जगण्याची ...
काय करू अन काय नको असं झालंय. मन आनंदाने गिरक्या काय घेतंय, मधेच एखादी आठवण येऊन डोळे काय भरून येताहेत. काहितरी गमतीशीर आठवुन एकटीच हसतेय काय. काही विचारू नका.. का? मी जातेय माझ्या देशात. माझ्या भारतात. ओळखिच्या देशात, ओळखिच्या वातावरणात आणि ओळखिच्या भाषांत.
तेच ओळखिचे गंध, तेच ओळखिचे आवाज, तेच ओळखिचे आपुलकिचे स्पर्श सगळं पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी, अनुभवुन मनाच्या डबीत घट्ट बंद करून कधिही निसटू न देण्यासाठी.
आजीने बोटे मोडीत कडकडून काढलेली दृश्ट, बाबांचा डोक्यावरून फिरणारा हात, दादाने ओढलेले केस, आईने सुकली गं पोर माझी म्हणुन कुरवाळलेले गाल, आवडता पदार्थ केल्यावर सासुबाईंनी पाठीवर दिलेली शाबासकीची थाप, सासर्यांच्या फोटोशी केलेला मुक संवाद आणि माझ्याच मनात आलटुन पालटुन चालणार्या डायलॉग्स वर फोटोतीलच त्यांचं टिपीकल फौजी हसणं, एकमेकींचे ( सगळ्यांत चांगले )कपडे घालण्यासाठी वहिनीशी केलेली झटापट :) आणि नंतर गळ्यांत गळे घालुन वाटुन खाल्लेला एकच पेरू. हे सगळं सगळं मला परत भेटणार आहे.
प्रत्येकासाठी भेटवस्तु घेताना त्यांच्या सोबत घालवलेले असंख्य क्षण आठवणी बनुन मनाभोवती फेर धरताहेत. मग हे नको तेच घेऊया. छे! हा रंग तिला नाही आवडायचा. ही नक्षी किती सुंदर दिसेल नाही, असे निवांत चवीचवीने शॉपींग सुरु आहे.
सासुबाईंच्या खास फर्माईशी पुर्ण करण्यासाठी पाककृतींची सारखी उजळणी सुरु आहे. आणि दादाने माझे केस ओढल्यावर त्याचे क्रु कट असलेले केस हातात कसे पकडायचे ह्याची प्रॅक्टीस नवर्याच्या डोक्यावर सुरु आहे :). आणि थंडीमुळे बाबांच्या भेगाळलेल्या पायांना रोज रात्री कोकम तेल लावायचं बुकिंग ही आधिच करून ठेवलंय.
आई आवाजावरून जरा ( जरा बरं का आई ! :) ) दमल्यासारखी वाटतेय. तिच्यामधे नवा उत्साह भरण्यासाठी तिच्यासोबत बाहेर भरपुर भटकणार आहे आणि मनसोक्त खादाडी करणार आहे. आताच ऑर्कुट वर एका कम्युनिटी वरून बाहेर खायचे छान छान ठिकाणं उतरवुन घेतले आहेत :). चक्क लिस्ट केली आहे. नवरा कामात बिझी आहे म्हणुन नाहितर ही लिस्ट बघुन त्याने मला माझ्या वाढणार्या वजनावरून चांगलेच चिडवले असते :).
आणि हो ह्या सगळ्यांतुन वेळ काढुन मी तुम्हा सर्वांचे ब्लॉग्स देखिल वाचते आहे पण तुमचे ब्लॉग वाचता वाचता मन परत काहितरी आठवणींत हरवते आणि प्रतिक्रिया द्यायचीच राहते. त्याबाद्दल मोठ्या मनाने माफ करा बरं का :).
सकाळपासुनच माझं अतिशय आवडतं गाणं सतत गुणगुणतेय. मुळ कविता आहे कृ. ब. निकुंब ह्यांची आणि हे गाणं गायलं आहे सौ. सुमन कल्याणपुर ह्यांनी.
घाल घाल पिंगा वार्या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात!
"सुखी आहे पोर" सांग आईच्या कानात
आई भाऊ साठी परी मन खंतावतं!
विसरली का गं भादव्यात वर्सं झालं
माहेरीच्या सुखालागं मन आचवलं!
फिरून फिरून सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो!
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगनिया करी कशी गं बेजार!
परसात पारिजातकाचा सडा पडे
कधि फुलं वेचायला नेशिल तु गडे!
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय!
आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला!
हे गाणं तुम्ही ऐकु शकता इथे...
आज सोमवार, आठवडा सुरु, कामाचा दिवस म्हणुन काल रात्री सगळं आटोपुन जरा लवकरच झोपलो. त्यावेळी बाहेर पाऊस, साचलेलं पाणि आणि चिखलाव्यतिरीक्त बाकी सगळं आलबेल होतं :). मध्यरात्री मधेच जाग आली. पडल्या पडल्या खिडकितुन बाहेर बघितलं तर आकाश एकदम लखलखीत दिसत होतं. पण झोपेचा अंमल म्हणा किंवा अजुन काही मी तशिच परत झोपले. सकाळी सहाला नेहेमीप्रमाणे उठले आणि सवयीप्रमाणे स्वयंपाकघरात जाऊन पोळ्यांसाठी तवा बर्नर वर ठेवला तेव्हा सहजच नजर खिडकीबाहेर गेली. आं हे काय? बाहेर इंच अन इंच जागा बर्फाने व्यापली होती. काल रात्री इथे खुपच बर्फ पडला. आता मला काल रात्री उजळलेल्या आकाशाचं गुपीत कळलं. (इथे बर्फ पडला की रात्री आकाश सुद्धा काळ्या च्या ऐवजी दुधाळ हलक्या पांढर्या रंगाचं दिसतं.) म्हणजे स्नोफॉल ला सुरुवात कधिच झाली आहे पण काल पडलेला बर्फ हा ह्या सीझन मधला अजुनपर्यंतचा हेवी स्नोफॉल आहे. अजुनही बर्फ पडतोच आहे. ह्म्म्म्म चला खरा विंटर सुरु झाला. आता बसा 5-6 महिने घरात हातावर हात ठेवुन :).
जरी स्नोफॉल सुरु असला तरी तेव्हा ताजा ताजा पडलेला बर्फ इतका मस्त दिसतो. (नंतर सगळा चिखल आणि राडा होतो ती गोष्ट वेगळी :)). आज सकाळपासुन मी सारखे त्या बर्फाचे घरातुनच वेगवेगळे फोटो काढते आहे. बाहेर गेले तर अजुन छान फोटो काढता येतील पण सगळा जामानिमा करून जायचा आज कंटाळ आला आहे. त्यातले काही निवडक फोटो खाली टाकते आहे.
हा सकाळी सहाला काढलेला फोटो आहे. सो कॉल्ड सुर्योदय व्हायच्या आधी. सो कॉल्ड अश्यासाठी कारण मागचे 3 आठवडे बाहेर नुसता ग्रे रंग दिसतो आहे :). सुर्य, सुर्यप्रकाश कशाचेही दर्शन नाही. ह्या फोटोत जसा हलका पांढरा काहिसा दुधाळ आणि निळसर रंग दिसतो आहे, बर्फ पडला की रात्री आकाश साधारण तश्या रंगाचं दिसतं. अगदी हिमगौरी आणि सात बुटके च्या गोष्टिसारखं :).
त्याच जागेचा हा फोटो सकाळी सात वाजता काढलेला. पार्किंग लॉट मधला. मधेच डोकावुन बघितले तर एक गृहस्थ बर्फाने झाकलेल्या गाडीवरचा बर्फ साफ करत होते. पण ते गेल्यावर परत एवढा बर्फ पडला की ती गाडी परत झाकल्या गेली :).
हा फोटो काढला आहे सकाळी 9 वाजता. आमच्या घराखाली एक छोटा पार्क आहे. त्या पार्क मधिल ही झाडं. वार्यामुळे थोडा बर्फ पडला नाहितर सबंध पांढरी दिसत होती ही झाडं.
वरचे दोन्ही फोटो आमच्या घरासमोरचे. मीनी जंगल म्हणता येइल एवढी झाडं त्या जागेत आहेत. हि सगळी झाडं बघा कशी भुतासारखी दिसताहेत. झाडांच्या भुतांचं जंगल :).
बर्फाने झाकलेले टायर आणि मोडक्या फाटकातील नक्षी.
हा फोटो सगळ्यांत मजेचा. पुर्ण अंग झाकुन, 3-4 जाडजुड लेयर्स चढवुनही बाहेर 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबलो तर पायांची आग व्हायला लागते तिथे ही कावळ्यांची बाळे चक्क अर्धा तास बर्फात लोळत खेळत होती. मजा आली त्यांचे बर्फात लोळणे बघताना :).
हे सगळे फोटो काचेच्या खिडकीआडुन, ऑटो मोड वर घेतले आहेत कारण मधे काचेची खिडकी असल्यामुळे वेगळ्या ऍडजस्टमेंट्स करुन ते फोटो तेवढे चांगले येत नव्हते. त्यामुळे काही ठिकाणी ते जरा ग्रेनी आले आहेत आणि काहींचा शार्पनेस हवा तसा आला नाही. हे आपले मजेत म्हणुन काढले. बघु पुढच्या वेळेस छान बर्फ पडला की आळस झटकुन बाहेर जाण्याच प्रयत्न करेन आणि बाहेर गेलेच तर छान छान फोटो नक्की काढेन हे आज मी माझेच मला प्रॉमीस केले आहे :).
मी आणि दादा लहान असताना आमच्या घरी सतत पाहुणे असायचे. घरी कोणि पाहुणे येणार म्हटलं की आम्हा भावंडांच्या अक्षरश: अंगात येत असे. आणि त्यात जर पाहुण्यांना आमच्या वयाची मुलं असली की विचारायलाच नको. आमचा धुमाकुळ बघुन आईचा चेहरा मात्र बघण्यासारखा व्हायचा. आमची आई स्वभावाने अगदी गरीब आणि बाबा प्रचंड प्रेमळ असले तरी जमदग्निचा अवतार त्यामुळे बाबांनी अगदी वेळेवर जरी सांगितले की पाहुणे येणार आहेत तरी कपडे बदलुन बाहेर निघालेली आई निमुटपणे परत घरात कामाला लागलेली मला आठवते आहे.
आता मला जेव्हा या पाहुण्यांना तोंड द्यावं लागतं तेव्हा सारखी मला आई(आणि देव पण)आठवते. काय कुणास ठाऊक पण आमच्या राशीला सदैव पाहुणे लागलेले असतात :). माझा बोलघेवडा स्वभाव आणि नवर्याचा काय वाटेल ते झालं तरी नाही म्हणणार नाही चा नारा. त्यामुळे आओ जाओ घर तुम्हारा. आता तर आम्ही आदरातिथ्यात एकदम एक्स्पर्ट :) आणि प्रसिद्धही :( झालो आहोत.
आमच्या सोयीसाठी मी आणि नवर्याने पाहुण्यांची ढोबळमानाने दोन ग्रुप्स मधे विभागणी केली आहे. पहिला - भेटायला येऊन जेवुन खाऊन जाणारे पाहुणे आणि दुसरा - घरी रहायला येणारे पाहुणे. आणि दोन्ही प्रकारच्या पाहुण्यांचे इक्वली वाईट अनुभव आलेले आहेत. तरी त्यातल्यात्यात भेटायला येऊन जेवुन खाऊन जाणारे पाहुणे परवडले. मी लिहिणार आहे दोन्ही पाहुण्यांवर पण आजचा मान पटकावला आहे घरी रहायला येणार्या पाहुण्यांनी :).
