Friday, November 06, 2009

अल्बम

काल दुपारी सहजच मी जुने फोटो बघत होते. आमचं लग्न झाल्यानंतरचे फोटो... बाप रे नवरा किती बारीक दिसतो आहे आणि मी कसली बावळट दिसते आहे असे काही बाही कमेंट्स टाकत त्या फोटोंचं मी चविष्टपणे रसग्रहण करत होते :)... आणि एकापाठोपाठ एक अश्या अनेक कडु गोड आठवणी यायला लागल्या. कडु कमी आणि गोडच जास्त.

आमचं लग्न झालं तेव्हा मी आणि नवरा आम्ही दोघेही शिकत होतो. त्यामुळे मॅरीड स्टुडंट म्हणुन आम्हाला रहायाला घर मिळालं होतं. घर कसलं अगदी रानावनात असलेलं चंद्रमोळी (सिमेंटच) झोपडंच होतं. आजुबाजुला गर्द वनराई आणि सोबतिला असंख्य पक्षी आणि प्राणी. दोन पायाचे, चार पायाचे आणि सरपटणारे सुद्धा :).

तर आम्ही जेव्हा त्या घरात पाय ठेवला तेव्हा आमच्याकडे प्रत्येकी 2 सुटकेसेस, पुस्तकं आता बाहेर पडतात की काय इतक्या ठासुन भरलेल्या पुस्तकांच्या 4 ट्रंका, स्वयंपाकाच्या भांड्यांचं आणि त्यातच देव इत्यादी असलेलं एक आणि मसाले आणि इतर राशन असलेलं एक अशि दोन छोटी खोकी एवढंच सामान होतं. मला अजुनही आठवतय की गृहप्रवेशाच्या वेळेस सुद्धा शेजारच्या सरदारजी घरातुन कुंकु आणलं होतं. गृहप्रवेश तर झाला. घरात गेल्या गेल्या लक्षात आलं की अरे सगळीकडे नुसत्या मोठ्यामोठ्या काचेच्या खिडक्याच आहेत. आणि आपल्याकडे तर परदेच नाहीत. मग काय भराभर आपआपल्या सुटकेसेस उघडुन पांघरायच्या चादरी आणि माझ्या ओढण्या काढल्या आणि तात्पुरती परद्यांची सोय झाली.

हळुहळु संसार करायला आणि घर चालवायला काय काय लागतं ह्याचा अंदाज यायला लागला. नवरा 12 वी नंतर कायम घराबाहेरच होता आणि अश्या ठिकाणी होता जिथे त्याचा आणि चुलीचा काहीही संबंध आला नाही. त्यामुळे स्वयंपाक करण्याची जबाबदारी आपसुकच पुर्णपणे माझ्यावरच होती. मला स्वयंपाक करता येत होता पण पुर्वी कधी जबाबदारी घेऊन करायची वेळच आली नव्हती ती आता आली होती. पण तरी सुरवातिचे काही दिवस जेव्हा दोघांनाही खुप भुक लागायची आणि पोटात कावळे कोकलायला लागायचे तेव्हा लक्षात यायचं बाप रे अजुन काहिच शिजवलेलं नाहिये. मग काय भराभर वरण भाताचा कुकर लावायचा. त्यावरून आमची परत भांडणं व्हायची कारण नवरा भाताचा कट्टर विरोधक होता आणि मी म्हणायचे की कणिक भिजवुन पोळ्या करायच्या आणि भाजी चिरून फोडणिला टाकायची त्यापेक्षा वरण भात लवकर होतो. आणि तसही नवरा कोकणस्थ आणि मी माहेरून देशस्थ त्यामुळे मला काही आमटी जमायची नाही आणि फोडणिचं वरण त्याच्या पसंतीस उतरायचं नाही त्यामुळे परत कुरकुर :).

आम्ही ज्या गावी राहायचो तिथे प्रचंड ह्युमिडिटी होती. त्यामुळे अन्न लवकर खराब व्हायचं म्हणुन मग तातडिने आधि फ्रिज घेतला. पण मला ह्युमिडीटीची अजिबातच सवय नसल्यामुळे मला खुपच त्रास व्हायला लागला. म्हणुन मग एसी घेतला. आम्ही राहायचो ते शैक्षणिक संस्थेच्या आवारात. तिथुन गाव होतं 12-15 किमी अंतरावर. मग घर लावायचं आणि चालवायचं म्हणजे भाजीपाला किराणा व इतर सामान आणायला तर बाहेर पडायलाच हवं. जायला यायला सोय व्हावी म्हणुन मग वाहन घेतलं कारण प्रत्येक वेळी वाहन हायर करून जाण्यापेक्षा स्वत:चे वाहन घेणे स्वस्त पडते. ह्या सगळ्या खर्चांमुळे आमची सगळी शिल्लक कामी आली. मग परदे घेणं पुढे ढकललं :) तात्पुरत्या परद्यांवर आम्ही खुश होतो :). मग आम्ही एक यादी केली होती. त्यात गरजेप्रमाणे प्रत्येक महिन्यात काय घ्यायचे हे लिहिले होते. त्यात परद्यांचा नंबर 5 महिन्यांनी आला आणि मिक्सर / फूड प्रोसेसरचा दिड वर्षाने :). तोवर आम्ही सगळं काम खलबत्त्यावर केलं :).

