Friday, September 28, 2007

ह्याला जीवन ऐसे नाव!

आटपाट नगरात कोणी एक डोंबारी होता. घरी अठराविश्वे दारिद्र्य आणि त्यात बायको आणि तीन कच्याबच्यांची जबाबदारी... दिवसभर उन्हातान्हात, पावसापाण्यात तो डोंबारयाचा खेळ करत वणवण करायचा आणि लोकांचं मनोरंजन करुन मिळतील ते चार पैसे कमवायचा... संध्याकाळी घरी परतताना मिळाळेल्या चार पैश्यातून मिठ-मिर्ची घेउन तो जायचा तेव्हा कुठे घरात चुल पेटायची... दिवसभर राबल्यावर, संध्याकाळी बायको पोरांसोबत ओलंसुकं खाताना त्याला परत माणसात आल्यासारखं वाटायचं आणि त्याचा डोंबारयाचा मुखवटा पार गळुन जायचा...

एक दिवस असाच तो घरी परतत होता... दिवसभर वणवण करुन शरीर अगदी आंबुन गेलं होतं. शिवाय आज काहीच कमाई झाली नव्हती आणि त्याच्या डोळ्यांसमोर भुकेने केविलवाणे झालेले त्याच्या पिल्लांचे चेहरे दिसत होते... दु:खाने आणि निराशेने त्याचा रापलेला चेहरा पिळवटुन निघाला. त्याला असे बघुन त्याची बायको कावरीबावरी झाली आणि त्याचे रिकामे हात बघुन आज जेवण मिळणार नाही ह्याची मुलांना कल्पना आली आणि ते रडु लागले... पोटात पेटलेली भुकेची आग त्या चिमण्यांना शांत होऊ देत नव्हती... तो डोंबारी आणि त्याची बायको सुद्धा पोरांचं रडणं काही थांबवु शकले नाहीत... आणि एकाएकी तो डोंबारी उठुन उभा राहिला आणि त्याने आपला डोंबारयाचा खेळ सुरु केला... त्याच्या मुलांना हे सारे खेळ नवे होते... डोंबारयाच्या उड्या, त्याचे हावभाव बघुन पोरं आपली भुक विसरले आणि टाळ्या वाजवुन हसु लागले...तात्पुरता तरी भुकेचा प्रश्न सुटला होता...

आणि आयुष्याने त्याला माणसातुन परत डोंबारयात बदलले होते!!

2 प्रतिसाद्:

VishaL KHAPRE said...

Very beautiful!!!

रोहिणी said...

Vishal: Thank you...