Friday, September 28, 2007

मनाचिये गुंती

येता एकेक आठवण

जागे होती मृत क्षण

ताकदीने विलक्षण

प्रसन्न तर कधी सुन्न !


कधी कुणाचे ते बोल

कधी कुणाचा चेहरा

कधी कस्तुरी सुगंध

कधी मोराचा पिसारा !


आभासावर भास

खोल खोल जाई श्वास

मृगजळाची ही कास

जीव घेणारच खास !


काय होई ते नकळे

जसे जीवा लागे पिसे

सत्य आणि असत्यातील

कसे अंतर मिटले !


काहितरी करा

कोणितरी हे थांबवा

मनाचिये रोग

कोणि करेल का बरा?

आटपाट नगरात कोणी एक डोंबारी होता. घरी अठराविश्वे दारिद्र्य आणि त्यात बायको आणि तीन कच्याबच्यांची जबाबदारी... दिवसभर उन्हातान्हात, पावसापाण्यात तो डोंबारयाचा खेळ करत वणवण करायचा आणि लोकांचं मनोरंजन करुन मिळतील ते चार पैसे कमवायचा... संध्याकाळी घरी परतताना मिळाळेल्या चार पैश्यातून मिठ-मिर्ची घेउन तो जायचा तेव्हा कुठे घरात चुल पेटायची... दिवसभर राबल्यावर, संध्याकाळी बायको पोरांसोबत ओलंसुकं खाताना त्याला परत माणसात आल्यासारखं वाटायचं आणि त्याचा डोंबारयाचा मुखवटा पार गळुन जायचा...

एक दिवस असाच तो घरी परतत होता... दिवसभर वणवण करुन शरीर अगदी आंबुन गेलं होतं. शिवाय आज काहीच कमाई झाली नव्हती आणि त्याच्या डोळ्यांसमोर भुकेने केविलवाणे झालेले त्याच्या पिल्लांचे चेहरे दिसत होते... दु:खाने आणि निराशेने त्याचा रापलेला चेहरा पिळवटुन निघाला. त्याला असे बघुन त्याची बायको कावरीबावरी झाली आणि त्याचे रिकामे हात बघुन आज जेवण मिळणार नाही ह्याची मुलांना कल्पना आली आणि ते रडु लागले... पोटात पेटलेली भुकेची आग त्या चिमण्यांना शांत होऊ देत नव्हती... तो डोंबारी आणि त्याची बायको सुद्धा पोरांचं रडणं काही थांबवु शकले नाहीत... आणि एकाएकी तो डोंबारी उठुन उभा राहिला आणि त्याने आपला डोंबारयाचा खेळ सुरु केला... त्याच्या मुलांना हे सारे खेळ नवे होते... डोंबारयाच्या उड्या, त्याचे हावभाव बघुन पोरं आपली भुक विसरले आणि टाळ्या वाजवुन हसु लागले...तात्पुरता तरी भुकेचा प्रश्न सुटला होता...

आणि आयुष्याने त्याला माणसातुन परत डोंबारयात बदलले होते!!

Sunday, September 23, 2007

संवेदनशील आणि भिडस्त मनाने टिपलेले काही बरे वाईट अनुभव,

सामाजिक आणि वैयक्तिक जवाबदारीची पाळेमुळे खोलवर रुजलेल्या डोक्यात

अविरत चाललेले विचारांचे थैमान

आणि माझी सुरु असलेली धडपड!

मोकळे होण्याची!!

मनात साचलेले, दाटलेले share करण्याची...

पण विचारांची श्रीमंती शब्दांपुढे कंगाल ठरते!

समोरच्याला खुप काही सांगायचे असते,

मुखदुर्बळता असतेच आणि आता त्याला शब्ददुर्बळतेचा साज चढतो...

आणि अभिव्यक्तिचे सारे मार्गच खुंटल्यासारखे होतात.

मनात खुप असते पण ते व्यक्त करता येत नाही...

मनाची अक्षरश: कोंडी होते

आणि मग ही अवस्था

असहाय होऊन डोळ्यांतून वाहु लागते!

कोणी वाचु शकेल का मनाच्या पाटीवरली ही अक्षरे,

न उठलेली?

कोणापर्यंत पोहोचु शकतील का ह्या भावना

नि:शब्द आणि अबोल?

तुमच्यासोबत कधी असे होते का हो?

नाहीतर मीच वेडी म्हणायची...

आणि पुन्हा एकदा

एकला चोलो रे!!

Thursday, September 20, 2007

कळत - नकळत

नकळत कळते सारे

शब्दांची गरज नुरे

तव मनात जे जे दडले

ह्या मनास अलगद उमजे


सरसरत शिरवे येता

हा धुंद गंध दरवळतो

मृण्मयीन होउन जाता

जलदाला भानही विसरे

नकळत कळते सारे

शब्दांची गरज नुरे


हळुवार कळीस हा समीरण

स्पर्षाने फुलवत जातो

मोहक सुवासित मग ते

मुदे तयासंग डोले

नकळत कळते सारे

शब्दांची गरज नुरे


नाते असेच अपुले

हलकेच मुग्ध मोहरते

अबोल विश्वासाने

दृढ अन गहिरे होते

नकळत कळते सारे

शब्दांची गरज नुरे


तव मनात जे जे दडले

ह्या मनास अलगद उमजे!!

Sunday, September 09, 2007

पैलतिर

दुर्लक्षितच जगले

आता कोणि विचारले तरच नवल आहे

दुखावलेल्या मनाला

फुलापेक्षा काट्याचेच अप्रुप जास्त आहे


हळुवार भावनांचा

चुरडुन केर झाला

खोट्या मोहक हास्ये

नात्यांना जपायचे आहे


ह्या फसव्या दुनियेत

उभे आयुष्य ठाकले आहे

डोळे मात्र आताच

पैलतिरावर आहे...

Saturday, September 08, 2007

शब्द

शब्द कधि हसरे आणि नाचरे

रडताना हसवणारे,

शब्द कधि दु:खद आणि बोचरे

हसता हसता टचकन पाणी आणणारे...


शब्द कधि लाघवी कधि प्रेमळ

मायेची फुंकर घालणारे,

शब्द कधी कठोर आणि निष्ठुर

रेशिमबंध तोडणारे....


शब्द कधि उन्मत्त, कधि मस्तवाल

आपल्याच गुर्मीत गुरगुरणारे,

शब्द कधि लाचार आणि आश्रित

लाजेने झाकोळणारे...


शब्द कधि चकचकीत आणि साखर पेरलेले

फसवुन सख्य साधणारे,

शब्द कधि अबोल आणि मुग्ध

संयत अनुनय करणारे...


शब्द कधि खोटे कधि फसवे

खोल गर्तेत ढकलणारे,

शब्द कधि खरे आणि आश्वासक

गड्या कामाला लाग म्हणणारे...


शब्द कधि सख्खे आणि जवळचे

पण जवळच्यांना दुरावणारे.

शब्द कधि परके कधि दुरचे

पण हळुवार जवळिक जपणारे...


कधि सारे शब्द विसरुन

नि:शब्द असे जगायचे आहे

शब्दांच्याही पलिकडचे

शब्दांशिवाय जाणायचे आहे...

;;