सुरवातीचे काही महिने आमच्या ज्या पुस्तकांच्या ट्रंका होत्या त्याच बैठकिच्या खोलीत बसायला वापरायचो. त्या जरा जुन्या होत्या. त्यामुळे त्यावर कोणि बसलं की लगेच त्या कुरकुरायच्या आणि मला हसु आवरायचं नाही :). पलंग येईपर्यंत आमची वळकटी आणि सिमेंटची फरशी यांची घट्ट मैत्री झाली होती. हळुहळु सामन जमत गेलं आणि आमचं बस्तान बसत गेलं. हे सगळं सुरू असताना एकिकडे अभ्यास, परिक्षा, असाईनमेंट्स , प्रोज़ेक्ट्स सुरूच होते. आम्ही दोघेही दोन वेगवेगळ्या खोलीत बसुन अभ्यास करायचो. तो त्यच्या लॅपटॉपवर मी माझ्या. तेव्हा एकाच घरात रहात असुन सुद्धा आम्ही तासंतास गूगल टॉक वर चॅट करायचो :). खुप मजा यायची. एकीकडे एसी, फ्रिज, लॅपटॉप( शैक्षणिक संस्थेच्या आवारात राहात असल्यामुळे इंटरनेट फ्री होते :))आणि दुसरीकडे बसायाला ट्रंका, झोपायला वळकटी आणि दारांना परद्यांच्या ऐवजी चादरी आणि ओढण्या असा प्रचंड विरोधाभास आमच्या घरी होता :). आणि आम्ही त्यात खुश होतो कारण तो आमचाच निर्णय होता. दोघांच्याही पालकांनी वेळोवेळी काहितरी निमित्याने, प्रसंगाने आम्हाला मदत करायचा प्रयत्न केला. पण आम्हाला आमचं घर उभारायच होतं ते आमच्या आई बाबांसारखच. आपल्या हिमतीवर, मेहनतीवर आणि नशिबावर. त्यामुळे जे जसं होतं त्यात आम्ही खुप खुश आणि पुर्णपणे समाधानी होतो आणि आहोत :).

आमच्या त्या घराला मागे एक छानसं अंगण होतं. तिथे रोज सकाळी मोर यायचा. पुढे पुढे आमची त्या मोराशी दोस्ती झाली तो आला की रोज मी त्याला काही काही खायला द्यायचे. आणि त्याच्याशी खुप गप्पा मारायचे :). त्याला ब्रेड खुप आवडायचा. ब्रेड चे तुकडे टाकले की अगदी खुश व्हायचा आणि खाऊन झाल्यावर कधि ठुमकत ठुमकत अगंणभर फिरायचा नाहितर आपल्या पिसांचा पसारा फुलवुन माझ्यासाठी खास नाच करायचा. नवर्‍याने काढलेले त्याचे फोटो आणि व्हिडीओ अजुन जपुन ठेवले आहेत आणि त्याने मला भेट दिलेले एक छानसे मोरपीस सुद्धा :).

खुप छान होते ते दिवस. रोज समोर एक नवं आव्हान असायचं. व्यक्तिगत नाहितर व्यावसायिक. पण दोघांनी मिळुन त्या सगळ्या प्रॉब्लेम्स ना तोंड द्यायला मजा यायची. नवर्‍याची साथ खमकी आणि खंबीर होती पण मायेचा हळुवार ओलावा सुद्धा होता. आजुबाजुचे लग्न झालेले मित्र मैत्रीणी बघितले आणि आमच्याकडे बघितलं की आम्हाला वाटायचच नाही की खरच आपलं लग्न झालेलं आहे. मला तर कायमच वाटायच की हा अजुनही माझा मित्रच आहे नवरा नाही. आणि नवर्‍याचेही माझ्याबद्दल काही वेगळे मत नव्हते :).

मी काल जो अल्बम बघत होते तो ह्याचमुळे केवळ फोटोंचा अल्बम नसुन सगळ्या आठवणिंचाच अल्बम आहे. ह्या सगळ्या आठवणी म्हणजे एखाद्या अस्सल अत्तराच्या कुपीसारख्या आहेत. कुपीतलं अत्तर कसं कुपी उघडल्याबरोबर बाहेरचं वातावरण गंधमुग्ध करतं. तश्याच ह्या आठवणी. पावसाच्या सरीसारख्या एकापाठोपाठ एक सरसरत येतात आणि कुपीतल्या अत्तरासारखा माझा उरलेला दिवस मुग्धतेने भारलेला करून जातात.

;;