Friday, October 23, 2009

वासाचे घर

काल झी मराठी वर हसा चकटफू चा जुना भाग बघत होते... तो एपिसोड दीवाळी विषेश होता. त्यात एक सेल्समन फराळाच्या वेगवेगळ्या वासांचे परफ्युम्स विकत होता. जरा हटकेच कल्पना. तेव्हाच लक्षात आलं की आपल्या मनात / डोक्यात कितीतरी वास घर करुन असतात. दीवाळी च्या नुसत्या आठवणिनेच आपसुकच नाकाला फराळाच्या पदार्थांचे वास येऊ लागतात. मी लहान असताना आई मला विचारायची 'अगं रवा भाजल्याचा वास आला का गं?' किंवा 'बेसनाचा खमंग वास येतोय ना?' तेव्हा मी असायचे खेळत नाहितर दीवाळीचा होमवर्क पुर्ण करत. आणि आई फक्त मलाच विचारायची असं नाही तर त्यावेळेस घरात जो कोण असेल प्रत्येकाला विचारायची. आणि प्रत्येकाचा होकार आला की मगच तिचं समाधान व्हायचं. तिचं पदार्थ करण्याचं गणित असं बरेचदा वासावर अवलंबुन असायचं. तेव्हा मला तो प्रकार जरा गमतिशीर वाटायचा पण माझ्याही नकळत पुढे मी सुद्धा स्वयंपाक करताना वासावर काही गोष्टी ठरवु लागले.

असाच एक वास माझ्या मनात घर करुन बसलाय तो म्हणजे एका खोलीचा. बाबांच्या गावी आमचा खुप मोठा वाडा होता. त्यात एक प्रशस्त असे देवघर होते. जरासे अंधारे. पण तिथे मला खुप छान वाटायचे. एकप्रकारचा शांतपणा असायचा त्या खोलीत. आजोबा दररोज सकाळी तास दोन तास तिथे पुजा करायचे. मग उगाळलेलं चंदन, देवासमोर लावलेली मंद वासाची उदबत्ती, घरची ताजी खुडुन वाहिलेली मोगरा, गुलाब, कण्हेर, स्वस्तिक, जाई, जुई आणि चमेलीची फुलं, नुकतीच शांत झालेली समई आणि निरांजन, असा सगळ्यांचा मिळुन एक खुप छान प्रसन्न पण शांत, एक प्रकारचा गुढ गंभिरपणा असलेल्या वासाने ती खोली भरून जायची.

नव्या पुस्तकांचा वास कुणाला आवडत नाही? मी आणि दादा शाळा सुरु व्हायच्या आधी बाबांसोबत उड्या मारत जायचो नवीन वह्या पुस्तकं आणायला. तेव्हा अभ्यासाची ओढ कमी आणि त्या कोर्‍या वासाचेच आकर्षण जास्त असायचे. ती नवी कोरी न हाताळलेली पुस्तकं, त्यांना येणारा छापखान्यातील शाहिचा निसटता ओला वास, करकर वाजणारी नवी पानं आणि काही चिकटलेली पाने मिळाली तर खजिना सापडल्याचा आनंद. कारण ती चिकटलेली पाने सोडवायला मला आणि दादाला भयंकर आवडायचे आणि बरेचदा आमची त्यावरुन भांडणे पण झाली आहेत :) ... आई बाबांनी आम्हाला वाचनाची गोडी लागावी म्हणुन, वाचनालय चा निटस उच्चार सुद्धा करता येत नव्हता त्या वयापासुन आमच्यासाठी लहान मुलांच्या वाचनालयाची मेंबरशिप घेतली. तरीसुद्धा पुढे कधिमधी चंपक, चांदोबा, कुमार, कीशोर अशी नविन मासिक विकत आणली की सगळ्यात आधि मी त्या पुस्तकांचा भरभरुन वास घ्यायचे :).

मला आवडणारा आणि माझ्या मनात घर करून बसलेला असाच एक वास म्हणजे माझी आई जी उशी वापरते त्या उशीचा वास. त्या उशीला शिकेकाईचा मंद सुवास येतो. माझी आई अजुनही केस धुवायला शिकेकाईच वापरते. त्यामुळे तिच्या केसांना जसा शिकेकाईचा सुंदर वास येतो तसाच तिच्या उशीलाही येतो. आताही मी जेव्हा केव्हा माहेरी जाते मला आईच्या उशीवर डोके ठेवुन झोपायला खुप आवडते.

मला आणि बहुतेकांना आवडणारा असाच एक वास म्हणजे लहान बाळांचा वास. लहान बाळांना काय सुंदर वास येतो. नुकतेच न्हाऊ माखु घातल्याचा वास, मालिश केलेल्या तेलाचा वास, मऊ उबदार मलमलच्या कपड्यांचा वास, जावळाचा वास, मऊ मऊ हाताचा वास, आणि कळस म्हणजे जॉन्सन च्या पावडर चा वास. मन कितीही उदास झालं असेल, राग आला असेल, हताश वाटत असेल तरीही लहान बाळाला छातीशी घट्ट धरलं आणि भरभरून त्याचा वास आपल्या नाकात भरुन घेतला की कसं आश्वासक वाटतं. अनुभव घेतला नसेल तर नक्की घेऊन बघा मी काय म्हणते ह्याची कल्पना तुम्हाला येईल.

