Sunday, September 06, 2009

स्कॅंडिनेवीया - 2

24 तारखेला सकाळी लवकर उठलो... भराभर सगळं आटोपुन हॉटेल मधेच नाश्ता केला आणि हेलसिंकी साठी निघालो. सेंट पिटर्सबर्ग ते हेलसिंकी हे अंतर साधारण 400 किमी आहे..म्हणजे खरं तर 4 तासांचा प्रवास. पण मधे बॉर्डर क्रॉसिंग असल्यामुळे आणि गर्दी मुळे आम्हाला वेळ लागला. फिनलॅंड मधे प्रवेश केल्यावर खर्‍या अर्थाने आमची स्कॅंडिनेवीया ची ट्रिप सुरु झाली. रस्ता खुप काही मोठा नव्हता. 2 ते 3 लेन्स दोन्ही बाजुनी एवढाच असेल पण होता मात्र एकदम गुळगुळीत... छोट्या छोट्या टुमदार गावांमधुन वळणं घेत घेत मधे मधे समुद्राला विळखे घालत घालत आमचा प्रवास मजेत सुरु होता. जेव्हा कुठलं छोटसं गाव समुद्रकिनारी असे तिथे लोकांच्या छोट्या छोट्या फेरी बोट्स किनार्‍यापाशी बांधुन ठेवलेल्या असत. वेगवेगळ्या रंगांच्या वेगवेगळी नक्षी काढलेल्या त्या छोट्या बोटी इतक्या मस्त दिसत होत्या. बरेच जण उन्हाळा असल्यामुळे आपला पुर्ण कुटुंब कबिला घेउन समुद्रसफरी वर निघाले होते... सगळीकडे उत्साही वातावरण जाणवत होतं.

जस जसं आम्ही हेलसिंकी च्या जवळ जात होतो तसतशी कंट्रीसाईड बदलत होती.... सर्वदुर पसरलेली हिरवीगार कुरणं, त्यावर चरणारे बैल, गाय, मेंढ्या ई. प्राणी, मधेच सोनपिवळ्या फुलांचा गालिचा घातलेली शेते, बंगलीवजा दिसणारी; छोटिशी तरीही देखणी रंगीबेरंगी लाकडी घरे आणि हमखास उठुन दिसणारे युरोपीयन स्टाईल चर्च. किती पाहु आणि किती नाही असे होत होते. पण एवढ्या सगळ्या देखाव्यात एक गोष्ट आमच्या लक्षातच आली नव्हती की आमचा जीपीएस नीट काम करत नव्हता. ( हे आम्हाला हेलसिंकी ला पोचल्यावर कळलं :-) ) एक तर तसा सरळ सरळ रस्ता होता आणि शिवाय साईनबोर्ड्स होते त्यामुळे आम्ही जीपीएस कडे बघितलं सुद्धा नव्हतं. आम्ही साधारण 4 च्या सुमारास हेलसिंकी ला पोचलो. आणि सरळ आधि टुरीस्ट इनफॉरमेशन ऑफिस गाठलं. ते सरळ रस्त्यावरच असल्यामुळे आम्हाला फारसं काही शोधावं लागलं नाही. तिथल्या मदतनिसाने 1-2 दिवसात आम्हाला कधिकधि कायकाय बघता येइल हे नीट समजावुन सांगितले. त्याने आम्हाला दोन पर्याय दिले होते. एक म्हणजे हेलसिंकी सिटी कार्ड आणि दुसरा पर्याय होता सिटी ट्रांसपोर्ट कार्ड. हि दोन्ही कार्ड्स 24 तास, 48 तास, 72 तास अशी दिवसाप्रमाणे उपलब्ध होती. आम्ही 24 तासांची दोन सिटी ट्रांसपोर्ट कार्ड्स घेतली. त्यात आम्ही बस, ट्रॅम, बोट कशानेही प्रवास करु शकत होतो... तर साधारण आम्ही प्लॅन ठरवला आणि त्याचदिवशी 1-2 ठिकाणी भेट देण्याचे ठरवले. संध्याकाळचे पाचच वाजले होते आणि सर्व प्रेक्षणिय स्थळं रात्री 8 पर्यंत सुरु होती. आमचं हॉटेल 7-8 किमी अंतरावर होतं त्यामुळे आम्ही ठरवलं की आधि पटकन हॉटेल ला जाउ गाडी पार्क करु आणि मग फिरतीवर निघु म्हणजे शहरात पार्कींग चा प्रश्न येणार नाही कारण युरोप मधे शहरात पार्कीग खुपच महाग आहे. आणि सिटी ट्रांसपोर्ट कार्ड आहेच.