आमचं नुकतंच लग्नं झालं होतं. आम्ही स्वत:च सेटल होत होतो अशात नवर्याने वर्दी दिली की त्याच्या मित्राची बदली त्याच गावात झाली असल्या कारणाने सुरवातिचे 10-12 दिवस तो आणि त्याची बायको आपल्या सोबत राह्तील. मी अगदी आनंदाने होकार दिला. नाहितरी मला तिथे कोणि मैत्रिण नव्हती त्यामुळे मी एकदम खुश. नवरा मात्र गालातल्या गालात हसत होता. पण माझ्या आनंदापुढे मी त्याच्या हसण्याकडे तेव्हा लक्षच दिलं नाही. आता मला कळतंय त्याला एवढं हसु कसलं येत होतं ते :). ते घर 4 खोल्यांच होतं. बैठकिची खोली, स्वयंपाकघर, आमची बेडरूम आणि देवघर. त्यांची व्यवस्था देवघरात केली होती. ठरल्या दिवशी आले. सुरवातिला एकदम मोकळे फ्रेंडली वाटले मनात म्हटलं चला सुरूवात तर छान झाली. पण नंतर वागण्याची एक एक तर्हा बघायला मिळाली. त्या मित्राची बायको 4 महिन्यांची प्रेग्नंट होती. त्यामुळे आधिच माझ्यावर जरा दडपण होतं. मी नवीन लग्न झालेली. काय खायला द्यायचं कसं द्यायचं एकुणच काही महिती नव्हतं. ती आरामात उठायची सकळी 9.30 / 10.00 ला. मग बाईसाहेबांना पलंगावरच आधि बेड टी द्यावा लागायचा. आधि हातात पाणि द्या मग चहा द्या. मग निवांत कधि कप तर कधि 2 कप चहापान व्हायचं. मग डुलतडुलत जायची आन्हिकं आटोपायला. आंघोळ झाली की मेक अप करून तयार व्हायला परत अर्धा तास. मला कळायचा नाही की घरीच तर बसायचं आहे तर मेक अप कशाला. मी आपली सकाळी सहाला उठुन केर वारे करून भराभर आंघोळ आटोपली की जो बुचडा बांधायची तो बाहेर जायचं नसेल तर तसाच. मग कपडे भिजवा, नाश्ता बनवा. नवर्याला द्या त्याच्या मित्राला द्या. ते दोघे नाश्ता करून निघुन जायचे. मग ती तयार झाली की हातात गरम नाश्ता परत कप 2 कप चहा. असा मनसोक्त नाश्ता झाला की निघुन जायची तिच्या एका मैत्रिणीकडे. मी परत घर आवर, जेवणाची तयारी कर. ह्यात वेळ जायचा. जेवायच्या वेळेला नवरा बायको यायचे जेवायचे आणि परत दुपारची झोप काढायला आपल्या खोलीत निघुन जायचे. झोप झाली की परत चहा आणि तयार होऊन बाहेर गेले की थेट रात्री साडे नऊ ला जेवायला यायचे. परत रात्रीचे जेवण झाले की त्यांच्यासोबत पत्ते खेळा. नाही म्हणायची सोय नाही कारण पाहुणचार करण्याचा पहिला वहिला अनुभव स्पॉइलस्पोर्ट व्हायचे नव्हते :). ते आरामात उठायचे त्यामुळे त्यांना झोप यायची नाही आणि मी डुलक्या घेत घेत आपले पत्ते दाखवत दाखवत कसाबसा खेळ संपायची वाट बघायची. एक दिवस तर तो मित्र चक्क घरातच नखं कापुन फरशीवर टाकत होता. मी म्हटलं अरे खाली पेपर वगैरे घे आताच केर फरशी झाली आहे. तर त्यावर हसुन म्हणाला काही होत नाही. मला अशिच सवय आहे आमच्याकडे आम्ही असेच करतो. ह्यावर काय बोलणार? त्याची बायको रेस्टरूम ला ज्या चपला घालुन जायची त्याच चपला घरभर वापरायची. मला किळस यायची. शिवाय त्यांची सोय देवखोलीत केली होती तिथेही ती त्याच चपला घालुन जायची. मला रहावलं नाही. तिला म्हटलं अगं निदान देवखोलीत तरी त्या चपला वपरू नकोस तर म्हणे आमच्या घरी आम्ही त्याच चपला वापरतो. मग मात्र मी तिला म्हटलं की तुल रेस्टरूम ला जायला आणि घरात वापरायला दोन वेगळे जोड देते मी. त्याच चपला घालु नकोस. एकुणच जरा त्रासदायक प्रकरण झालं. त्रास झाला तो झाला आणि वर अभ्यास पण बुडला तो वेगळाच.
त्यानंतर चा अनुभव आला दिड वर्षांपूर्वी. नवर्याने नेहेमीप्रमाणे या या घर आपलेच आहे म्हटल्यावर कोण नाही येणार? एक कुटुंब मुंबईला जायला निघाले होते. त्यांची आमची अजिबात ओळख नव्हती. केवळ नाव ऐकुन होतो. त्यांच्या गावापासुन डायरेक्ट फ्लाईट नसल्यामुळे आमच्याकडे 2 दिवस राहुन मग पुढे जाणार होते. गृहस्थ बायको आणि 2 मुलिंना सोडायला आले होते. मुंबईला बायको आणि पोरी तिघी जाणार होत्या आणि त्यांचे बाबा कामाच्या गावी परत जाणार होते. बाप रे ती बाई म्हणजे भयंकर प्रकरण होतं. तिच्या त्या दोघि पोरी बास हा शेवटचा दिवस असं मानुन धिंगाणा घालत होत्या. लिविंग रूम चं अक्षरश: समरांगण झालं होतं. सोफ्यावरचे सगळे कुशन्स खाली होते. कुठे कुठे जास्त धसमुसळे पणा केल्यामुळे उसवले होते. झाडांची पाने तोडुन घरभर विखुरली होती. डायनिंग टेबल च्या खुर्च्या बैठकिच्या खोलीत आणि सोफ्याचे सिंगल सिटर डायनिंग रूम मधे. लेकीच्या खेळण्यांची तर पार वाट लावली होती. लेकिच्या गोष्टिच्या आणि कवितांच्या पुस्तकांनी मारामारी केल्यामुळे सगळी पुस्तकं खिळखिळी झाली होती आणि काही काही पानं सुटी झाली होती. हे सगळं होत असताना त्या पोरींची आई मस्त बसुन होती आणि म्हणत होती मी ह्यांना सांभाळु शकत नाही. आपली पोरं एका अनोळख्या घरी धिंगाणा घालत असताना कोणि इतकं शांत कसं बसु शकत आश्चर्यच आहे. लेक तेव्हा अगदीच तान्ही काही महिन्यांची होती. मदतीला घरात कोणि नाही. नवरा पण नेमका तो आठवडा ऑफिसच्या कामाने गावाबाहेर गेला होता. बरं त्या पोरी वाढत्या वयाच्या त्यांना सारखी भुक लागायची. मग त्यांना खायला द्या. वर परत आंटी ये नही वो चाहिये. रिपीट नही चाहिये. अश्या फर्माईशी. आणि आई जणु काही आराम करायलाच आली होती. सारखं कुकिंग नाहितर भांडी घासणे (हाताने कारण डिशवॉशर नाहिये :)), व्हॅक्युम करणे, कपडे धुणे हेच सुरु होतं. एक दिवस त्या बाईला रात्रिचं जेवण बनवायला सांगितलं तर येत नाही म्हणुन तिने सरळ हात वर केले. मधे त्या बाईच्या नवर्याचा फोन आला तो तिला विचारत होता की कशि आहेस तर निर्लज्ज बाई म्हणते की मला नको रोहिणीलाच विचार कशि आहेस ते. तिला जास्त गरज आहे. अस्सा राग आला होता. मला अक्षरश: तिच्या झिंज्या उपटाव्याश्या वाटल्या :).. अशात त्यांची फ्लाईट रद्द झाली आणि पुढची फ्लाईट 4 दिवसानंतरची होती. फारच त्रासाचा ठरला तो आठवडा.
त्यानंतर चा अनुभव आला 7-8 महिन्यांपूर्वी. मी आईकडे गेले होते. नवरा आम्ही गेल्यावर 15 दिवसांनंतर येणार होता. नवर्याची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणुन मी त्याच्यासाठी बर्याच पोळ्या आणि पराठे बनवुन गेले होते. 15 दिवसांनी नवरा आल्याआल्या त्याला एक मेल आली. आमच्या परिचितांपैकी एका बाईला 4-5 दिवस आमचं घर रहायला हवं होतं कारण तिने भाड्याने घेतलेले घर रीपेयर्स साठी बंद होतं. आम्ही विचार केला ठिक आहे. नाहितरी घर रिकामं आहे. आणि ती बाई तिथे राहिली तरी आपल्याला काही करावं लागणार नाही. पण घरी परत आल्यावर डोक्याला हात लावुन घ्यायची वेळ आली. एक तर ती बाई 4-5 दिवस म्हणुन प्रत्यक्षात 15 दिवस राहिली. तिने फ्रिजमधल्या सगळ्या भाज्या संपवल्या होत्या. ग्रोसरी संपवली होती. दुध सगळं संपवलं. कॉलिंग कार्ड सगळं वापरलं. व्हॅक्युम केलं नाही. त्यामुळे घरात सगळीकडे धुळ झाली होती. मी नवर्यासाठी लाटलेल्या पोळ्या आणि पराठे नवर्यानेही खाल्ले नव्हते. त्याने ते वाचवुन ठेवले ह्या विचाराने की आल्याआल्या बायकोला परत लाटायला नको. तर ह्या बाईने त्या सगळ्या पोळ्या आणि पराठे सुद्धा संपवले. रेस्टरूम मधे कमोड वापरलं ते सुद्धा स्वच्छ केलं नाही आणि वर पडलेले पिवळे डाग दिसायला नको म्हणुन वरती हार्पिक घालुन ठेवलं होतं. फ्लश केल्यावर तिने केलेला चालुपणा लक्षात आला. ग्रोसरी, दुध, फळं भाज्या वापरल्या ते ठिक आहे. पण निदान परत घरात आणुन तरी ठेवावं. खाली दुकान आहे. असही नाही की 4 कोस जावं लागतं. आणि डोक्यात तिडिक गेली की गावात पाय ठेवल्या ठेवल्या घरी परतत असताना तिने फोन केला की घरात दुध संपलं आहे. तुमच्या मुलीसाठी लागेल तेव्हा घरी येता येता रस्त्यात थांबुन विकत घ्या म्हनजे फजिती होणार नाही. संताप झाला नुसता. घराखाली दुकान आहे तर म्हणे मला दिसलं नाही. ही बाई स्वत: ह्या गावात 4 वर्षांपासुन नोकरी करतेय. खालचं दुकान नाही सापडलं तर अजुन माहिती असलेल्या दुकानातुन वस्तु आणता आल्या असत्या. एवढं करूनही वर आभार नाही की दिलगिरी नाही. अगदी हद्द च केली त्या बाईने :(.
हे काही ठळक अनुभव. बारीक सारीक अनुभव तर बरेच आहेत. त्यामुळे आता पाहुणे यायचे म्हटले की अंगावर काटाच येतो. ते पाहुणे नको, शारिरीक, मानसिक आणि आर्थिक झीज नको आणि एकुणच होणारा मन:स्ताप ही नको.
काल दुपारी सहजच मी जुने फोटो बघत होते. आमचं लग्न झाल्यानंतरचे फोटो... बाप रे नवरा किती बारीक दिसतो आहे आणि मी कसली बावळट दिसते आहे असे काही बाही कमेंट्स टाकत त्या फोटोंचं मी चविष्टपणे रसग्रहण करत होते :)... आणि एकापाठोपाठ एक अश्या अनेक कडु गोड आठवणी यायला लागल्या. कडु कमी आणि गोडच जास्त.
आमचं लग्न झालं तेव्हा मी आणि नवरा आम्ही दोघेही शिकत होतो. त्यामुळे मॅरीड स्टुडंट म्हणुन आम्हाला रहायाला घर मिळालं होतं. घर कसलं अगदी रानावनात असलेलं चंद्रमोळी (सिमेंटच) झोपडंच होतं. आजुबाजुला गर्द वनराई आणि सोबतिला असंख्य पक्षी आणि प्राणी. दोन पायाचे, चार पायाचे आणि सरपटणारे सुद्धा :).
तर आम्ही जेव्हा त्या घरात पाय ठेवला तेव्हा आमच्याकडे प्रत्येकी 2 सुटकेसेस, पुस्तकं आता बाहेर पडतात की काय इतक्या ठासुन भरलेल्या पुस्तकांच्या 4 ट्रंका, स्वयंपाकाच्या भांड्यांचं आणि त्यातच देव इत्यादी असलेलं एक आणि मसाले आणि इतर राशन असलेलं एक अशि दोन छोटी खोकी एवढंच सामान होतं. मला अजुनही आठवतय की गृहप्रवेशाच्या वेळेस सुद्धा शेजारच्या सरदारजी घरातुन कुंकु आणलं होतं. गृहप्रवेश तर झाला. घरात गेल्या गेल्या लक्षात आलं की अरे सगळीकडे नुसत्या मोठ्यामोठ्या काचेच्या खिडक्याच आहेत. आणि आपल्याकडे तर परदेच नाहीत. मग काय भराभर आपआपल्या सुटकेसेस उघडुन पांघरायच्या चादरी आणि माझ्या ओढण्या काढल्या आणि तात्पुरती परद्यांची सोय झाली.
हळुहळु संसार करायला आणि घर चालवायला काय काय लागतं ह्याचा अंदाज यायला लागला. नवरा 12 वी नंतर कायम घराबाहेरच होता आणि अश्या ठिकाणी होता जिथे त्याचा आणि चुलीचा काहीही संबंध आला नाही. त्यामुळे स्वयंपाक करण्याची जबाबदारी आपसुकच पुर्णपणे माझ्यावरच होती. मला स्वयंपाक करता येत होता पण पुर्वी कधी जबाबदारी घेऊन करायची वेळच आली नव्हती ती आता आली होती. पण तरी सुरवातिचे काही दिवस जेव्हा दोघांनाही खुप भुक लागायची आणि पोटात कावळे कोकलायला लागायचे तेव्हा लक्षात यायचं बाप रे अजुन काहिच शिजवलेलं नाहिये. मग काय भराभर वरण भाताचा कुकर लावायचा. त्यावरून आमची परत भांडणं व्हायची कारण नवरा भाताचा कट्टर विरोधक होता आणि मी म्हणायचे की कणिक भिजवुन पोळ्या करायच्या आणि भाजी चिरून फोडणिला टाकायची त्यापेक्षा वरण भात लवकर होतो. आणि तसही नवरा कोकणस्थ आणि मी माहेरून देशस्थ त्यामुळे मला काही आमटी जमायची नाही आणि फोडणिचं वरण त्याच्या पसंतीस उतरायचं नाही त्यामुळे परत कुरकुर :).
आम्ही ज्या गावी राहायचो तिथे प्रचंड ह्युमिडिटी होती. त्यामुळे अन्न लवकर खराब व्हायचं म्हणुन मग तातडिने आधि फ्रिज घेतला. पण मला ह्युमिडीटीची अजिबातच सवय नसल्यामुळे मला खुपच त्रास व्हायला लागला. म्हणुन मग एसी घेतला. आम्ही राहायचो ते शैक्षणिक संस्थेच्या आवारात. तिथुन गाव होतं 12-15 किमी अंतरावर. मग घर लावायचं आणि चालवायचं म्हणजे भाजीपाला किराणा व इतर सामान आणायला तर बाहेर पडायलाच हवं. जायला यायला सोय व्हावी म्हणुन मग वाहन घेतलं कारण प्रत्येक वेळी वाहन हायर करून जाण्यापेक्षा स्वत:चे वाहन घेणे स्वस्त पडते. ह्या सगळ्या खर्चांमुळे आमची सगळी शिल्लक कामी आली. मग परदे घेणं पुढे ढकललं :) तात्पुरत्या परद्यांवर आम्ही खुश होतो :). मग आम्ही एक यादी केली होती. त्यात गरजेप्रमाणे प्रत्येक महिन्यात काय घ्यायचे हे लिहिले होते. त्यात परद्यांचा नंबर 5 महिन्यांनी आला आणि मिक्सर / फूड प्रोसेसरचा दिड वर्षाने :). तोवर आम्ही सगळं काम खलबत्त्यावर केलं :).
