्री असलेला घनिष्ठ मित्र जेंव्हा पाठीत सुरा खुपसतो तेंव्हा.....

आपण ज्याला मित्र म्हणुन डोक्यावर घेतलेलं असतं, तो आपल्याला पायदळी तुडवतो तेंव्हा.....

आजपर्यंत केलेल्या आयुष्याच्या वाटचालीत आपण नेहमी फसवलेच गेलो... हे कळते तेंव्हा.....

कोरडा व्यवहार आणि पैश्याच्या ह्या दुनियेत भावना आणि ओलावा ह्यासारख्या फालतु गोष्टींना काहि स्थान नसते हे कटु सत्य अनपेक्षितपणे सामोरे येते तेंव्हा........

अश्या अनेक प्रसंगी मला हे प्रष्ण पडतात.... आणि मनातल्या मनात सुरु होते त्यांची उत्तरे शोधण्याची प्रचंड तडफड....

कधि उत्तरे मिळतात... कधि मिळत नाहित.....

पण तरिही ह्रिदयात ऊर्मी असते... जगण्याची.......

Thursday, October 19, 2006

दिवाळीचे दिवे ...

अंधाराचा ठाव घेती
दिवाळीचे दिवे,
आसमंत उजळतील
तुझे माझे दिवे.

लक्ष लक्ष तेवतील
स्नेहार्द्र दिवे,
प्रीतगंध दरवळतील
प्रेमाचे दिवे.

तुझ्या माझ्या प्रितीची
साक्ष आहेत दिवे,
शब्द मुकी होतात
आणि बोलु लागतात दिवे ...

;;