मग नवर्‍याने झोकात जीपीएस काढला त्यात डेस्टीनेशन मधे हॉटेल चा पत्ता आधिच टाकला होता. आणि गाडी सुरु केली. थोड्यावेळाने जीपीएस ने आपला इंगा दाखवायला सुरुवात केली. सारखं आपलं रुट रिकॅल्क्युलेशन. कधी सरळ जायला सांगायचा कधी उजवीकडे / डाविकडे पण दिड तास झाला आम्ही काही ईछ्चित स्थळी पोचत नव्हतो. त्यातच काही मागमुस नसतान मुसळधार पाऊस सुरु झाला. मग आम्ही विचार केला की आपण साईन बोर्ड्स चा आधार घेउ. पण फिनलॅंड मधे इतक्या बेक्कार साईंस आहेत की त्याप्रमाणे तुम्ही गेलात तर कधिच हव्या त्या ठिकाणी पोचणार नाही. आणि पाऊस पण ईतक्या जोरात पडत होता की प्रत्येक बोर्ड वाचायला गेलो असतो तर रात्रच झाली असती. आणि रस्त्यांची नावे आणि बिल्डिंग नंबर वाचणं तर शक्यच नव्हतं( स्कॅडिनेवीया मधे 12 ईंच बाय 10 ईंच च्या छोट्या पत्र्यावर रस्त्यांची नावं आणि बिल्डिंग नंबर असतात. ती पण मुख्य रस्त्याहुन 8 ते 10 मीटर अंतरावर.) हॉटेलवाल्याला फोन केला तर तो म्हणे की मॅप असल्याशिवाय तो फोनवरुन सांगु शकत नव्हता. तरी त्याने 2-4 खाणाखुणा सांगितल्या आणि बेस्ट लक म्हणुन फोन ठेवुन दिला. आमच्याकडे होता टुरिस्ट मॅप त्यात काहिच डिटेलिंग नव्हतं. आली का आता पंचाईत. मग गाडी एका ठिकाणी पार्क केली शांतपणे तो नकाशा बघितला. जवळपासचे सर्व साइन बोर्ड्स वाचले. आणि त्या हॉटेलवाल्याने सांगितलेल्या खुणा आणि थोडा कॉमन सेंस ह्या वरुन एकदाचं ते हॉटेल शोधुन काढलं. पण तोवर रात्रिचे 8 वाजले होते. बाहेर पडायचा कंटाळा आला होता आणि शिवाय गुगल वरुन पुढच्या सगळ्या प्रवासाचे नकाशे सुद्धा घ्यायचे होते म्हणुन मग बाहेर जाणे रद्द केले.

दुसर्‍या दिवशी सकाळी सगळं आवरुन लवकरच बाहेर पडलो.. मस्त ऊन पडलं होतं अगदी प्रसन्न सकाळ होती. गाडी घेऊनच निघालो आणि बाजाराच्या जवळच असलेल्या भारतीय दूतावासात पार्किंग केले. तिथुन जवळुनच सिटी ट्रांसपोर्ट ची बस सुटणार होती. ती बस शहरातल्या सगळ्या प्रमुख प्रेक्षणिय स्थळांजवळ थांबते. हवं तिथे उतरायचं, फिरायचं आणि पुढची मिळणारी सिटी बस पकडायची. ट्रांसपोर्ट कार्ड घेतल्यामुळे खुपच सोय झाली होती. सगळ्यात आधि आम्ही हेलसिंकी ल्युथेरन कथिड्रल बघितलं. निळ्या आकाशाच्या बॅकग्राउंडला चर्च ची ती पांढरी ईमारत अगदी उठुन दिसत होती. त्या चर्च मधला ऑर्गन तर अप्रतिम होता. चर्चनंतर थोडं बाजारात फिरलो. मग बसनेच हेलसिंकी च थिएटर, रेल्वे स्टेशन ई. बघितलं. काय गम्मत असते नाही. आपल्या देशात आपण कधि कुठल्या गावाचं रेल्वे स्टेशन बघणार नाही पण बाहेर देशात मात्र क्षुल्लक जागा सुद्धा बघायची असते, been there done that अजुन काय. खुपच भुक लागली होती. बसमधुन मॅकडोनल्ड दिसलं. मग काय लगेच उतरलो. मी स्कॅंडिनेवीया च्या ट्रिप मधे एक गोष्ट मनापासुन ऐंजॉय केली ती म्हणजे मॅक चं व्हेज बर्गर. मी शाकाहारी असल्यामुळे मॉस्को मधे मला कायम फ्राईज वर समाधान मानावं लागतं. आता तर फ्राईज खाऊन कंटाळ आला आहे. व्हेज बर्गर माझ्यासाठी वेलकम चेंज होता.