सुरवातीचे काही महिने आमच्या ज्या पुस्तकांच्या ट्रंका होत्या त्याच बैठकिच्या खोलीत बसायला वापरायचो. त्या जरा जुन्या होत्या. त्यामुळे त्यावर कोणि बसलं की लगेच त्या कुरकुरायच्या आणि मला हसु आवरायचं नाही :). पलंग येईपर्यंत आमची वळकटी आणि सिमेंटची फरशी यांची घट्ट मैत्री झाली होती. हळुहळु सामन जमत गेलं आणि आमचं बस्तान बसत गेलं. हे सगळं सुरू असताना एकिकडे अभ्यास, परिक्षा, असाईनमेंट्स , प्रोज़ेक्ट्स सुरूच होते. आम्ही दोघेही दोन वेगवेगळ्या खोलीत बसुन अभ्यास करायचो. तो त्यच्या लॅपटॉपवर मी माझ्या. तेव्हा एकाच घरात रहात असुन सुद्धा आम्ही तासंतास गूगल टॉक वर चॅट करायचो :). खुप मजा यायची. एकीकडे एसी, फ्रिज, लॅपटॉप( शैक्षणिक संस्थेच्या आवारात राहात असल्यामुळे इंटरनेट फ्री होते :))आणि दुसरीकडे बसायाला ट्रंका, झोपायला वळकटी आणि दारांना परद्यांच्या ऐवजी चादरी आणि ओढण्या असा प्रचंड विरोधाभास आमच्या घरी होता :). आणि आम्ही त्यात खुश होतो कारण तो आमचाच निर्णय होता. दोघांच्याही पालकांनी वेळोवेळी काहितरी निमित्याने, प्रसंगाने आम्हाला मदत करायचा प्रयत्न केला. पण आम्हाला आमचं घर उभारायच होतं ते आमच्या आई बाबांसारखच. आपल्या हिमतीवर, मेहनतीवर आणि नशिबावर. त्यामुळे जे जसं होतं त्यात आम्ही खुप खुश आणि पुर्णपणे समाधानी होतो आणि आहोत :).
आमच्या त्या घराला मागे एक छानसं अंगण होतं. तिथे रोज सकाळी मोर यायचा. पुढे पुढे आमची त्या मोराशी दोस्ती झाली तो आला की रोज मी त्याला काही काही खायला द्यायचे. आणि त्याच्याशी खुप गप्पा मारायचे :). त्याला ब्रेड खुप आवडायचा. ब्रेड चे तुकडे टाकले की अगदी खुश व्हायचा आणि खाऊन झाल्यावर कधि ठुमकत ठुमकत अगंणभर फिरायचा नाहितर आपल्या पिसांचा पसारा फुलवुन माझ्यासाठी खास नाच करायचा. नवर्याने काढलेले त्याचे फोटो आणि व्हिडीओ अजुन जपुन ठेवले आहेत आणि त्याने मला भेट दिलेले एक छानसे मोरपीस सुद्धा :).
खुप छान होते ते दिवस. रोज समोर एक नवं आव्हान असायचं. व्यक्तिगत नाहितर व्यावसायिक. पण दोघांनी मिळुन त्या सगळ्या प्रॉब्लेम्स ना तोंड द्यायला मजा यायची. नवर्याची साथ खमकी आणि खंबीर होती पण मायेचा हळुवार ओलावा सुद्धा होता. आजुबाजुचे लग्न झालेले मित्र मैत्रीणी बघितले आणि आमच्याकडे बघितलं की आम्हाला वाटायचच नाही की खरच आपलं लग्न झालेलं आहे. मला तर कायमच वाटायच की हा अजुनही माझा मित्रच आहे नवरा नाही. आणि नवर्याचेही माझ्याबद्दल काही वेगळे मत नव्हते :).
मी काल जो अल्बम बघत होते तो ह्याचमुळे केवळ फोटोंचा अल्बम नसुन सगळ्या आठवणिंचाच अल्बम आहे. ह्या सगळ्या आठवणी म्हणजे एखाद्या अस्सल अत्तराच्या कुपीसारख्या आहेत. कुपीतलं अत्तर कसं कुपी उघडल्याबरोबर बाहेरचं वातावरण गंधमुग्ध करतं. तश्याच ह्या आठवणी. पावसाच्या सरीसारख्या एकापाठोपाठ एक सरसरत येतात आणि कुपीतल्या अत्तरासारखा माझा उरलेला दिवस मुग्धतेने भारलेला करून जातात.
काल झी मराठी वर हसा चकटफू चा जुना भाग बघत होते... तो एपिसोड दीवाळी विषेश होता. त्यात एक सेल्समन फराळाच्या वेगवेगळ्या वासांचे परफ्युम्स विकत होता. जरा हटकेच कल्पना. तेव्हाच लक्षात आलं की आपल्या मनात / डोक्यात कितीतरी वास घर करुन असतात. दीवाळी च्या नुसत्या आठवणिनेच आपसुकच नाकाला फराळाच्या पदार्थांचे वास येऊ लागतात. मी लहान असताना आई मला विचारायची 'अगं रवा भाजल्याचा वास आला का गं?' किंवा 'बेसनाचा खमंग वास येतोय ना?' तेव्हा मी असायचे खेळत नाहितर दीवाळीचा होमवर्क पुर्ण करत. आणि आई फक्त मलाच विचारायची असं नाही तर त्यावेळेस घरात जो कोण असेल प्रत्येकाला विचारायची. आणि प्रत्येकाचा होकार आला की मगच तिचं समाधान व्हायचं. तिचं पदार्थ करण्याचं गणित असं बरेचदा वासावर अवलंबुन असायचं. तेव्हा मला तो प्रकार जरा गमतिशीर वाटायचा पण माझ्याही नकळत पुढे मी सुद्धा स्वयंपाक करताना वासावर काही गोष्टी ठरवु लागले.
असाच एक वास माझ्या मनात घर करुन बसलाय तो म्हणजे एका खोलीचा. बाबांच्या गावी आमचा खुप मोठा वाडा होता. त्यात एक प्रशस्त असे देवघर होते. जरासे अंधारे. पण तिथे मला खुप छान वाटायचे. एकप्रकारचा शांतपणा असायचा त्या खोलीत. आजोबा दररोज सकाळी तास दोन तास तिथे पुजा करायचे. मग उगाळलेलं चंदन, देवासमोर लावलेली मंद वासाची उदबत्ती, घरची ताजी खुडुन वाहिलेली मोगरा, गुलाब, कण्हेर, स्वस्तिक, जाई, जुई आणि चमेलीची फुलं, नुकतीच शांत झालेली समई आणि निरांजन, असा सगळ्यांचा मिळुन एक खुप छान प्रसन्न पण शांत, एक प्रकारचा गुढ गंभिरपणा असलेल्या वासाने ती खोली भरून जायची.
नव्या पुस्तकांचा वास कुणाला आवडत नाही? मी आणि दादा शाळा सुरु व्हायच्या आधी बाबांसोबत उड्या मारत जायचो नवीन वह्या पुस्तकं आणायला. तेव्हा अभ्यासाची ओढ कमी आणि त्या कोर्या वासाचेच आकर्षण जास्त असायचे. ती नवी कोरी न हाताळलेली पुस्तकं, त्यांना येणारा छापखान्यातील शाहिचा निसटता ओला वास, करकर वाजणारी नवी पानं आणि काही चिकटलेली पाने मिळाली तर खजिना सापडल्याचा आनंद. कारण ती चिकटलेली पाने सोडवायला मला आणि दादाला भयंकर आवडायचे आणि बरेचदा आमची त्यावरुन भांडणे पण झाली आहेत :) ... आई बाबांनी आम्हाला वाचनाची गोडी लागावी म्हणुन, वाचनालय चा निटस उच्चार सुद्धा करता येत नव्हता त्या वयापासुन आमच्यासाठी लहान मुलांच्या वाचनालयाची मेंबरशिप घेतली. तरीसुद्धा पुढे कधिमधी चंपक, चांदोबा, कुमार, कीशोर अशी नविन मासिक विकत आणली की सगळ्यात आधि मी त्या पुस्तकांचा भरभरुन वास घ्यायचे :).
मला आवडणारा आणि माझ्या मनात घर करून बसलेला असाच एक वास म्हणजे माझी आई जी उशी वापरते त्या उशीचा वास. त्या उशीला शिकेकाईचा मंद सुवास येतो. माझी आई अजुनही केस धुवायला शिकेकाईच वापरते. त्यामुळे तिच्या केसांना जसा शिकेकाईचा सुंदर वास येतो तसाच तिच्या उशीलाही येतो. आताही मी जेव्हा केव्हा माहेरी जाते मला आईच्या उशीवर डोके ठेवुन झोपायला खुप आवडते.
मला आणि बहुतेकांना आवडणारा असाच एक वास म्हणजे लहान बाळांचा वास. लहान बाळांना काय सुंदर वास येतो. नुकतेच न्हाऊ माखु घातल्याचा वास, मालिश केलेल्या तेलाचा वास, मऊ उबदार मलमलच्या कपड्यांचा वास, जावळाचा वास, मऊ मऊ हाताचा वास, आणि कळस म्हणजे जॉन्सन च्या पावडर चा वास. मन कितीही उदास झालं असेल, राग आला असेल, हताश वाटत असेल तरीही लहान बाळाला छातीशी घट्ट धरलं आणि भरभरून त्याचा वास आपल्या नाकात भरुन घेतला की कसं आश्वासक वाटतं. अनुभव घेतला नसेल तर नक्की घेऊन बघा मी काय म्हणते ह्याची कल्पना तुम्हाला येईल.
मला अजुन एक आवडणारा वास म्हणजे बैंगनफल्ली आंब्याचा. आता काही जण म्हणतील हा कुठला बरं आंबा? विदर्भातल्या लोकांना तर सांगायलाच नको. पण बाकिच्यांना हा आंबा कदाचित बदामी आंबा म्हणुन ठाऊक असेल. आम्ही खुप लहान असताना नागपुरला हापुस आंबा काही मिळायचा नाही. त्यामुळे आंबा म्हणजे बैंगनफल्ली असं समीकरण डोक्यात फिट्ट बसलं होतं. बैंगंफल्लीचा रस, मिल्कशेक, किंवा तोच रस आणि मिल्कशेक उरवून आता जात नाहिये मला म्हणुन गुपचुप फ्रिज मधे जमवलेलं आणि नंतर दादाला चिडवत चिडवत खाल्लेलं आईसक्रिम आणि कुल्फी, ते खाल्ल्यावर डेझर्ट कुलर च्या गारव्यात आईच्या जुन्या सुती साड्यांची पांघरलेली गोधडी आणि साखर(आंबा)झोपेत सरलेली रणरणती दुपार. अश्या बर्याच आठवणी ह्या आंब्याशी जोडल्या आहेत. पुण्याला येईपर्यंत तर मला हापुस आंबा अजिबात आवडत नसे. आता माझं मलाच खरं वाटत नाही. पण तेव्हा हापुस विरुद्ध बैगनफल्ली ह्या लढाईत बैंगनफल्ली साठी प्राणापलिकडे लढायची. मग हळुहळु हापुस वरचा राग ओसरला.असली हापुस आंब्याची गोडी कळली आणि हापुस आंबा माझा झाला. पण आजही कदाचित हापुस आणि बैगनफल्ली दोन्ही आंबे माझ्यासमोर ठेवले तर कदाचित माझ्या लहानपणिच्या सुवासाच्या आठवणी परत ताज्या करण्यासाठी कुणासठाऊक मी बैंगनफल्लीच उचलेन :).
आता मी तुम्हाला सांगेन तर तुम्ही हसाल पण मला ना पेट्रोल चा वास प्रचंड आवडतो. काही जण नाकं मुरडतील ही कसली आवड. पण खरच मला पेट्रोल चा वास खुप आवडतो. त्यामुळे मी लहान असताना जेव्हा केव्हा बाबा पेट्रोल भरायला जायचे तेव्हा मला जायचच असयाच त्यांच्या सोबत. बाबांना तेव्हा ही आवड काही माहिती नव्हती. आता हा लेख वाचल्यावर मात्र बाबांना कळेल की लहान असताना पेट्रोल भरायला जाताना का जायचा हट्ट करायची.
असे अजुन बरेच वास माझ्या मनात रुजले आहेत. आय आय टी मधे असताना सगळ्या मोसमात रस्त्यांच्या दुतर्फा भरलेल्या, फुललेल्या आणि लगड्लेल्या झाडांचा वास, शेजारच्या बेकरीमधे भाजल्या जाणार्या ताज्या ब्रेड चा वास, आजीने घातलेल्या आणि नाकाला झोंबणार्या लाल मिरचीच्या चुरचुरीत फोडणीचा वास, शेणाचा सडा घातलेल्या ओल्या अंगणाचा वास, नवर्याने रोज सकाळी पुजा केली की त्याच्या हाताला येणारा अष्टगंधाचा वास आणि असेच अनेक वास. लिहायला बसले तर प्रत्येकावर एक एक स्वतंत्र लेख होईल. पण तूर्तास इथेच थांबवते :). Wish you a fragranceful day ahead :).
फोटो - गुगल इमेजेस वरून.
आज माझा ब्लॉग बघता बघता 3 वर्षांचा झाला. ब्लॉगर वर खाते उघडले जुलै 06 मधे पण पहिली पोस्ट टाकली 19 ऑक्टोबर 06 ला त्यामुळे तोच खरा जन्मदिवस.