मला अजुन एक आवडणारा वास म्हणजे बैंगनफल्ली आंब्याचा. आता काही जण म्हणतील हा कुठला बरं आंबा? विदर्भातल्या लोकांना तर सांगायलाच नको. पण बाकिच्यांना हा आंबा कदाचित बदामी आंबा म्हणुन ठाऊक असेल. आम्ही खुप लहान असताना नागपुरला हापुस आंबा काही मिळायचा नाही. त्यामुळे आंबा म्हणजे बैंगनफल्ली असं समीकरण डोक्यात फिट्ट बसलं होतं. बैंगंफल्लीचा रस, मिल्कशेक, किंवा तोच रस आणि मिल्कशेक उरवून आता जात नाहिये मला म्हणुन गुपचुप फ्रिज मधे जमवलेलं आणि नंतर दादाला चिडवत चिडवत खाल्लेलं आईसक्रिम आणि कुल्फी, ते खाल्ल्यावर डेझर्ट कुलर च्या गारव्यात आईच्या जुन्या सुती साड्यांची पांघरलेली गोधडी आणि साखर(आंबा)झोपेत सरलेली रणरणती दुपार. अश्या बर्‍याच आठवणी ह्या आंब्याशी जोडल्या आहेत. पुण्याला येईपर्यंत तर मला हापुस आंबा अजिबात आवडत नसे. आता माझं मलाच खरं वाटत नाही. पण तेव्हा हापुस विरुद्ध बैगनफल्ली ह्या लढाईत बैंगनफल्ली साठी प्राणापलिकडे लढायची. मग हळुहळु हापुस वरचा राग ओसरला.असली हापुस आंब्याची गोडी कळली आणि हापुस आंबा माझा झाला. पण आजही कदाचित हापुस आणि बैगनफल्ली दोन्ही आंबे माझ्यासमोर ठेवले तर कदाचित माझ्या लहानपणिच्या सुवासाच्या आठवणी परत ताज्या करण्यासाठी कुणासठाऊक मी बैंगनफल्लीच उचलेन :).

आता मी तुम्हाला सांगेन तर तुम्ही हसाल पण मला ना पेट्रोल चा वास प्रचंड आवडतो. काही जण नाकं मुरडतील ही कसली आवड. पण खरच मला पेट्रोल चा वास खुप आवडतो. त्यामुळे मी लहान असताना जेव्हा केव्हा बाबा पेट्रोल भरायला जायचे तेव्हा मला जायचच असयाच त्यांच्या सोबत. बाबांना तेव्हा ही आवड काही माहिती नव्हती. आता हा लेख वाचल्यावर मात्र बाबांना कळेल की लहान असताना पेट्रोल भरायला जाताना का जायचा हट्ट करायची.


असे अजुन बरेच वास माझ्या मनात रुजले आहेत. आय आय टी मधे असताना सगळ्या मोसमात रस्त्यांच्या दुतर्फा भरलेल्या, फुललेल्या आणि लगड्लेल्या झाडांचा वास, शेजारच्या बेकरीमधे भाजल्या जाणार्‍या ताज्या ब्रेड चा वास, आजीने घातलेल्या आणि नाकाला झोंबणार्‍या लाल मिरचीच्या चुरचुरीत फोडणीचा वास, शेणाचा सडा घातलेल्या ओल्या अंगणाचा वास, नवर्‍याने रोज सकाळी पुजा केली की त्याच्या हाताला येणारा अष्टगंधाचा वास आणि असेच अनेक वास. लिहायला बसले तर प्रत्येकावर एक एक स्वतंत्र लेख होईल. पण तूर्तास इथेच थांबवते :). Wish you a fragranceful day ahead :).


फोटो - गुगल इमेजेस वरून.

16 प्रतिसाद्:

भानस said...

अगं किती छान लिहीलेस. स्वयंपाक करताना हे वासाचे गणित पक्के जमले की हमखास यश ठरलेले समीकरण.:) देवघरातला संमिश्र वासांचा मन प्रसन्न करणारा तरीही शांत सुंगध.कोरी पुस्तके, कोरे कपडे या सगळ्याचे भारी अप्रूप होते आणि अजूनही आहे गं मनात त्यामुळेच त्याची भूरळ. बाळांचा वास म्हणजे स्वर्गसुख. त्यापलीकडे काहीच नाही. आणि तू वाचलीस का माझी पेट्रोलच्या वासाच्या वेडाची पोस्ट...हा हा...अग ठार वेडेपणा गं बाई. शेवटी तर आमच्या बाबांनी कॆन भरून पेट्रोल घरातच आणून ठेवले होते.हेहे....
आवडली ग पोस्ट.

रोहिणी said...