पुढे टेंपलऑकिओ चर्च बघितलं. हे चर्च एका मोठ्या दगडात कोरुन बनवलं आहे. सुंदरच आहे. एवढा मोठा दगड तासुन चर्च घडवण्याचं काम खरोखरच कौशल्याचं आहे. आणि ते कोरलं देखिल अश्या काही खुबिने की बघितल्यावर जाणवतं की हे सगळं एकसंध एका दगडातुन कोरलं आहे पण चर्च आहे हे सुद्धा पुरेपुर जाणवतं. आम्ही गेलो तेव्हा तिथे एक लग्न सुरु होतं नवरा नवरी अगदी खुशीत हातात हात घालुन फिरत होते. आलेली आप्तेष्ट मंडळी वधुवरांवर फुलं, फुगे, साबणाचे फुगे ईत्यादिंचा वर्षाव करत होते, गाणि गात होते, मिठ्या मारत होते. मस्त मजा येत होती त्या लग्न सोहळ्याची. तिथुन आम्ही गेलो सिबेलिअस मॉन्युमेंट बघायला. एका फिनिश संगीतकाराच्या आठवणी प्रित्यर्थ हे बांधण्यात आलं आहे. हे ठिकाण बस थांब्यापासुन बरच आत आहे. एका फिनिश जोडप्याने आम्हाला तिथे पोचायला मदत केली. त्यांच्याकडुन कळलं की तिथे जवळच डॉग पार्क आहे. हा पार्क केवळ रजिस्टर्ड कुत्र्यांसाठी राखीव आहे. एका धनाढ्य बाईने आपल्या लाडक्या कुत्रीच्या आठवणीत हा पार्क बांधला. तिथे दर विकेंड ला कुत्र्यांना मोफत जेवण देतात आणि त्यांच्यासठी वेगवेगळे खेळ ठेवलेले असतात. शिवाय डॉक्टरही असतो. हे सगळं ऐकुन खुपच आश्चर्य वाटलं. मग रमत गमत परत बस थांब्यापाशी आलो. बस घेतली आणि शहराच्या छोट्या छोट्या रस्त्यांवरुन फिरुन परत बाजारा जवळ आलो. थोडीफार खरेदी केली. तिथे जवळच भाजी आणि फळांचे स्टॉल्स देखिल होते. इतकी ताजी भाजी आणि फळं बघुन अक्षरश: विकत घेण्याचा मोह होत होता. हे नवर्‍याला लगेच कळलं आणि त्याने मला ओढतच दुसरीकडे नेलं :-) ...

आमची फेरी ला रेपोर्टिंग ची वेळ होतच आली होती त्यामुळे अजुन न भटकता आम्ही गाडी घेऊन फेरी च्या गेट कडे निघालो. मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या बोटिने प्रवास करणार होते त्यामुळे खुपच ऎक्साईटेड होते आणि नवर्‍याला सवय असल्यामुळे तो तेवढाच थंड होता :-) यथावकाश क्यु मधे आमचा नंबर आला. आमचं बुकींग तिथल्या ऑफिसरने तपासलं आणि आम्हाला आत सोडलं. चौथ्या डेक वर आम्हाला गाडी पार्क करायला पाठवलं आणि त्या प्रचंड मोठ्या बोटिच्या पोटात आम्ही हळुच शिरलो आणि बाहेरच्यांना दिसेनासे झालो. फारच मजा वाटत होती आत जाताना. तेवढ्या वेळात मोठ्या माश्याच्या तोंडातुन त्याच्या पोटात जाताना लहान लहान माश्यांनाही असेच वाटत असणार असे आणि असलेच काहीबाही गमतीशिर विचारही डोक्यात येऊन गेलेत.

गाडी पार्क करुन आम्ही आमच्या केबिन कडे निघालो. आमचं केबिन दहाव्या डेकवर होतं. छान होतं केबिन. केबिन च्या खिडकितुन मस्त खालची दुकानं दिसायची. माणसांची लगबग दिसायची.
आणि केबिन च्या बाहेर भली मोठी काचेची खिडकी. जिथुन नजर ठरेपर्यंत निळाशार पसरलेला समुद्र दिसायचा. हे सगळं बघुन मन खुपच सुखावुन गेलं. मी त्या जागेचं लागलीच समुद्रखिडकी असं बारसं पण करुन टाकलं. केबिन मधे सामान टाकुन समुद्रखिडकी पाशी जरावेळ रेंगाळुन आम्ही वरती मुख्य डेकवर गेलो. केस विस्कटणारा भन्नाट खारा वारा आणि दोस्ती करु पाहणारे सीगल पक्षी अनुभवण्यात वेळ कसा गेला कळलच नाही. खाली आमच्यासाठी एक सरप्राईज वाट बघतच होतं.

;;