हा केक खास माझ्या ब्लॉग साठी...
ब्लॉग ची सुरुवात खरतर एकटेपणातुन झाली... म्हणजे नवरा होताच ( इनफॅक्ट ब्लॉग सुरु करायला नवर्यानेच प्रोत्साहन दिलं आणि ब्लॉगर वर खातेदेखिल त्यानेच उघडुन दिले. ) पण त्यावेळी आम्ही दोघेही शिकत होतो, आपापल्या लोकांपासुन, घरापासुन आणि गावापासुन दूर. आणि बरिचशी दोन ध्रुवावर दोघे आपण अशिच गत होती. मला सुटी तर त्याची परीक्षा आणि त्याला सुटी तर माझी परीक्षा. मग बरच काही बाही मी ब्लॉग वर लिहायची अगदी एखाद्या डायरी प्रमाणे. जे मनाला येईल ते, जे वाटेल ते आणि जसं वाटेल तसं. अगदी एव्हरीथिंग अंडर द सन. (आता मागे जाऊन बघु नका ;) त्या पोस्ट्स मी पब्लिक केलेल्या नाहीत. :-) )
ब्लॉग सुरु केल्यावर एक वर्ष अभ्यास आणि संसार सांभाळून माझ्यापरीने नियमीत पोस्ट टाकण्याचा प्रयत्न केला. पण नंतर दोघात तिसर्याच्या नुसत्या चाहुलीनेच अगदी दाणादाण उडवुन दिली. परत काही महिने ब्रेक घेतला परत थोड्याफार पोस्ट्स टाकल्या. पण कन्येच्या प्रत्यक्ष आगमनानंतर मात्र जवळजवळ एक वर्ष मी काहिही लिहिले नाही.
गेल्या जुनपासुन परत लिहायला घेतलं. फार काही लिहिलं नाही. उगाच आपली बाष्कळ बडबड. पण लिहिती झाली ह्याचच समाधान.
ह्या सर्व दिवसांत, वर्षांत लिहित असताना किंवा नसताना मराठीब्लॉग्स मात्र अगदी रेग्युलर बघत होते वाचत होते. परत लिहायला लागले ह्याचे सगळे श्रेय मी मराठीब्लॉग्स वरच्या सर्व ब्लॉगर्सना देते ज्यांच्यामुळे मला लिहायचा हुरुप आला. आणि त्यांच्या एनकरेजिंग कॉमेंट्स मुळे अजुनतरी तो उत्साह टिकुन आहे.
आज माझ्या लाडक्या ब्लॉग च्या वाढदिवसाचे निमित्य साधुन अजुन गोष्ट सांगायची म्हणजे लवकरच ह्या ब्लॉग ला एक भावंड आणण्याचा विचार आहे. पाककृतिंवर आधारित आपला एक ब्लॉग सुरु करावा असा बरेच दिवसांचा विचार प्रत्यक्षात आणावा म्हणतेय. ( आता तुमच्यापैकी काही जण म्हणतिल की एक ब्लॉग सांभाळुन होत नाही तिथे हा दुसरा ब्लॉग? ) पण असो प्रयत्न करुन बघायला काय हरकत आहे नाहि का? तर ह्या नव्या ब्लॉग चं नाव काही केल्या सुचत नाहिये. तुम्हाला सुचलं तर मला नक्की सांगा.
विषयांतर व्हायच्या आत ही पोस्ट इथेच संपवते. :-).
Happy B'day to you my dear blog. May you live all the days of your life. :-)
फोटो - गुगल इमेजेस वरून.
सर्व ब्लॉगर मित्र - मैत्रिणिंना आणि असंख्य वाचकांना दिवाळीच्या अनेक हार्दीक शुभेच्छा. ही दिवाळी आपणा सगळ्यांना सुख, सम्रुद्धी, समाधान आणि आरोग्यपुर्ण जावो.
दिवाळीचे निमित्य साधुन मी तीन वर्षांपूर्वी ह्याच ब्लॉग वर टाकलेली कविता आज परत येथे देत आहे.
अंधाराचा ठाव घेती
दिवाळीचे दिवे,
आसमंत उजळतील
तुझे माझे दिवे.
लक्ष लक्ष तेवतील
स्नेहार्द्र दिवे,
प्रीतगंध दरवळतील
प्रेमाचे दिवे.
तुझ्या माझ्या प्रितीची
साक्ष आहेत दिवे,
शब्द मुकी होतात
आणि बोलु लागतात दिवे ...
फोटो - गुगल इमेजेस वरून.
24 तारखेला सकाळी लवकर उठलो... भराभर सगळं आटोपुन हॉटेल मधेच नाश्ता केला आणि हेलसिंकी साठी निघालो. सेंट पिटर्सबर्ग ते हेलसिंकी हे अंतर साधारण 400 किमी आहे..म्हणजे खरं तर 4 तासांचा प्रवास. पण मधे बॉर्डर क्रॉसिंग असल्यामुळे आणि गर्दी मुळे आम्हाला वेळ लागला. फिनलॅंड मधे प्रवेश केल्यावर खर्या अर्थाने आमची स्कॅंडिनेवीया ची ट्रिप सुरु झाली. रस्ता खुप काही मोठा नव्हता. 2 ते 3 लेन्स दोन्ही बाजुनी एवढाच असेल पण होता मात्र एकदम गुळगुळीत... छोट्या छोट्या टुमदार गावांमधुन वळणं घेत घेत मधे मधे समुद्राला विळखे घालत घालत आमचा प्रवास मजेत सुरु होता. जेव्हा कुठलं छोटसं गाव समुद्रकिनारी असे तिथे लोकांच्या छोट्या छोट्या फेरी बोट्स किनार्यापाशी बांधुन ठेवलेल्या असत. वेगवेगळ्या रंगांच्या वेगवेगळी नक्षी काढलेल्या त्या छोट्या बोटी इतक्या मस्त दिसत होत्या. बरेच जण उन्हाळा असल्यामुळे आपला पुर्ण कुटुंब कबिला घेउन समुद्रसफरी वर निघाले होते... सगळीकडे उत्साही वातावरण जाणवत होतं.
जस जसं आम्ही हेलसिंकी च्या जवळ जात होतो तसतशी कंट्रीसाईड बदलत होती.... सर्वदुर पसरलेली हिरवीगार कुरणं, त्यावर चरणारे बैल, गाय, मेंढ्या ई. प्राणी, मधेच सोनपिवळ्या फुलांचा गालिचा घातलेली शेते, बंगलीवजा दिसणारी; छोटिशी तरीही देखणी रंगीबेरंगी लाकडी घरे आणि हमखास उठुन दिसणारे युरोपीयन स्टाईल चर्च. किती पाहु आणि किती नाही असे होत होते. पण एवढ्या सगळ्या देखाव्यात एक गोष्ट आमच्या लक्षातच आली नव्हती की आमचा जीपीएस नीट काम करत नव्हता. ( हे आम्हाला हेलसिंकी ला पोचल्यावर कळलं :-) ) एक तर तसा सरळ सरळ रस्ता होता आणि शिवाय साईनबोर्ड्स होते त्यामुळे आम्ही जीपीएस कडे बघितलं सुद्धा नव्हतं. आम्ही साधारण 4 च्या सुमारास हेलसिंकी ला पोचलो. आणि सरळ आधि टुरीस्ट इनफॉरमेशन ऑफिस गाठलं. ते सरळ रस्त्यावरच असल्यामुळे आम्हाला फारसं काही शोधावं लागलं नाही. तिथल्या मदतनिसाने 1-2 दिवसात आम्हाला कधिकधि कायकाय बघता येइल हे नीट समजावुन सांगितले. त्याने आम्हाला दोन पर्याय दिले होते. एक म्हणजे हेलसिंकी सिटी कार्ड आणि दुसरा पर्याय होता सिटी ट्रांसपोर्ट कार्ड. हि दोन्ही कार्ड्स 24 तास, 48 तास, 72 तास अशी दिवसाप्रमाणे उपलब्ध होती. आम्ही 24 तासांची दोन सिटी ट्रांसपोर्ट कार्ड्स घेतली. त्यात आम्ही बस, ट्रॅम, बोट कशानेही प्रवास करु शकत होतो... तर साधारण आम्ही प्लॅन ठरवला आणि त्याचदिवशी 1-2 ठिकाणी भेट देण्याचे ठरवले. संध्याकाळचे पाचच वाजले होते आणि सर्व प्रेक्षणिय स्थळं रात्री 8 पर्यंत सुरु होती. आमचं हॉटेल 7-8 किमी अंतरावर होतं त्यामुळे आम्ही ठरवलं की आधि पटकन हॉटेल ला जाउ गाडी पार्क करु आणि मग फिरतीवर निघु म्हणजे शहरात पार्कींग चा प्रश्न येणार नाही कारण युरोप मधे शहरात पार्कीग खुपच महाग आहे. आणि सिटी ट्रांसपोर्ट कार्ड आहेच.
मग नवर्याने झोकात जीपीएस काढला त्यात डेस्टीनेशन मधे हॉटेल चा पत्ता आधिच टाकला होता. आणि गाडी सुरु केली. थोड्यावेळाने जीपीएस ने आपला इंगा दाखवायला सुरुवात केली. सारखं आपलं रुट रिकॅल्क्युलेशन. कधी सरळ जायला सांगायचा कधी उजवीकडे / डाविकडे पण दिड तास झाला आम्ही काही ईछ्चित स्थळी पोचत नव्हतो. त्यातच काही मागमुस नसतान मुसळधार पाऊस सुरु झाला. मग आम्ही विचार केला की आपण साईन बोर्ड्स चा आधार घेउ. पण फिनलॅंड मधे इतक्या बेक्कार साईंस आहेत की त्याप्रमाणे तुम्ही गेलात तर कधिच हव्या त्या ठिकाणी पोचणार नाही. आणि पाऊस पण ईतक्या जोरात पडत होता की प्रत्येक बोर्ड वाचायला गेलो असतो तर रात्रच झाली असती. आणि रस्त्यांची नावे आणि बिल्डिंग नंबर वाचणं तर शक्यच नव्हतं( स्कॅडिनेवीया मधे 12 ईंच बाय 10 ईंच च्या छोट्या पत्र्यावर रस्त्यांची नावं आणि बिल्डिंग नंबर असतात. ती पण मुख्य रस्त्याहुन 8 ते 10 मीटर अंतरावर.) हॉटेलवाल्याला फोन केला तर तो म्हणे की मॅप असल्याशिवाय तो फोनवरुन सांगु शकत नव्हता. तरी त्याने 2-4 खाणाखुणा सांगितल्या आणि बेस्ट लक म्हणुन फोन ठेवुन दिला. आमच्याकडे होता टुरिस्ट मॅप त्यात काहिच डिटेलिंग नव्हतं. आली का आता पंचाईत. मग गाडी एका ठिकाणी पार्क केली शांतपणे तो नकाशा बघितला. जवळपासचे सर्व साइन बोर्ड्स वाचले. आणि त्या हॉटेलवाल्याने सांगितलेल्या खुणा आणि थोडा कॉमन सेंस ह्या वरुन एकदाचं ते हॉटेल शोधुन काढलं. पण तोवर रात्रिचे 8 वाजले होते. बाहेर पडायचा कंटाळा आला होता आणि शिवाय गुगल वरुन पुढच्या सगळ्या प्रवासाचे नकाशे सुद्धा घ्यायचे होते म्हणुन मग बाहेर जाणे रद्द केले.
दुसर्या दिवशी सकाळी सगळं आवरुन लवकरच बाहेर पडलो.. मस्त ऊन पडलं होतं अगदी प्रसन्न सकाळ होती. गाडी घेऊनच निघालो आणि बाजाराच्या जवळच असलेल्या भारतीय दूतावासात पार्किंग केले. तिथुन जवळुनच सिटी ट्रांसपोर्ट ची बस सुटणार होती. ती बस शहरातल्या सगळ्या प्रमुख प्रेक्षणिय स्थळांजवळ थांबते. हवं तिथे उतरायचं, फिरायचं आणि पुढची मिळणारी सिटी बस पकडायची. ट्रांसपोर्ट कार्ड घेतल्यामुळे खुपच सोय झाली होती. सगळ्यात आधि आम्ही हेलसिंकी ल्युथेरन कथिड्रल बघितलं. निळ्या आकाशाच्या बॅकग्राउंडला चर्च ची ती पांढरी ईमारत अगदी उठुन दिसत होती. त्या चर्च मधला ऑर्गन तर अप्रतिम होता. चर्चनंतर थोडं बाजारात फिरलो. मग बसनेच हेलसिंकी च थिएटर, रेल्वे स्टेशन ई. बघितलं. काय गम्मत असते नाही. आपल्या देशात आपण कधि कुठल्या गावाचं रेल्वे स्टेशन बघणार नाही पण बाहेर देशात मात्र क्षुल्लक जागा सुद्धा बघायची असते, been there done that अजुन काय. खुपच भुक लागली होती. बसमधुन मॅकडोनल्ड दिसलं. मग काय लगेच उतरलो. मी स्कॅंडिनेवीया च्या ट्रिप मधे एक गोष्ट मनापासुन ऐंजॉय केली ती म्हणजे मॅक चं व्हेज बर्गर. मी शाकाहारी असल्यामुळे मॉस्को मधे मला कायम फ्राईज वर समाधान मानावं लागतं. आता तर फ्राईज खाऊन कंटाळ आला आहे. व्हेज बर्गर माझ्यासाठी वेलकम चेंज होता.
