Monday, August 27, 2007

अशी ही बनवाबनवी!

भर दिवसाच्या उजेडात

कृष्णकृत्ये सुरु असतात;

डोळे मिटणारया मांजराला

सर्व लोकच आंधळे भासतात!


गुंड आणि शिपाई सुद्धा

लाचेपायी त्रस्त असतात;

एका हाताने घेउन

दुसरयाने देत असतात!


नेते मंडळींचा इथे

सुरु असतो वेगळाच खेळ;

पुढील निवडणुक येईपर्यंतं

आश्वासनांवरच निभते वेळ!


रात्र आणि दिवसामागुन

सुरु असतो हाच खेळ;

एकीला हाताशी धरुन

दुसरीशी ठरवली जाते वेळ!


बाहेरचे काय घेउन बसलात

घरात सुद्धा असेच असते;

आज नक्की करतो म्हणुन

उद्यावर ढकलले जाते!


शेवटी सगळे लोक हे

मांजराचीच जमात असतात

जाता जाता डोळसाला

चक्क आंधळं ठरवुन जातात!!

Friday, August 24, 2007

पत्रं

तु तिथे अन् मी इथे....

तु तुझ्या कामात व्यस्त आणि मी इथे अवघडलेली,

उदरात होणारी प्रत्येक हालचाल तुझ्या अस्तित्वाची जाणीव करुन देणारी,

तुला मात्रं अजुन पुरेशी sink in न झालेली!

दोघांचाही डोळा आहे उद्यावर पण संदर्भ वेगळे,

प्रत्येकचजण शोधतयं आकाश आपले मोकळे...

माझं जग, माझी Identity, माझी space’, तुझे लाडके शब्द,

तुझ्याच असणारया मला करतात सतत विद्ध!

तुझ्या कविता वाचुन जग तुझ्या जवळ आले

मी मात्रं प्रेमाचे दोन शब्द वाचायला आसुसले!

फार काही अपेक्षा नाही एकच मागणे मागते

वेळात वेळ काढुन मला लिहिशील का दोन ओळी?

Tuesday, August 21, 2007

वळणावरचे दोघे

एकमेकांवर निर्व्याज प्रेम करणारे ते दोघे

आयुष्याच्या एका वळणावर...


तो जिब्रान जाणणारा,

ती फुलराणी त रमलेली...


त्याचे सारेच अफाट आणि भव्य,

ती छोट्या सुखांनी हरखणारी...


त्याला ध्यास नाविन्याचा,

ती गोधडिची ऊब जपणारी...


तो घर पसरवणारा,

अन् ती ते सावरणारी...


तो आकाशाला गवसणी घालणारा,

ती मुठितील निसटणारी वाळू धरू बघणारी...


आयुष्याच्या एका वळणावर,

उभे ठाकलेले ते दोघे...

;;