Thursday, November 30, 2006

मत्त दर्पाच्या
मैत्रिखाली
ओझ्याने दबले
स्वत्वाला मुकले

नाते म्हणे हे
जन्मोजन्मीचे
परि ते अडखळले
स्वत्वाला मुकले

प्रयास का कधी
कमी जाहला
शब्दांसाठी
प्राण ठेविला
तव हे ना रुचले
स्वत्वाला मुकले

धुके कुठे हे
युगायुगांचे
दवबिंदुंची
पहाट कोठे
धुकेच तू वरले
स्वत्वाला मुकले

लाज, मान, मर्यादा
ह्यांवर
तुळसपत्र ठेवीले
स्वत्वाला मुकले

सख्या मी
स्वत्वाला मुकले...

Saturday, November 25, 2006

कोमल जल
भरूनी आले
जलद भरूनी आले

शितल तनु
चपल चरण
'जलद' जलद आले

मंद मंद
हासत बघ
अवखळत आले

सप्तरंगी
नाचत बघ
हळद पिवळे
झाले

भवतृष्णा
शमविण्यास
तिव्रगती आले

बरस बरस
बरसुनी हे
मनमोकळे झाले

Sunday, November 19, 2006

पूर्णत्व म्हणजे तरी काय? ते व्यक्तिसापेक्ष आहे का? तसं असेल तर, प्रत्येक जीव , मर्यादांनी बद्ध. मर्यादांची, अद्न्यानाची जेवढी जास्त विपुलता, विशालता, तेवढ्या प्रमाणात एखाद्याला कोणतीही मामुली गोष्ट परिपूर्ण वाटेल. वास्तवाशी इमान राखणं अत्यंत आवश्यक. वास्तव म्हणजे काय नेमकं?


स्वत:ची पात्रता.


समाजात आपणा आपल्याबद्दल जी प्रतिमा उभी केली असेल किंवा आपल्या आणि समाजाच्याही नकळत आपली जी प्रतिमा तयार झाली असेल, ती पुसण्याचं सामर्थ्य पाहिजे. एकांतात, एकाकीपणात, प्रत्येकानं आत डोकावून पाहावं. जाहीरपणे मान्य करण्याच सामर्थ्य नसेल, तर तीही वास्तवता. स्वत:ची स्वत:ला संपूर्ण ओळख असते, कारण माणूस स्वत:पासून पळू शकत नाही.स्वत:च्या सावलीवर जो भाळला, तो फसला.

एक मांजर सकाळी रस्त्यावर आलं. सूर्याच्या तिरक्या किरणांमुळं मांजराला स्वत:ची लांबपर्यंत पसरलेली सावली दिसली. मांजर म्हणालं,
'आज कमीत कमी एखादा घोडा मारून खाल्ल्याशिवाय भूक भागायची नाही.'
सूर्य वरवर येऊ लागला.
सावलीकडे पाहून मांजर म्हणालं,
'घोड्याची काही जरूरी नाही. एखादी शेळी सुद्धा चालेल.'
सूर्य आणखी वर आला. सावलीची लांबीही त्याप्रमाणात कमी झाली.
मग मांजर म्हणालं,'एखादा ससाही चालेल.'
ऐन दुपारी सावली पायांतळीच आली. तेंव्हा मांजर व्याकूळ होत म्हणालं,
'फक्त एक उंदराचं पिल्लू पुरे.'


व्याकुळावस्थेत स्वत:ची जी ओळख होते, ती 'वास्तवता'. स्वत:ची ओळख. त्या प्रमाणातच प्रत्येकाची 'पूर्णत्वाची' व्याख्या वेगळी असणार.
एखाद्या कलाकृतीत कोणत्याही माणसाला कुठलाही पर्याय किंवा बदल सुचवता येत नाही, तेंव्हा ते 'पूर्णत्व'.

( आपण सारे अर्जुन - व. पु. काळे )

Tuesday, November 14, 2006

...

तिन्ही सांज...
काळजात एक अनामिक हुरहूर..
उगाचच...

मी एकटी...
डोक्यात गर्दी, कोलाहल करणारे असंख्य विचार...

बहुतेक सगळे gloomy आणि negative...
थोडक्यात सतावणारे, छळणारे...

पण...

ह्रुदयात दाटलेले सख्यावरचे अपार प्रेम
क्षणाक्षणाला दिलासा आणी नवी ऊर्जा देणारे...

आणि ह्याला साक्षी आहेत
मावळतीचा सूर्य आणि
डोळ्यांतले अश्रु...

नाच...

रानात नाचे कोणी
काटा रूते कुणाला
अंतरीत पेटे काहू्र
वणव्यात वाट उमजेना

रानात नाच रंगताना
वणव्यात लागे चकवा
पोळून घेई अंग
तरी नाच हा सुटेना

नाचता नाचताच कधी
लागते समाधी
काहूर, वणवा, चकवा
सुटतात सारी कोडी...

Wednesday, November 01, 2006

शब्द शब्द हरवले
रेषांच्या रानात
पाऊलखुणा दिसाव्यात
ऊजेडाची व्हावी साथ ...

सारे कसे शांत शांत
पाने फुले ही निवांत
मंद झुळूक येई अन
स्तब्धतेचा होई अंत ...

;;