पुढे टेंपलऑकिओ चर्च बघितलं. हे चर्च एका मोठ्या दगडात कोरुन बनवलं आहे. सुंदरच आहे. एवढा मोठा दगड तासुन चर्च घडवण्याचं काम खरोखरच कौशल्याचं आहे. आणि ते कोरलं देखिल अश्या काही खुबिने की बघितल्यावर जाणवतं की हे सगळं एकसंध एका दगडातुन कोरलं आहे पण चर्च आहे हे सुद्धा पुरेपुर जाणवतं. आम्ही गेलो तेव्हा तिथे एक लग्न सुरु होतं नवरा नवरी अगदी खुशीत हातात हात घालुन फिरत होते. आलेली आप्तेष्ट मंडळी वधुवरांवर फुलं, फुगे, साबणाचे फुगे ईत्यादिंचा वर्षाव करत होते, गाणि गात होते, मिठ्या मारत होते. मस्त मजा येत होती त्या लग्न सोहळ्याची. तिथुन आम्ही गेलो सिबेलिअस मॉन्युमेंट बघायला. एका फिनिश संगीतकाराच्या आठवणी प्रित्यर्थ हे बांधण्यात आलं आहे. हे ठिकाण बस थांब्यापासुन बरच आत आहे. एका फिनिश जोडप्याने आम्हाला तिथे पोचायला मदत केली. त्यांच्याकडुन कळलं की तिथे जवळच डॉग पार्क आहे. हा पार्क केवळ रजिस्टर्ड कुत्र्यांसाठी राखीव आहे. एका धनाढ्य बाईने आपल्या लाडक्या कुत्रीच्या आठवणीत हा पार्क बांधला. तिथे दर विकेंड ला कुत्र्यांना मोफत जेवण देतात आणि त्यांच्यासठी वेगवेगळे खेळ ठेवलेले असतात. शिवाय डॉक्टरही असतो. हे सगळं ऐकुन खुपच आश्चर्य वाटलं. मग रमत गमत परत बस थांब्यापाशी आलो. बस घेतली आणि शहराच्या छोट्या छोट्या रस्त्यांवरुन फिरुन परत बाजारा जवळ आलो. थोडीफार खरेदी केली. तिथे जवळच भाजी आणि फळांचे स्टॉल्स देखिल होते. इतकी ताजी भाजी आणि फळं बघुन अक्षरश: विकत घेण्याचा मोह होत होता. हे नवर्याला लगेच कळलं आणि त्याने मला ओढतच दुसरीकडे नेलं :-) ...
आमची फेरी ला रेपोर्टिंग ची वेळ होतच आली होती त्यामुळे अजुन न भटकता आम्ही गाडी घेऊन फेरी च्या गेट कडे निघालो. मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या बोटिने प्रवास करणार होते त्यामुळे खुपच ऎक्साईटेड होते आणि नवर्याला सवय असल्यामुळे तो तेवढाच थंड होता :-) यथावकाश क्यु मधे आमचा नंबर आला. आमचं बुकींग तिथल्या ऑफिसरने तपासलं आणि आम्हाला आत सोडलं. चौथ्या डेक वर आम्हाला गाडी पार्क करायला पाठवलं आणि त्या प्रचंड मोठ्या बोटिच्या पोटात आम्ही हळुच शिरलो आणि बाहेरच्यांना दिसेनासे झालो. फारच मजा वाटत होती आत जाताना. तेवढ्या वेळात मोठ्या माश्याच्या तोंडातुन त्याच्या पोटात जाताना लहान लहान माश्यांनाही असेच वाटत असणार असे आणि असलेच काहीबाही गमतीशिर विचारही डोक्यात येऊन गेलेत.
गाडी पार्क करुन आम्ही आमच्या केबिन कडे निघालो. आमचं केबिन दहाव्या डेकवर होतं. छान होतं केबिन. केबिन च्या खिडकितुन मस्त खालची दुकानं दिसायची. माणसांची लगबग दिसायची.
आणि केबिन च्या बाहेर भली मोठी काचेची खिडकी. जिथुन नजर ठरेपर्यंत निळाशार पसरलेला समुद्र दिसायचा. हे सगळं बघुन मन खुपच सुखावुन गेलं. मी त्या जागेचं लागलीच समुद्रखिडकी असं बारसं पण करुन टाकलं. केबिन मधे सामान टाकुन समुद्रखिडकी पाशी जरावेळ रेंगाळुन आम्ही वरती मुख्य डेकवर गेलो. केस विस्कटणारा भन्नाट खारा वारा आणि दोस्ती करु पाहणारे सीगल पक्षी अनुभवण्यात वेळ कसा गेला कळलच नाही. खाली आमच्यासाठी एक सरप्राईज वाट बघतच होतं.
मॉस्को - सेंट पिटर्सबर्ग
23 जुलै ला प्रवासाला सुरुवात करायची हे नक्की ठरले आणि आम्ही तयारीला लागलो. हातात अवघा दिड दिवस होता. 21 ची संध्याकाळ / रात्र आणि 22 चा पुर्ण दिवस. तेवढ्या वेळात सामान एकत्र करुन भरणे जरा धावपळीचेच झाले कारण बर्याच गोष्टी बाहेरुन विकत आणायच्या होत्या. विकत आणलेल्या वस्तु, कपडे, खाण्याच्या वस्तु, हाताशी असलेली बरी म्हणुन घेतलेली आमची औषधे, लेकीची औषधे, गरम कपडे , पादत्राणे, लेकीचे खाण्याचे हाल नको म्हणुन मग वरण भातासाठी डाळ तांदुळ (पाठोपाठ सगळे मसाले आलेच :-) ) शिजवायला राईस कुकर, असं करत करत सामान वाढतच गेलं आणि हा ढिग झाला. मनात जरा धाकधुकच होती की एवढं सामान बघुन नवरा नक्कीच ओरडणार पण अहो आश्चर्यम नवरा म्हणला 'आपलीच गाडी आहे मग काय हवं ते घे. शेवटी प्रवास सोयीचा आणि सुखकर व्हायला हवा'. झालं मग काय माझ्यातली सुगृहिणी जागृत झाली आणि मी सामानाच्या त्या ढिगात चारदोन गोष्टी अजुन घातल्या.
मनासारखे आणि गरज असलेले व नसलेले ( गरज नसलेल्या वस्तु कुठल्या हे घरी परत आल्यावर कळले :-) ) सामान जमवुन 22 च्या रात्री 2 वाजता आमचं गाठोडं बांधुन तयार झालं आणि रामप्रहरी सहा वाजता प्रवासाला सुरुवात करायची असे ठरवुन पहाटे पाच चा गजर लावुन आम्ही निश्चिंत मनाने गाढ झोपी गेलो. गजराने आपले काम चोख बजावले होते, पाच वाजता त्याने उठा उठा म्हणुन ठणाणा केला पण 10 मिनिटात उठतो असे सांगुन नवर्याने त्याला गप्प केले आणि अशी काही साखरझोप लागली की सरळ सकाळी सात वाजता जाग आली. मग पळापळ, धावाधाव, आरडाओरडा, एकमेकांवर चिडणे, आरोप प्रत्यारोप करणे असे सगळे प्रकार करुन आणि उरलेल्या वेळात आन्हिकं आवरुन 9 वाजता आम्ही प्रयाण केले.
आम्ही निघालो तोपर्यंत मॉस्को च्या रहदारीने चांगलेच बाळसे धरले होते त्यामुळे मॉस्को च्या बाहेर पडायला आम्हाला दुप्पट वेळ लागला. नंतर चा प्रवास मात्र छान झाला. मधे मधे रस्ता दुरुस्तिची कामं पुण्याची आठवण करुन देत होती. तेवढे वगळुन संपुर्ण रस्ताभर हिरवीगार शेतं, रंगीवबेरंगी फुलं, हलकेच खळाळत हसणार्या तब्बल 12 छोटुकल्या नद्या आणि गर्द हिरवी घनदाट जंगलां नटलेल्या निसर्गराजाने आम्हाला सोबत केली. वाटेत ट्रेन चे दोन डबे जोडुन एक मस्त उपहारगृह केलं होतं. ते बघुन मजाच वाटली.
प्रवासात आमचे आणि कॅमेर्याचे तोंड अखंड सुरु होते. निरनिराळे चिप्स, छान छान चवीचे फळांचे रस, सॅंडविच असा सगळा खाउ आम्ही गट्टम करत होतो आणि आमचा कॅमेरा जे जे सुंदर दिसत होते त्यांना टिपण्यात मग्न होता. माझ्या माकड उड्या सुरु होत्या. कधी नवर्यासोबत पुढे तर कधी लेकी बरोबर मागे. कधी नवर्याला सोबत तर कधी लेकीला. मज्जा आली. लहानपणी झाडावर चढुन एका फांदी वरुन दुसर्या फांदीवर उडी मारायचे त्याची आठवण झाली. पाच तास सलग गाडी चालवुन नवर्याला जरा कंटाळ आला होता, गाडीत पेट्रोल ही भरायचं होतं आणि आम्हालाही रेस्टरूम ला जायचं होतं. तसं एक छानसा पेट्रोल पंप बघुन आम्ही गाडी थांबवली. इथे शहराबाहेरचे पेट्रोल पंप खुपच देखणे असतात. निसर्गरम्य ठिकाणी बांधतात. आणि तिथेच सगळ्या सोयी सुविधा असतात. स्वच्छ आणि प्रशस्त रेस्टरूम्स, एक छोटसं स्टोअर आणि छोटेखानी पण अतिशय स्वच्छ आणि बर्यापैकी पदार्थ असलेले उपहारगृह. आणि बरेच ठिकाणी बाहेर बाकडी टाकलेली असतात. एकदम ढाब्याचा फील येतो. प्रदुषण मुक्त गार झुळकांत उन्हाची ऊब घेत आणि वाफळत्या कॉफिचे घोट रिचवण्यात वेगळिच मजा येते. या पेट्रोल पंपावर आम्ही साधारण तासभर घालवला. मस्त मजा आली. उपहारगृहातील पीटर ने तर अफलातुन कॉफी बनवली होती. छान तरतरीत होउन आम्ही पुढे निघालो.
यथावकाश 722 किमी अंतर 9 तासात पुर्ण करुन संध्याकाळी 6 वाजता आम्ही सेंट पिटर्सबर्गमधिल आमचे वास्तव्य असणार्या हॉटेल ला जाउन पोचलो. नवर्याचा खुप जवळचा एक मित्र सुद्धा ऑफिस च्या कामानिमित्त तिथेच राहायला होता. आम्ही 3 वर्षांनी भेटत होतो. मग काय त्या संध्याकाळी आम्ही धमाल केली. रात्री तंदुरी नाईट्स ला भारतीय जेवण जेवलो ( जेवण ठिकठाकच होतं पण अनेक दिवसांनी बाहेर भारतीय जेवण जेवलो त्याचच अप्रुप ) आणि दुसर्या दिवशीची आखणी करण्यात कधीच मध्यरात्र झाली.
खरचं शिर्षका सारखचं होतं ते सगळं अगदी. चित्रवत, अद्भुत आणि निसर्गरम्य...
स्कॅंडिनेविया च्या ट्रिप ला जायचे असे बरेच दिवसापासुन नवर्याच्या डोक्यात घोळत होते. आणि मुळातच भटकायला आवडणारी मी त्याच्या विचाराला जमेल तसे खतपाणि घालत होते :). तर तिथे जायला हवं ते उन्हाळ्यातच. पण सुरुवातच झाली ती सुट्टी मिळेल की नाही ह्या शंकेने. नवर्याच्या ऑफिस मधे एकाची बदली ड्यु होती. आणि त्याच्या जागी नवा माणुस यायचा होता. त्या दोघांची ऑफिशियल जबाबदारी नवर्याची असल्यामुळे त्याला सुट्टी मिळायची सुतराम शक्यता नव्हती. पण हे बदली प्रकरण विमानाची तिकिटे न मिळाल्यामुळे पुढे ढकलले गेले आणि आम्हाला ट्रिप प्लॅन करायला उत्साह आला. थोडिफार माहिती काढुन ठेवली आणि व्हिसा साठी अप्लाय करणार त्याच दिवशी नवर्याच्या असिस्टंट ची गर्भार बायको थोडी गुंतागुंत झाल्यामुळे हॉस्पिटल मधे ऍड्मिट झाली. त्यामुळे ती जोवर पुर्ववत होत नाही तोवर व्हिसा साठी अप्लाय करायचं नाही असं आम्ही ठरवलं. त्यात काही दिवस गेलेत.
नंतर सगळं ठिक सुरु आहे बघुन आम्ही व्हिसा साठी अप्लाय केला. पण व्हिसा मिळाला आणि त्याच्या दुसर्याच दिवशी ऑफिस च्या कामाने तातडिने नवर्याला बाहेरगावी जावे लागले. काम ठरलेल्या वेळेत संपले तर ठिक नाही तर अनिश्चित कालावधी साठी नवर्याला तेथे रहावे लागणार होते. पण तिसर्याच दिवशी नवरा परत आला आणि आम्ही लगेच दोन दिवसाने जाण्याचे ठरवले. आता एवढ्या वेळेवर आम्हाला रहायला जागा मिळेना त्यामुळे आम्हाला आमच्या प्लॅन मधे फेरफार करावे लागले. कोपेनहेगन ला जाण्याचे रद्द केले आणि बाकिची ट्रीप रिशेड्युल केली. आम्ही कारनेच जाणार होतो त्यामुळे बाकी तिकिट बुकिंग चा प्रश्न नव्हता. त्यामुळे शेवटी जायला मिळेल की नाही हा बरेच दिवस सुरु असलेला गोंधळ एकदाचा संपला आणि आम्ही 23 जुलैला सकाळी प्रयाण केले. मॉस्को - सेंट पीटर्सबर्ग - हेलसिंकी - स्टॉकहोम - ग्योतेबर्ग - ओस्लो - वॉस - स्टॉकहोम - हेलसिंकी - सेंट पीटर्सबर्ग - मॉस्को असा एकुण प्रवास जवळपास 4,500 किमी होता.
