शुक्रवार, जुलै २४, २०२६

 फक्त पूल ओलांडण्याची देरी आहे


फक्त पूल ओलांडण्याची देरी आहे

मग काय करायचा पैसा अडका

सोनं नाणं अन् चांदीच्या विटा 

राजेशाही बंगला आणि गाड्या चार

पलीकडे काहीच चालत नाही यार


फक्त पूल ओलांडण्याची देरी आहे

मग काय करशील देहाचे चोचले

जडजवाहिऱ्यांनी लोकांना तोलणे 

ढिगाने कपडे आणि रत्नांचा हार

पलीकडे काहीच चालत नाही यार


फक्त पूल ओलांडण्याची देरी आहे 

मग काय करशील आपल्या पोस्ट चा माज

देशोदेशीच्या चकरा आणि अपडेट्स चा मार

फेसबुक insta वर फोटो हजार 

पलीकडे काहीच चालत नाही यार 


फक्त पूल ओलांडण्याची देरी आहे 

मग काय करशील five star ची बिलं 

जेवतानाही हवं वर आभाळ खुलं 

पोटाला सोसेना मद्याचा भार

पलीकडे काहीच चालत नाही यार 


फक्त पूल ओलांडण्याची देरी आहे

मग काय करशील रुसवे आणि फुगवे

कुणाला दावशील हेवे नि दावे 

जावे लागते मानापमानाच्याही पार

पलीकडे काहीच चालत नाही यार 


फक्त पूल ओलांडण्याची देरी आहे

आहे काय नाही काय सारे समान

अलिकडे अन् पलिकडे एकत्वाचे ध्यान

चल आणि अचल ची धूसर होते धार

पलीकडे काहीच चालत नाही यार 


फक्त पूल ओलांडण्याची देरी आहे

मग कुठे शोधशील देवाधिदेव

विसरून बघ कर्मकांडाची ठेव

द्वैतातील अद्वैताची गंमत असे फार 

पलीकडे हेच चालते यार



                                                          

;;