Friday, January 26, 2007

Spice

मला नेहमी विचारला जाणारा प्रश्न... काय करतेस तु घरी दिवसभर? तुला कंटाळा येत नाही? येत जा की संध्याकाळी कट्ट्यावर... आम्ही मस्त गप्पा मारतो, टाइमपास करतो, मजा येते...इति आमच्याच शेजारच्या काही बायका... काही नवपरिणीत, तर काही सासुपदाला 'पोचलेल्या' अश्या सर्वच वयोगटातील...माझी नुकतीच परीक्षा संपली होती, म्हणुन विचार केला की एवढा आग्रह होतो आहे तर जाउया जरा... कुणास ठाउक, खरच मजा येइल ...

म्हणुन गेले एका संध्याकाळी. पण तिथे गेल्यावर माझा विरसच झाला... कुणाचं लफडं कुणासोबत आहे, कुणाचा नवरा कोणाच्या बायकोवर लाईन मारतो, आज कुणाचं भांडण झालं? अश्या अनेक ताज्या विषयांवर चर्चा सुरु होत्या... मला पण बरेच प्रश्न विचारण्यात आले, पण मला मुळात gossip करायला आवडत नसल्यामुळे बहुतेकांची उत्तरे मला माहिती नव्हती... त्या बायकांची प्रचंड निराशा झाली... मला म्हणायला लागल्या काय गं तु अशी, तुझ्याजवळ काही spice च नाहिये... काय करते दिवसभर घरी राहुन कुणास ठाउक... दोन माणसं तर आहेत घरी.एवढं काम तरी काय असतं? काही कसली माहिती नसते आणि 'माहिती काढण्यात' काही interest पण नसतो...

घरी आल्यावर मी जरा विचारातच पडले... खरच आपल्यामधे, आपल्या आयुष्यामधे काही spice नाही का?

पण विचार करता करता मला जाणवु लागलं की अभ्यास आणि घरकाम झाल्यावर उरलेल्या फावल्या वेळात चांगलं वाचन करणे, शेजारच्या चिमुरडिला origami शिकविणे, कागदातुन एक नवं विश्व साकारल्यावर, तिच्या चेहेरयावरची,आश्चर्यचकित आणि आनंदी,कुतुहल मिश्रित भावांची रंगपंचमी बघणे, त्याला आवडते म्हणुन त्याच्या आवडिचा पदार्थ करणे आणि त्याने दाद दिल्यावर मनातल्या मनात गिरकी घेणे, अंगणात रोज येणारया मोराला खायला घालता घालता त्याच्याशी उगाचच पोरकट बोलणे आणि त्याने आपले पिस टाकले की ते त्याची आठवण म्हणुन जपुन ठेवणे... ह्या सारया गोष्टी म्हणजेच माझ्या छोट्याश्या आयुष्यातला spice आहे... हे सर्व नसेल तर मात्र खरच माझं जगणं बेचव होईल... हे देवा, माझ्या लहानश्या आयुष्यात, निरागसपणा असाच भरभरुन वाहु दे, हीच तुला प्रार्थना...

;;