सगळा प्रवास छान झाला आणि छोटीने पण त्रास दिला नाही. मस्त मजा आली. खुप फिरलो, खुप फोटो काढले, पायाचे तुकडे पडेपर्यंत चाललो आणि मस्त तुडुंब खाल्लं सुद्धा. कालच आम्ही परत आलो. पुढिल लेखांमधे आम्ही कुठे कुठे फिरलो, कुठले फोटो काढले, काय खाल्लं सगळं सविस्तर लिहीन. आता मात्र पाटी टाकते. खुप दमायला झालं आहे आणि अशक्य झोप येते आहे. तोपर्यंत तुम्ही स्कॅंडिनेविया ची माहिती इथे वाचु शकता.
कालच काकुशी बोलणं झालं. बोलता बोलता काकु म्हणाली की आज पुडाच्या वड्या केल्या आहेत. आणि इकडे माझ्या जिभेवर पुडाच्या वड्यांची चव रेंगाळली. महेंद्रजींचं कालचं पोस्ट आणि नंतर काकुशी झालेलं बोलणं, माझं मन नकळत बालपणीच्या खादाडी च्या आठवणिंत रमलं.
तशी मी मुळची नागपुरची. ज़न्मगाव भंडारा पण सगळं बालपण आणि शालेय शिक्षण नागपुरात. दहावी नंतर मात्र वडीलांच्या बदली मुळे आम्ही पुण्याला आलो आणि तिथेच स्थिरावलो. पण अधुन मधुन नागपुरला जाणं होतंच. नागपुरला गेल्यावर पहिलं काम करायचं म्हणजे खादाडी चे प्लॅन्स ठरवायचे आणि ते अमलांत आणायचे. नागपुरला अश्या बर्याच जागा आहेत पण वेळेअभावी नेहेमीच सगळीकडे जाता येतं असं नाही. तरिही जास्तीतजास्त जागी जाता येइल असा प्रयत्न असतो.
माझी सगळ्यांत पहिली आवडती जागा म्हणजे पंचशिल टॉकीज जवळचं शांती भवन. मी दक्षिण भारतीय पदार्थांची अस्सल भक्त आहे. आणि शांती भवन मधे मिळणारे जवळ जवळ सगळेच दक्षिण भारतीय पदार्थ म्हणजे लाजवाब. गरम गरम, एकदम मउ आणि हलकी ईडली आणि त्यावर वाफाळता सांबार म्हणजे माझा जीव की प्राण. ईडली शिवाय तिथला दोसा, उत्तपा आणि मैसूर बोंडा पण मस्त असतो. शांती भवन ला जायचं तर सकाळी सकाळी नाश्ता करायला 07.30 / 08.00 पर्यंत. त्यावेळेस जी काही क्षुधाशांती होते ती केवळ अवर्णनीय. दुपारनंतर त्याच पदार्थांना सकाळसारखी चव नसते हे माझं मत.
शांती भवन खालोखाल नंबर लागतो तो धरमपेठेत वेस्ट हायकोर्ट रोडवर असणार्या साउथ इंडीया मेस चा. तिथला कुरकुरीत दोसा म्हणजे अहाहा. पण हल्ली तिथली चव पुर्वीसारखी राहिली नाही. असेच छान छान दक्षिण भारतीय पदार्थ मिळण्याची अजुन दोन ठिकाण म्हणजे नैवेद्यम आणि सिव्हील लाईन्स मधले ---स्वामी त्याचं पुर्ण नाव मला आठवत नाही पण तिथे उभं राहुन खावं लागायचं एवढं मला नक्की आठवतं. धरमपेठेत चौकातच नंद भंडार आणि त्याच्या थोडच पुढे राज भंडार नावाची दोन दुकानं आहेत. तिथे समोसा, कचोरी आणि साधा पेढा खुप छान मिळतो. सकाळी 8 / 9 वाजता आणि दुपारी 3 / 4 वाजता तिथुन गेलात तर समोसा आणि कचोरी तळण्याचे खमंग वास येतात. तिथुन थोडं पुढे गेलं की शंकरनगर चौकात संध्याकाळी ठेल्यांवर चटपटीत चाट आणि पाणिपुरी मिळायची. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली की बाबांसोबत मी आणि दादा जायचो तिथे चाट आणि पाणिपुरी खायला शिवाय येताना वाटेत दिनशॉ चं आइस्क्रीम खाल्ल्याशिवाय आमची खादाडी पुर्ण व्हायची नाही. आता तिथे ते ठेले आहेत की नाही माहिती नाही.
आनंद भंडार तर माझं अतिशय लाडकं. तिथे निरनिराळ्या बंगाली मिठाया खाल्ल्या की रसना कशी तृप्त होते. रसदार, तोंडात टाकल्याबरोबर विरघळणार रसगुल्ला असु दे नाहि तर त्याचिच बहिण चमचम. सोबतिला मऊ लुसलुशीत ताजे संदेश आणि मिष्ठी दोइ खावे तर तिथलेच. माझ्या (जुन्या) माहितीप्रमाणे त्यांच्या दोन शाखा आहेत. एक धरमपेठेत वेस्ट हायकोर्ट रोड्वर आणि एक सिताबर्डी वर. पुर्वी आनंद भंडार मधे फक्त बंगाली मिठाई मिळायची आता तिथे अनेक प्रकारचे स्नॅक्स पण मिळतात. आनंद भंडार सारखच अजुन एक ठिकाण म्हणजे हल्दिराम.हे देखिल धरमपेठ आणि सिताबर्डी दोन्ही ठिकाणी आहे. हल्दिराम आणि आनंद भंडार म्हणजे एकमेकांचे प्रतिस्पर्धी. एकाच एरियात असल्यामुळे आपल्याकडे गिर्हाइकांना कसे खुश ठेवता येइल आणि गिर्हाइक जोडुन ठेवता येइल ह्याकडे त्यांचे सतत लक्ष असते. त्याचा परिणाम म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला दर्जेदार पदार्थ प्रसन्न वातावरणात उपभोगता येतात. हल्दिराम मधे पेपर दोसा / मसाला दोसा, मऊ तरिही कुरकुरीत भटुरा आणि स्पाईसी छोले असं काय काय तुडुंब खाऊन झाल्यावर शेवटी हल्दिरामचाच रसरशीत मोतीचुर चा लाडु किंवा अनारकली नावाची बंगाली मिठाई म्हणजे सोने पे सुहागा.
असच अजुन एक ठिकाण म्हणजे सेमिनरी हिल्स जवळ टेकडीवर हनुमानाचं एक मंदिर आहे. त्या मंदिराच्या पायथ्याशी असंख्य प्रकारचे समोसे, वेगवेगळ्या कचोर्या, आणि अनेक चट्पटीत पदार्थ मिळतात. पानाच्या द्रोणात गरम गरम चटकदार समोसा किंवा कचोरी खायला जी काही मजा येते ती शब्दातीत. फिरायला जाताना मंदिरात जाणे हा तर एक बहाणा असतो. खरं उद्दिष्ट्य असतं ते पायथ्याशी मिळणारा प्रसाद खाण्याचं :).
गणगौर च नाव घेतलं नाही तर खादाडीची ही सफर पुर्ण होऊच शकत नाही. गणगौर मधे मिळणारी राज कचोरी नुसती आठवली तरी तोंडाला पाणि सुटतं. सिताबर्डी सारख्या बाजाराच्या ठिकाणी असल्यामुळे इथे कायमच गर्दी असते. शिवाय जगत ची थाली, दिलीप कुल्फी, घुगरे ह्यांची कचोरी आणि तिच्यासोबत मिळणारी लाल चटणी आणि संत्रा बर्फी, सिताबर्डी मेन मार्केट रोडवर अपना बझार च्या गल्लिच्या कोपर्याशी मिळणारा चना जोर गरम, लोकमत बिल्डिंग च्या चौकात कोपर्यातल्या दुकानात (नाव आठवत नाही) मिळणारे चाट चे असंख्य प्रकार, धंतोलीत अहिल्यादेवी मंदीरात मिळणारे टिपीकल महाराष्ट्रियन पदार्थ.... अशि अजुन बरीच ठिकाणं आहेत त्यामुळे आता आवरतं घेते, खुप भुक लागली आहे. काहितरी खायला हवं :)
मराठी की इंग्रजी...मराठी की इंग्रजी...सध्या ह्या विचाराने डोकं भणभणायला लागलं आहे...
आत्ता कुठे माझी पोर बोबडे बोल बोलु लागली ( वय 1 1/2 वर्षे ) आणि हौसेने आम्हीही तिला चित्रांचं पुस्तक आणुन 'तो बघ काऊ , ती बघ चिऊ, हा वाघोबा बरं का..असे काही बाही शिकवायला लागलो. पण थोड्याच दिवसात लक्षात आलं की पुढे वर्ष दिड वर्षाने जेव्हा शाळेत ऍडमिशन साठी इंटरव्यु होइल तेव्हा हे काऊ, चिऊ आणि वाघोबा कामी येणार नाही... तेव्हा तिला A for Apple हेच उत्तर द्याव लागेल.
झालं हा विचार जेव्हापासुन डोक्यात आला तेव्हापासुन सारखं वाटतं की मराठीत शिकवायचं की इंग्रजीत शिकवायचं? आम्ही परदेशात जरी राहात असलो तरी घरी पुर्णपणे मराठी वातावरण आहे आणि घरी बोलतो पण मराठीतच. त्यामुळे आताकुठे लेकिची मराठी भाषेशी ओळख व्हायला सुरुवात झाली आहे तर लगेच दुसरी भाषा तिच्यावर लादणे कितपत योग्य आहे? ( ह्या वरताण म्हणजे शेजारी पाजारी तिच्याशी अजुन तिसर्याच भाषेत बोलतात :-) ) आणि पुढे तिच्या शालेय शिक्षणाचा विचार करता इंग्रजीत शिकवणेच योग्य ठरतं.
आम्हीसुद्धा आधि सगळं मराठीतच शिकलो पण आज दोघांनाही इंग्रजीची उत्तम जाण आहे. पण परत मनात असाही विचार येतो की समजा आज शिकवलं सगळं मराठीत तरी आमचं विंचवाचं बिर्हाड. आज इथे तर दोन / तिन वर्षाने अजुन कुठे. त्यामुळे शिक्षण पुढे उच्चशिक्षण हे सगळं इंग्रजीत होणार हे नियतीने आधिच ठरवलेले. मग अश्यात इंग्रजीत शिकवणेच योग्य. पण म्हणुन आपल्या मातृभाषेत शिकवायचं नाही का? मग तिला मराठी येइल कसे? परदेशात राहुन मोडकं तोडकं मराठी बोलणारे पण मराठी वाचता न येणारे, मराठीत बोललेलं कळणारे पण मराठीत बोलता न येणारे किंवा अजिबातच मराठी न येणारे अनेक लहान मुलं बघितली आहेत. आपली लेक तशी होउ नये असे मनापासुन वाटते.
हे सगळे विचार हल्ली डोक्यात गर्दी करतात. पण मला असं वाटतं की ही पण एक पासिंग फेज़ आहे. आपण नेटाने प्रयत्न केला तर तीला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषा निट अवगत होतिल. गरज आहे ती फक्त थोड्या संयमाची. बघुया पुढे काय होते ते :-) ...
रुची आणि त्या तरुणाची पहिली भेट होउन आता 5-6 महिने झाले होते. दोघांनीही एकमेकांना नजरेनच जोखलं होतं, ओळखलं होतं आणि स्विकारलं होतं.
त्या दिवशी रुची ला खाली पार्क मधे जायला जरा उशिरच झाला. बघते तर तो एका बेंचवर बसला होता. तिची वाट बघत असल्यासारखा. आश्चर्य म्हणजे आज पार्कमधे त्याच्याशिवाय कोणिही नव्हतं. मग तिला आठवलं की कालच शेजारच्या बाई तिला सांगत होत्या की आता मुलांची परिक्षा सुरु होणार आहे. कदाचित मुलं अभ्यास करत असतील, तीने स्वत:शिच विचार केला. आणि त्या तरुणाच्या समोरच्या बेंचवर जाउन बसली. त्याच्याकडे बघुन कळेल न कळेलसं हळुच हसली. त्याने ही हलकेच हसुन प्रतिसाद दिला.
"किती उशीर केलास भेटायला... मी किती वर्षं वाट बघतोय." तो म्हणाला. " हो ना.. उशिर झाला खरा. जाउ दे.. कसा आहेस?" भारावलेली रुची म्हणाली. " मी ठिकच आहे म्हणायचं. वेड्यासारखा तुझा शोध घेत फिरत होतो. शेवटी 6 महिन्यांपुर्वी इथे भेटलीस." आणि त्यांचे हितगुज सुरुच रहिले. दोन जीव कितीतरी वर्षांनी भेटले होते. काळवेळ ह्यांच्या सीमा ओलांडुन, जन्मांचे फेर धरत चुकवत, एकमेकांशी जडु बघत होते.
दोघांनाही एकमेकांची ओळख पटु लागली. ते द्वैत एकाकार होउ लागले. आणि एकमेकांत असलेल्या आत्मिक अद्वैताची खात्री पटली. दोघांचाही वर्तमान जन्मातील आत्मिक शोध संपला होता. अतिव आनंदाने दोघांचेही डोळे पाझरु लागले. रुची ला तो क्षण घट्ट धरुन ठेवावा असं वाटलं. काय नव्हते त्या क्षणात, मन:शांती, समाधान, आनंद, आयुष्यातले सगळे जीवनरस त्या एका क्षणात एकवटले होते. त्या एक क्षणाने त्या दोघांनाही पुर्णत्व प्राप्त करुन दिले होते. त्यांचा हा जन्म सार्थकी लागला होता.
