Monday, November 16, 2009

स्नो व्हाईट

आज सोमवार, आठवडा सुरु, कामाचा दिवस म्हणुन काल रात्री सगळं आटोपुन जरा लवकरच झोपलो. त्यावेळी बाहेर पाऊस, साचलेलं पाणि आणि चिखलाव्यतिरीक्त बाकी सगळं आलबेल होतं :). मध्यरात्री मधेच जाग आली. पडल्या पडल्या खिडकितुन बाहेर बघितलं तर आकाश एकदम लखलखीत दिसत होतं. पण झोपेचा अंमल म्हणा किंवा अजुन काही मी तशिच परत झोपले. सकाळी सहाला नेहेमीप्रमाणे उठले आणि सवयीप्रमाणे स्वयंपाकघरात जाऊन पोळ्यांसाठी तवा बर्नर वर ठेवला तेव्हा सहजच नजर खिडकीबाहेर गेली. आं हे काय? बाहेर इंच अन इंच जागा बर्फाने व्यापली होती. काल रात्री इथे खुपच बर्फ पडला. आता मला काल रात्री उजळलेल्या आकाशाचं गुपीत कळलं. (इथे बर्फ पडला की रात्री आकाश सुद्धा काळ्या च्या ऐवजी दुधाळ हलक्या पांढर्‍या रंगाचं दिसतं.) म्हणजे स्नोफॉल ला सुरुवात कधिच झाली आहे पण काल पडलेला बर्फ हा ह्या सीझन मधला अजुनपर्यंतचा हेवी स्नोफॉल आहे. अजुनही बर्फ पडतोच आहे. ह्म्म्म्म चला खरा विंटर सुरु झाला. आता बसा 5-6 महिने घरात हातावर हात ठेवुन :).

जरी स्नोफॉल सुरु असला तरी तेव्हा ताजा ताजा पडलेला बर्फ इतका मस्त दिसतो. (नंतर सगळा चिखल आणि राडा होतो ती गोष्ट वेगळी :)). आज सकाळपासुन मी सारखे त्या बर्फाचे घरातुनच वेगवेगळे फोटो काढते आहे. बाहेर गेले तर अजुन छान फोटो काढता येतील पण सगळा जामानिमा करून जायचा आज कंटाळ आला आहे. त्यातले काही निवडक फोटो खाली टाकते आहे.हा सकाळी सहाला काढलेला फोटो आहे. सो कॉल्ड सुर्योदय व्हायच्या आधी. सो कॉल्ड अश्यासाठी कारण मागचे 3 आठवडे बाहेर नुसता ग्रे रंग दिसतो आहे :). सुर्य, सुर्यप्रकाश कशाचेही दर्शन नाही. ह्या फोटोत जसा हलका पांढरा काहिसा दुधाळ आणि निळसर रंग दिसतो आहे, बर्फ पडला की रात्री आकाश साधारण तश्या रंगाचं दिसतं. अगदी हिमगौरी आणि सात बुटके च्या गोष्टिसारखं :).त्याच जागेचा हा फोटो सकाळी सात वाजता काढलेला. पार्किंग लॉट मधला. मधेच डोकावुन बघितले तर एक गृहस्थ बर्फाने झाकलेल्या गाडीवरचा बर्फ साफ करत होते. पण ते गेल्यावर परत एवढा बर्फ पडला की ती गाडी परत झाकल्या गेली :).
हा फोटो काढला आहे सकाळी 9 वाजता. आमच्या घराखाली एक छोटा पार्क आहे. त्या पार्क मधिल ही झाडं. वार्‍यामुळे थोडा बर्फ पडला नाहितर सबंध पांढरी दिसत होती ही झाडं.
वरचे दोन्ही फोटो आमच्या घरासमोरचे. मीनी जंगल म्हणता येइल एवढी झाडं त्या जागेत आहेत. हि सगळी झाडं बघा कशी भुतासारखी दिसताहेत. झाडांच्या भुतांचं जंगल :).
बर्फाने झाकलेले टायर आणि मोडक्या फाटकातील नक्षी.


हा फोटो सगळ्यांत मजेचा. पुर्ण अंग झाकुन, 3-4 जाडजुड लेयर्स चढवुनही बाहेर 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबलो तर पायांची आग व्हायला लागते तिथे ही कावळ्यांची बाळे चक्क अर्धा तास बर्फात लोळत खेळत होती. मजा आली त्यांचे बर्फात लोळणे बघताना :).


हे सगळे फोटो काचेच्या खिडकीआडुन, ऑटो मोड वर घेतले आहेत कारण मधे काचेची खिडकी असल्यामुळे वेगळ्या ऍडजस्टमेंट्स करुन ते फोटो तेवढे चांगले येत नव्हते. त्यामुळे काही ठिकाणी ते जरा ग्रेनी आले आहेत आणि काहींचा शार्पनेस हवा तसा आला नाही. हे आपले मजेत म्हणुन काढले. बघु पुढच्या वेळेस छान बर्फ पडला की आळस झटकुन बाहेर जाण्याच प्रयत्न करेन आणि बाहेर गेलेच तर छान छान फोटो नक्की काढेन हे आज मी माझेच मला प्रॉमीस केले आहे :).