आणि रुची ने अलगद आपले डोळे उघडले. अजुनही ती भारलेल्या अवस्थेत होती. तो तरुण तिच्यासमोरच बसला होता. दोघांची नजरानजर झाली आणि त्यांचे चेहरे उजळुन निघाले. शिव आणि शक्ती चे ही अद्वैत रुप मोहक होते. पण लगेचच त्याचा चेहरा दु:खाने झाकोळला. त्याला वर्तमानाची जाणीव झाली. त्याने प्रथमच तिच्याशी संवाद साधला आणि तिला सांगितले की त्याची दुसर्या देशात बदली झाली आहे आणि 2 दिवसातच तो त्याच्या कुटुंबासोबत जायला निघणार आहे. आणि हे सांगण्यासाठीच तो तिची वाट बघत होता. तिने त्याला विचारले की आता परत कधी भेटणार त्यावर तो म्हणाला आजसारखचं somewhere...sometime.... एवढं सांगुन तो जाण्यासाठी पाठमोरा वळला.
रुची हळहळली, आत्ता कुठे नात्याची जाणीव झाली होती की परत हा पाठशिवणीचा जीवघेणा खेळ सुरु झाला होता. परंतु क्षणार्धातच ती सावरली आणि तिचं मन भरुन आलं.तिचा शोध संपला होता. आज तिला तिचा Soulmate भेटला होता.
मग नजरेचे हे खेळ रोजचेच झाले. रुची संध्याकाळी पार्क मधे जायची तेव्हा तो आधिच आलेला असायचा. कुणाची तर वाट बघत असल्यासारखा. रुची दिसल्यावर त्याच्या चेहर्यावरचा,'ती आज दिसेल की नाही' चा संभ्रम हलकेच सैल व्हायचा. रुची सुद्धा त्याच संभ्रमात असायची आणि तो दिसल्यावर कळत नकळत तिला स्वस्थता लाभायची. हळुहळु शेजारणीं कडे चौकशी केल्यावर तिला कळले की तो कोणत्या तरी दुतावासात काम करतो. तो, त्याची बायको आणि त्यांची छोटी मुलगी तिथे 3 वर्षांपासुन रहात आहेत आणि त्याची बायकोही कुठेतरी नोकरी करते. पण रुची ला त्याचे नाव आणि त्याचा देश मात्र कळु शकले नाही.
रुची ने स्वत:ला आवर घालण्याचा बराच प्रयत्न केला. हरप्रकारे मनाची समजुत घातली. तो विवाहित आहे, एक छोटी मुलगी आहे, आपल्याला त्याचं नाव गाव काहिच माहिती नाही आणि सरतेशेवटी तो एक परदेशी आहे. पण त्याच्याबद्दल तिला इतके जबरदस्त आकर्षण वाटत होते की ही सारी कारणे त्यापुढे फोल ठरायची. ती अक्षरश: लोहचुंबकासारखी त्याच्याकडे खेचल्या जायची.
पण ह्या सार्या प्रकारात रुची ला त्याच्याबद्दल शारीरीक आकर्षण कधिच वाटले नव्ह्ते. वाटायची ती केवळ अनामिक ओढ. का कोण जाणे पण तो सुद्धा आपल्याकडे ओढल्या जातोय असे सारखे तिला वाटायचे. त्याच्याही डोळ्यांत तिला कधिही लालसेचा लवलेशही दिसला नाही. त्या नजरेत जे काही होतं ते नितळ, निर्मळ आणि निरागस होतं. आपलसं वाटणारं आणि आपलसं करणारं होतं. आणि ह्याचे तिला बरेचदा आश्चर्य वाटायचे. की हे असं कुठलं नातं आहे जिथे दोन पुर्णपणे अनोळखी व्यक्ती एकमेकांची नाव साधी नावं सुद्धा माहिती नसताना इतक्या प्रचंड वेगाने एकमेकांकडे खेचल्या जात आहेत. ते ही आदिभौतीक पातळीवर. तिथे कसलीच अपेक्षा नव्हती. शारिरीकही नाही आणि मानसीकही नाही. प्रतिक्षा होती ती केवळ Relate करण्याची आणि होण्याची.
कधि एकदा संध्याकाळ होते आणि त्याला डोळाभर बघते असे रुचीला व्हायचे. त्याच्या त्या शांत निळ्या डोळ्यांत डोकावुन बघताना सगळं कसं विसरायला व्हायचं. आजुबाजुचं भानच सुटायचं. आणि त्या नंतर मिळायची ती अपुर्व शांती. सारं जग त्या क्षणी थांबल्यासारखं वाटायचं. स्तब्ध आणि निश्चल.
दोघेही केवळ भारावल्यासारखे जणु नजरेनेच बोलायचे. जसे काही जन्मोजन्मी ते दोघे भेटत आले होते. अनोळखी व्यक्ती बद्दल वाटणारी प्रचंड ओढ, अनामिक आकर्षण आणि एका नजरेतच हा तर माझ्याच अस्तित्वाचा भाग आहे असे वाटायला लावणारी संवेदना. हे पुर्वजन्माचे संचित नाहितर काय आहे? पण अश्याही परिस्थितीत दोघांनाही वर्तमानाची जाणीव होती. दोघांनाही आपाआपल्या मर्यादा ठाउक होत्या.
रोज खाली आल्यामुळे दोघांमधे थोडा मोकळेपणा आला होता. कधितरी एखादं मंदस्मित, कधि हाय - हॅलो ची देवाणघेवाण सुरु झाली. पण ते तेवढ्यापुरतच. त्यांच्यात संवाद नव्हता आणि दोघेही संवाद घडावा म्हणुन जाणुन बुजुन प्रयत्नही करत नव्हते. एकमेकांशी बोलण्याची त्यांना कधी गरजच वाटत नव्हती. गरज होती ती फक्त मनं रिती होण्याची.
आणि अश्यातच तो दिवस आला...
(क्रमश:)
नेहेमीप्रमाणे संध्याकाळी रुची खाली पार्क मधे गेली. तिचे डोळे त्यालाच शोधत होते. तिकडे तोही कधिचा आला असावा. त्याचेही लक्ष तिच्या वाटेकडेच होते. दोघांच्या भिरभिरणार्या नजरेची भेट झाली आणि क्षणभर आपल्या ह्रुदयाची धडधड बंद पडते की काय असे रुची ला वाटले...
रुची दिल्लीला एका नामांकीत कंपनीत नोकरीला होती पण आधि उच्च शिक्षणाच्या ध्यासामुळे आणि नंतर नोकरीमुळे अजुन तिचे दोनाचे चार झाले नव्हते. तिकडे आई वडिलांची खटपट सुरु होतिच पण रुची कही त्यांना दाद देत नव्हती. 6 महिन्यांपुर्वीच ती कंपनीच्या दिल्ली शाखेत रुजु झाली होती. कंपनीने तिला राहायला एका पॉश सोसायटी मधे फ्लॅट दिला होता. त्याच इमारतीत एक परदेशी तरुण राहायचा. तो रोज संध्याकाळी त्याच्या बाळाला घेउन खाली पार्क मधे यायचा. रुची सुद्धा रोज खाली जायची. पार्क मधली हिरवळ, अवतिभवती सळसळणारी झाडं, खेळणारी बागडणारी मुलं बघितली की तिला कसं प्रसन्न वाटायचं.
एक दिवस शेजारणींशी पार्कमधे गप्पा मारता मारता तिने सहज बघितलं तर तो परदेशी तरुण तिच्याकडेच बघत होता. तशी रुची दिसायला बरी होती. सावळी असली तरी नाकीडोळी रेखीव होती. तिच्या वागण्याबोलण्यात एक प्रकारचा उमदेपणा होता. त्यामुळे तिचे व्यक्तिमत्व अजुनच फुलुन यायचे. कॉलेज मधे ती मुलांमधे बरीच लोकप्रिय होती पण तिने कधि कुणाला भाव दिला नव्हता. पण आज अचानक त्या तरुणाला बघुन तिला काहितरी वेगळं जाणवलं. ती सुद्धा पहिल्या नजरेतच त्या तरुणाकडे आकर्षीत झाली होती. तो तरुण होतापण तसाच कुणाही तरुणीने आकर्षीत व्हावे असा. भरपुर उंची, कसदार बाहु, कमावलेले शरीर, उन्हामुळे रापलेला तांबुस गोरापान रंग, पिंगट केस आणि शांत निळे डोळे. काय नव्हते त्या डोळ्यांत. आणि ती नजर. सारखी रुची ला त्याच्याकडे बघायला परावृत्त करत होती. राहुन राहुन काहितरी कारण काढुन रुची त्या तरुणाकडे बघत होती.
तिकडे त्याचीही अवस्था काही निराळी नव्हती. तो सुद्धा रुचीकडेच बघत होता. दोघेही एकमेकांकडे बघुन केवळ नजरेनेच भारावुन गेले होते. पण रुचीने स्वत:ला आवरले. असे आकर्षीत व्हायला आपण काय टिनेजर आहोत का आणि शिवाय तो बाळाला घेउन आला आहे. एकुण देह्बोलीवरुन ते बाळ त्याचच वाटतय. घरी त्याची बायको पण असेल. तो आपल्याला बघतोय असा आपला उगाच गैरसमज झाला असावा अशि स्वत:च स्वत:ची समजुत काढली. एकवार आजुबाजुला बघुन घेतले. पण हा नजरेचा खेळ कुणाच्याही लक्षात आला नव्हता. तिने हुश्य केले आणि घरी जायला निघाली. ती वळली पण तिला सारखे वाटत होते की तो तरुण अजुनही आपल्यालाच बघतोय. आणि तिने आपला चालण्याचा वेग वाढवला.
(क्रमश:)
मी 12 वीत असताना केबल च्या कोणत्यातरी चॅनेल वर Bewitched ही मालीका यायची.... मी कॉलेजमधुन यायची वेळ आणि ही मालीका सुरु व्हायची वेळ एकच असायची... त्यामुळे घरी आल्यानंतर चा तो अर्धा तास फारच refreshing असायचा. सारखे क्लासेस, अभ्यास, शिक्षकांच्या धमक्या, परीक्षेची दाखवलेली भिती / ताण सगळे ह्या सीरीयल मुळे विसरायला व्हायचे...
मालीकेची नायिका सॅमांथा, ऍड एजेंसी मधे काम करणारा तिचा नवरा डॅरीन आणि सासु ऎंडोरा ह्यांचे मजेशीर संवाद, डॅरीन सारखा बावळट नवरा, ऎंडोरा सारखी खट्याळ सासु आणि मालीकेचा प्राण असलेली सॅमांथा, एकदम मजा यायची ही सीरीयल बघताना.... ( काही एपिसोड्स मात्र कंटाळवाणे होते :) ... पण फारच थोडे ) आणि सॅमांथा ची ती ओठ मुडपुन जादु करायची लकब अगदिच अफलातुन... कितिदा वाटायचं की Maths शिकवणार्या मॅडम ला असच ओठ मुडपुन गायब तरी कराव किंवा विद्यार्थी बनवुन आपण तिला शिकवावं :D ...
ही मालीका अमेरीकेत 1964 पासुन 1972 पर्यंत 8 seasons मधे प्रसारीत झाली आणि अफाट लोकप्रिय झाली.... त्यानंतर जगातल्या अनेक भागांत त्या त्या भाषांमधे रुपांतरीत होऊन दाखविल्या गेली.. ( अधिक माहिती येथे उपलब्ध आहे... )
Brida वाचताना मला ह्या मालिकेची आठवण झाली आणि महाजालावर शोध घेण्याचे ठरवले... गम्मत म्हणजे youtube वर ह्याचे बरेचसे भाग आहेत... त्यामुळे सध्ध्या बहुतेक रोजच रात्रि सगळी कामं आटोपली की एखादा एपिसोड बघते आणि मगच झोपते..
ही आहे Season 1 च्या काही एपिसोड्स ची लिस्ट... Happy viewing ....
अमेरीकेप्रमाणे इथेसुद्धा रोजचं काम करायला maid मिळत नाही. आणि मिळालीच तर परवडत नाही :) .... त्यामुळे आम्ही कधितरी महिना दिड महिन्यातुन एकदा maid ला बोलवतो आणि काचेची दारं खिडक्या पुसणे, सगळं घर झाडुन पुसुन स्वच्छ करणे इ. कामे करवुन घेतो.....
काही दिवसांपुर्वी आम्ही अशिच काही कामे करवुन घ्यायला एका maid ला बोलावले... ती आधिसुद्धा दोन तिन दा आमच्याकडे येऊन गेल्यामुळे मी निर्धास्त होते. काय कामे करायची कशी करायची हे तिला ठाऊक होते. त्यामुळे सारख्या तिला सुचना द्य़ायला लागणार नाही म्हणुन मी खुश होते... कारण maid येणार म्हणलं तर मलाच tension येतं :) . ठरल्या वेळेला ती आली आणि कामं करायला सुरुवात केली. इकडल्या बायका जरा हळुबाई असतात. अगदी अलगद अलगद नाजुक साजुक पद्धतिने कामं करतात. ( त्यामुळे जास्त वेळात कमी कामं होतात आणि पैसे तासाप्रमाणे द्य़ायचे असतात हे त्यामागचं गणित :) )
तर त्यादिवशी ही maid जरा जास्तच रेंगाळत होती असे मला वाटले पण मी तिकडे फार काही लक्ष दिले नाही. मधेच पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेले तर तिथे ही माझे मसाल्यांचे कॅबिनेट धुंडाळत होती. मला बघितले तर म्हणे बरण्या निट लावुन ठेवते आहे.. झालं मी खुश.... नंतर माझ्या लक्षात आले की हिने आपली पर्स आतल्या खोलीत नेउन ठेवली आहे कारण pasaage way मधे, तिच्या नेहेमिच्या जागी तिची पर्स नव्हती जी तिने आल्याआल्या तिथे ठेवली होती. मग मी बघितले तर ही बाई खोलिचे दार लावुन आत होती. दारावर टकटक करुन मी आत गेले तर गडबडीत हातात फडकं घेऊन खिडकी पुसायला लागली आणि तिची पर्स मला तिथेच दिसली. त्यामुळे मला जरा शंका आली पण मी काही बोलले नाही.
थोड्यावेळाने ती दुसर्या खोलीत गेली. तेव्हा मी परत त्याच खोलीत गेले. तिची पर्स अजुनही तेथेच होती आणि पर्स ची चेन अर्धवट उघडी होती. खरं सांगायचं तर मला तिची पर्स तपासायची खुप इच्छा होत होती पण दुसरं मन अडवत होतं की असा कसा दुसर्यांच्या पर्स ला हात लावायचा मग ती maid ची का असेना.... पर्स तपासु का नको...तपासु का नको शेवटी धडधडत्या मनाने आणि कापर्या हाताने मी तिची पर्स बघितली तर लेकीचा खाऊचा डबा मला त्यात दिसला उघडुन बघते तर काय त्यात शिगोशिग गरम मसाला भरला होता. छातीतील धडधड अजुनच वाढली ... तो डबा मी तसाच परत पर्स मधे ठेवला आणि स्वयंपाकघरात गेले. तसाच एक डबा दाखवुन तिला म्हणलं असा अजुन एक डबा होता कुठे गेला तर ती माहिती नाही म्हणत खांदे उडवत निघुन गेली... निट बघते तर काय संध्याकाळच्या जेवणासाठी करून ठेवलेली भाजीसुद्धा गायब झाली होती :) . शेवटी गेली ती एकदाची पण मला मात्र सारखं तिच्या पर्स ला हात लावला म्हणुन अपराधी वाटत होतं. संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला सगळा झाला प्रकार सांगितला. नवर्याने तिला लगेच फोन लावुन विचारले तर सगळं कबुल केलं. पण मला मात्र सारखं तिच्या पर्स ला तिच्या नकळत हात लावल्याचं वाईट वाटत होतं. दोन तीन दिवसांनी तिने डबा परत आणुन दिला पण रिकामा :) .....
लहानपणापासुन, चोरी करू नये, खोटे बोलु नये, दुसर्यांच्या वस्तुंना विचारल्याशिवाय हात लावु नये...ह्या आणि अश्याच कितीतरी गोष्टी मनावर बिंबवल्या गेल्या असतात... वय वाढल्यावर वरवर कितीही मुखवटे घातले तरी आत खोलवर कुठेतरी संस्कारांचे हे रोपटे चांगलेच मुळ धरलेले असते..त्यामुळे त्या दिवसानंतर कितीतरी दिवस मलाच अपराधी वाटत होतं आणि मनात सल होती. खरंतर तुम्ही म्हणाल एवढीशी तर गोष्ट आणि किती त्याचा बाऊ करायचा. पण मी मात्र अजुनही तो दिवस आठवला की मलुल होते कारण मला तिच्या पर्स ला हात लावायचा नव्हता. डोक्याचा नुसता भुगा झाला आहे विचार करून...आता तुम्हीच सांगा मी योग्य केले की अयोग्य?
मागचे काही दिवस अतिशय व्यस्त गेलेत. मागच्याच आठवड्यात एक event होता. त्याच्या कल्पनेच्या जन्मापासुन ते , तो event पार पडेपर्यंत प्रत्येक क्षणाला मी साक्षी आहे. बरेच चांगले वाईट अनुभव या दरम्यान आलेत... पण त्याबद्दल परत कधितरी... आधि त्या कल्पनेवर काम करणं, त्याला रंग, रूप, आकार इ. सर्व देणं, ती कल्पना प्रत्यक्षात उतरावी यासाठी अनंत खटपटी करणं ह्यात बरेच दिवस गेलेत.... आणि आज जेव्हा जरा मोकळा वेळ मिळाला तेव्हा लक्षात येतय की गेल्या काही दिवसात किती गोष्टी मी miss केल्या आहेत...
1) चांगलं वाचन करायला जमलं नाही (अगदी blogs सुद्धा )
2) लेकीसोबत मजेत वेळ घालवता आला नाही.
3) चांगला cinema बघितला नाही.
4) मस्त photography करत भटकंती केली नाही .
5) नवीन पाककृती करून बघितली नाही.
6) नवीन चित्र काढली नाहीत.
7) लांब फिरायला गेलो नाही.
8) चवीचवीने निवांत जेवले सुद्धा नाही.
9) Online radio वर classic bollywood ऐकत लोळले नाही :)
10) चॉकलेट चघळत नवर्याशी माझ्या वाढणार्या वजनावर चर्चा केली नाही :)
बाकी काही अजुन आठवत नाहिये :) ... पण बर्याच गोष्टी करायच्या राहुन गेल्या हे मात्र खरयं... कधितरी उगाच वेड्यासारखा विचार करत बसले की क्षणभंगुर आयुष्याची कल्पना येते आणि आपल्याला आवडणार्या असंख्य गोष्टी आणि छंद जोपासायच्या आधिच आपली ईतीश्री झाली तर ह्या विचाराने अंगावर शहारा येतो. क़ारण जमेल तसे जमेल तेवढे हे आयुष्य मला भरभरुन जगायचे आहे. अश्यावेळेस मी पट्कन एक चॉकलेट तोंडात टाकुन camera गळ्यात अडकवते आणि लेक आणि तिची pram घेऊन फाटकाबाहेर पडते आणि नकळत मनातल्या रेडीओवर गाणे लागते ' थोडा है थोडे की जरुरत है, जिंदगी फिर भी यहॉं खुबसुरत है...'
भानस च्या cops च्या post वरुन माझ्या बाबतीत घडलेला एक किस्सा आठवला... आधि comment टाकणार होती पण फारच मोठी झाली असती म्हणुन मग ही स्वतंत्र post.
आमचं posting सध्या रशियाला आहे. काही दिवसांपुर्वीची गोष्ट आहे... तर मी एका meeting साठी नवरयाच्या office च्या जवळच गेले होते व परत येताना माझ्याकडे बरच सामान असणार होते म्हणुन नवरा मला घरी सोडुन परत office ला जाणार होता... पण माझी meeting अपेक्षेपेक्षा बरीच लांबली त्यामुळे नवरा सोडायला का कू करु लागला कारण त्याला सुद्धा थोड्या वेळात महत्वाची meeting होती... आधिच रशियन लोकं जरा तिरसट असतात त्यातुन थोड जरी इकडे तिकडे झालं तरी नाराज होतात आणि माझा नवरा पडला वेळेचा अगदी पक्का ! वाट बघणे आणि बघायला लावणे दोन्ही त्याला आवडत नाही. त्यामुळे कसं काय सगळं जमवायचं असा मला प्रश्न पडला होता... शेवटी लेकिचा वास्ता देउन नवरयाला घरी सोडायला राजी केलं...
तर इथे सुद्धा cops असेच कुठे कुठे लपुन बसतात आणि नको त्यवेळी अचानक प्रकट होतात. आणि मग fine झालाच म्हणुन समजा... आणि आम्ही रशियात परदेशी असल्यामुळे fine दुपटी तिपटिने वाढतो... तर असाच एका निर्मनुष्य जागी signal होता. आणि आम्ही वळणार तेवढ्यात तो पिवळा झाला पण घाई असल्यामुळे आणि पिवळाच दिवा असल्यामुळे नवरयाने गाडी वळवली पण ते वळण जरा अवघड होते त्यामुळे तोपर्यंत लाल दिवा लागला होता... झालं अचानक ती cops ची गाडी आमच्यामागे येउ लागली पण आम्ही काही लक्ष दिले नाही म्हणुन मग त्याने आपला भोंगा वाजवायला सुरुवात केली... शेवटी थांबणे भाग होते... ( तेवढ्या वेळात नवरयाने माझ्याकडे एक चिडका कटाक्ष टाकुन घेतला. :) ) तरातरा तो महाकाय आला आमच्या गाडी जवळ. ( हे लोकं नेहेमी असे महाकाय / भिमकाय / प्रचंड कसे काय असतात असा मला नेहेमी प्रश्न पडतो... बहुतेक अश्याच लोकांना cops ची नोकरी मिळत असेल :) ) त्याने आम्हाला गाडीची कागदपत्रे, insurance, वाहन चालकाचा परवाना , आमचे passports अश्या काहिबाही गोष्टी मागितल्या... ते सर्व बघुन झाल्यावर मग त्याची गाडी आली मुद्द्यावर.. तुम्ही signal तोडला आता दंड भरा शिवाय office ला summons पाठवणार ते वेगळे... आणि हे सगळं तो रशियन मधे बडबडु लागला... खरं बघितलं तर आम्ही वळण घेतलं तेव्हा पिवळा दिवा होता त्यामुळे logically आम्ही signal तोडला नव्हता...
तो आम्हाला कायकाय बोलायला लागला ...आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि सरळ खांदे उडवले... आम्ही त्याला सांगितलं तु रशियन मधे काय बोलतो आहेस हे आम्हाला अजिबात कळत नाहिये, आम्हाला रशियन येत नाही तेव्हा तु इंग्रजी मधे बोल.. जेव्हा की तो काय बोलतो आहे हे एकेक अक्षर आम्हाला कळत होतं... आणि आम्हाला माहिती होतं की रशिया मधे लोकाना इंग्रजी येत नाही...फार थोडे लोकं इंग्रजी जाणतात...
शेवटी आमचे निरागस (:)) चेहरे, मागे car seat मधे झोपलेली छोटी आणि गाडिची लाल नंबर प्लेट बघुन त्याने आम्हाला फक्त ताकिद देउन सोडुन दिलं आणि आम्ही हुश्श्य केलं :)
त्यानंतर मात्र आम्ही कधिही पिवळा दिवा असला तरी गाडी हाकली नाही... आता आम्ही ईमाने इतबारे हिरवा दिवा लागायची वाट बघतो... :)
मागच्याच आठवड्यात Paulo Coelho ह्यांची Brida ही कादंबरी वाचली... आकर्षक विषय, विषयाची संयत मांडणी आणि कुठेही भडकपणा येणार नाही ह्याची घेतलेली काळजी, यांमुळे मला हे पुस्तक आवडलं...
मुळात विषय माझ्या interest चा होता... त्यामुळे मी ही कादंबरी लगेच वाचायला घेतली...
तर ही गोष्ट आहे ब्रिडा नावाच्या एक आयरीश मुलीची जी प्रत्यक्षात एक witch असते. ( witch साठी योग्य मराठी शब्द सापडला नाही... क्षमस्व ! ) अनेक जन्मांपासुन ती Tradition Of The Moon ह्या परंपरेची पायीक असते... पण ह्या गोष्टीतल्या चालु जन्मात, तिला, ती एक Witch आहे हे माहिती नसतं. पण जादु शिकण्याची तिव्र आंतरीक इच्छा आणि वेळोवेळी मिळणारे संकेत आणि तिचा मित्र , तिला Tradition of The Moon ची Witch असल्याच्या संवेदना जागृत करायला मदत करणारी तिची गुरु आणि तिचा 'Soulmate' ह्यांमुळे ती आपले ध्येय गाठण्यात यशस्वी होते.
मुळात ही एक प्रेमकथा आहे... वर मी जे सांगितले आहे ती केवळ पार्श्वभुमी आहे. आणि जास्त सांगुन मी वाचनाचा मजा किरकिरा नाही करणार. तर ज्यांना witch, witchcraft, Traition Of The Moon , Soulmate ह्यांत रस आहे त्यांनी हे पुस्तक जरुर वाचावे. ( हे पुस्तक Relatively नवे आहे त्यामुळे त्याचे free ebook आंतरजालावर उपलब्ध नाही. त्यामुळे त्याची लिंक टाकता न आल्यामुळे वाईट वाटते आहे. असो.. )
किती दिवस झालेत लिहुन.... बरेच महिने उलटले.... पण लीहिण्याची ऊर्मी अजुनही ताजी आहे.... क़ाय नाही मिळालं मला ह्या मधल्या दिवसात... मातृत्वाचं सुख, सहचरयाचा सहवास, समृद्ध करणारे वाचन आणि अनुभव आणि बाळाने नव्याने शिकवलेली सहनशिलता... हे सारे तुमच्यासोबत share करण्यासाठी मी परत आले आहे... आणि विशेष आभार मानते marathiblogs.net वर लिहिणारया सर्व bloggers चे ज्यांच्यामुळे मला परत लिहिण्याची स्फुर्ती मिळाली....( मधल्या काळात लिहीत नसले तरी नियमीत blogs वाचत होते. )
तर आजची पोस्ट आहे माझ्या बाळावर... बाळ कसली बघता बघता 18 महिन्यांची झाली माझी सोनुली... तिच्या जन्मापासुन आजपर्यंत दिवस कसे फु्लपाखरासारखे उडुन गेले कळले सुद्धा नाही.... तिचा पहिला स्पर्श, तिचा पहिला हुंकार, तिच्या जावळाचा सुवास, सारे काही काल घडल्यासारखे वाटते...
आणि आता तर तिच्यामागे पळता पळता नुसती दमछाक होते... कधी restroom मधे स्वयंपाकघरातील भांड्यांची भातुकली मांडलेली असते तर कधी नवीन कपड्यांचा wonder wipe झालेला असतो. कधी देवघरातील देवांना नवीन देवघर मिळतं आणि चपला जोडे सोफ्यावर विराजमान झालेले असतात तर कधी उशी ची sledge झालेली असते... किती खोड्या आणि किती नाटकं आणि परत मनवण्याची हातोटी एवढी की एक बोळकंभर निर्व्याज हसु सुद्धा पुरेसं ठरावं... असं हसुन हात समोर पसरुन स्वारी गळ्यात पडुन बिलगली की राग गेलाच म्हणुन समजा!!
हे सारं काही मी भरभरुन अनुभवते आहे.... कारण मला माहिती आहे की हे दिवस फुलपाखरी असतात रंगीबेरंगी पण पापणी लवायच्या आत भुर्र्कन उडुन जाणारे... आणि त्यांना आठवणिंच्या तंतुत बांधुन ठेवण्यासाठी सुरु असलेली माझी धडपड ...