10 प्रतिसाद्:

Mugdha said...

सह्ही आहे गं रोहिणी..हिमगौरी आणि सात बुटके च्या गोष्टिसारखं :).

पुढ्चे फोटॊ लवकर टाक...

काळजी घे..

Anonymous said...

मस्त आहेत ग photos. सध्या आमच्या इथे पुण्यात सुद्धा धो-धो पाउस सुरु आहे. आणि मला पण अस्साच कंटाळा येतो घराबाहेर पडण्याचा..

रोहिणी said...

@ Mugdha - हो गं...शहराबाहेर गेलो तर बर्फाने झाकलेली छोटी छोटी लाकडी घरे, नागमोडी वळणे घेत जाणारा बर्फाने झाकलेला पांढरा शुभ्र रस्ता. अक्षरश: पर्‍यांच्या राज्यात आल्यासारखे वाटते. शहरात मात्र त्याच बर्फाचा पुढे चिखल होतो :( . पुढचे फोटो ह्म्म्म्म मी पण वाटच बघतेय, आळस झटकुन कधी काढेन ते :).

रोहिणी said...

@ manatuna - थॅंक्स अमृता.. पुण्यात खुप पाऊस आहे ना आजच बोलले आईशी. खरंच आहे. असा धोधो पाऊस पडत असताना घराबाहेर पडण्याचा कंटाळ येतो खरा. त्यापेक्षा घरीच बसुन गरमागरम कुरकुरीत भजी खावी. अहाहा.. पाणी सुटलं बघ तोंडाला :).

भानस said...

रोहिणी चला झाला विंटर सुरू.....:( आता मे पर्यंत घर एके घर. आमचीही विकेट पडू घातली आहेच.:D फोटो छान आलेत. बर्फ पडला की आसमंत अगदी उजळून निघतो. एकदम स्वच्छ स्वच्छ. बाकी तो उपसून उपसून कंबरडे मात्र पुरे मोडते....अन मोडतच राहते.

रोहिणी said...

@ भानस - हो ना... विंटर सुरु झाला :( ... इथे ह्यावर्षी जरा लवकरच सुरु झाला आहे. ऑक्टोबर महिन्यापसुनच स्नो सुरु झाला :( ... आसमंत उजळतो पण कंबरडे मोडते हे मात्र अगदी खरं :D. फोटोसाठी मनापासुन आभार. तुम्हाला ही चित्रं काही नवी नसणार :).

Ajay Sonawane said...

पहिला फोटो एकदम मस्त , त्यातला निळा रंग ( निळाच आहे ना तो ? ) भलताच भारी वाटत आहे. मला पडलेला एक बेसिक प्रश्न ( हसु नको :-))
: एवढया बर्फात गाडी चालवत तुम्ही लोक ऑफीस ला कसे काय जाता ? रस्त्यावर सुद्धा बर्फच असेन ना ?

रोहिणी said...

@ Ajay - तो निळाच रंग आहे आणि ओरिजिनल आहे. फोटोशॉप किंवा पिकासा मधे टच अप केलेला नाही. असा निळा रंग बहुतेक रोजच रात्रभर असतो. मला पण खुप आवडतो हा रंग. अरे इथे चारचाकी साठी विंटर चे वेगळे टायर्स मिळतात. त्यामुळे विंटर सुरु व्हायच्या आधी आणि संपल्यावर असे दोनदा टायर्स बदलायला लागतात. त्यामुळे सगळ्यांकडेच समर आणि विंटर असे दोन प्रकारचे टायर्स असतात. शिवाय इथल्या कॉर्पोरशन चे मणसं असतातच रस्ते साफ करायला. खुपच कष्टाचं काम आहे बिचार्‍यांचं.

काल निर्णय said...

रोहिणी, फोटो मधून तो एक खास 'विंटर' डोळ्यांपुढे उभा राहिला! शनिवार पेठ आणि कर्वेनगरात (पुणे) आयुष्य गेलेल्या [जाणर्‍या] माझ्यासारख्याला जीवनात प्रथमच आलेला हिमवर्षावाचा अनुभव काय विलक्षण होता त्याची आठवण झाली! तुम्ही काढलेले फोटोज आणि वर्णन खासच आहे. रात्रभर भुरुभुरु हिमवर्षाव व्हावा आणि सकाळी खिडकीचा पडदा बाजूला केल्यावर ओठांतून आपसूकच 'अहाहा' यावं. कितीही पाहिलं तरीही समाधान होत नाही. तो आनंद काही वेगळाच नाही का?

~ संदीप

रोहिणी said...

@ काल निर्णय - धन्यवाद संदीप. खरय.. रात्रभर भुरुभुरु बर्फ पडला की सकाळी सकाळी वर्दळ सुरु व्हायच्या आधी दिसणारे दृश्य म्हणजे निव्वळ अप्रतिम. तो आनंद वेगळा खरा.