@भानस - आभार :) ...
माझी अजुन एक गम्मत म्हणजे मी स्वत: आजपर्यंत चहाची चव चाखलेली नाही पण चहा फक्कड जमला आहे की नाही हे मी वासावरुन ओळखते. आहे ना वेडेपणा :D ... त्यामुळे लहान असताना कुणाकडे भेटायला गेलो आणि त्यांनी चहा केला की मी लगेच आईच्या कानात सांगायची अगं चहा छान नाहिये घेऊ नकोस. आई मनातल्या मनात डोक्यावर हात मारून घ्यायची :D ... आवरते नाहितर इथेच एक दुसरी पोस्ट होईल.
तुमची पेट्रोल वासाची पोस्ट आता लगेच वाचली... आपली सेम केस दिसतेय :) वेडेपणाच अजुन काय :) ...
'शेवटी तर आमच्या बाबांनी कॆन भरून पेट्रोल घरातच आणून ठेवले होते.' हे म्हणजे मस्तच. तेवढ्यासाठी बाहेर जायला नको.

मीनल said...

खूप छान सुगंधित पोस्ट.
पेट्रोलचा वास माझ्या आईलाही आवडतो. पण या वासाचे फ़ॅन हे सांगायला उगाचच बिचकतात. :)
तिला ही पोस्ट दाखवते.
keep writing.

रोहिणी said...

@मीनल - स्वागत आणि मनापासुन आभार. पेट्रोल चा वास आवडतो हे सांगायला लोकं का बिचकतात हे मी समजु शकते. हा हा हा ... :) तुमच्या आईला ही पोस्ट नक्की दाखवा. असाच लोभ असु देत.

काल निर्णय said...

"वासाचे घर" masta jamlay!! Tajitaji batatyachi khamanga bhaji ani jamun aleli amti, ani varan-bhatacha to apratim sugandha... ahaha nusatya athavaninech swayampak gharala bhet dyavishi vatate ahe! Paradeshat rahatana, savayine avadu lagalelya kahi rochak padarthanche [fried noodles, omlette che avaran chadhavlela pandharashubhra bhaat, vagaire!!] vaas suddha khuup avadu lagale hote tyachi hi athavan jhali ! Masta vatla vachun!!

रोहिणी said...

@कालनिर्णय - हो ना बटाट्याची भाजी, चिंच गुळाची आमटी, आंबेमोहर चा भात आणि पिवळधमक वरण आणि त्यावर साजुक तुपाची धार. कुणाल भुक लागणार नाही हे वर्णन वाचुन :). पण परदेशात राहुन तिथलेही पदार्थ आपल्याला आपलेसे करून घेतात हे मात्र खरय. ( कधि कधि नाईलाजास्तव ही खाऊन खाऊन पुढे आवडु लागतात :)) आवर्जुन प्रतिक्रिया दिलीत आभार. असेच भेट देत रहा.

Ajay Sonawane said...

आईशप्पथ, अगदी माझ्या मनासारखी पोस्ट लिहिला गेला आहे. मला अगदी याच विषयावर लिहाव असं वाटत होत आणि तु तसंच लिहिलं आहेस. पेट्रोल चा वास मला ही खुप आवडतो. खरं तर आपण एक कम्युनिटी बनवायला हवी पेटोल चा वास आवडणारयासाठी नाही का, मस्त लेख बर का !

रोहिणी said...

@अजय - तुला पण ह्याच विषयावर लिहावसं वाटत होतं म्हणजे थोडसं ' Great people think alike (and fools don't differ ;) )' असच झालं नाही का? आपण एकाच पठडीतले दिसतोय :). आणि पेट्रोल चा वास आवडणार्‍यांची कम्युनिटी कधि सुरु करायची बोल सभासद व्हायला मी एका पायावर तयार आहे :). आवर्जुन प्रतिक्रिया दिली त्याबद्दल मनापासुन आभार.

Anonymous said...

i guess me ek comment takali pan takatana kahi tari gadbad zali mhanun hi parat.

haha :) mala pan petrol ani spirit cha vas khup aavadato..

BTW mazya postla reply kelyabaddal thanks..

-amu

रोहिणी said...

@अमु - स्वागत अमृता... आवर्जुन प्रतिक्रिया दिलीस त्याबद्दल मनापासुन आभार. असाच लोभ राहु देत :).

Saee said...

Masta jamlay kharach.
Mala pun ase khup was nostalgic kartat. Especially the smell of Gardenia (marathit Anant). Ani bakulicha vas. Both remind me of my grandmom. Luckily I have a Gardenia shrub outside my house in Australia. But bakuli is hard to find.
Good one. :)
Keep writing!!

रोहिणी said...

@सई - हो ग सई... अनंताचा वास मला सुद्धा खुप आवडतो. माझ्या लहानपणिच्या अनेक सुवासिक आठवणी अनंताशी जुळलेल्या आहेत. आणि बकुळिचा वास कुणाला नाही आवडणार? आवर्जुन प्रतिक्रिया दिलीस आभार :)...

Anonymous said...

मस्त सुगंधित आहे पोस्ट....मला पेट्रोल पेक्षा नव्या रंगाचा वास आवडतो. मुलाला पेट्रोलचा....
बाकी बागेतला जाई, जुई, मोगरा आहाहा!!!लग्नातला निशिगंध, शेवंतीच्या फुलांचा वास....आणि सगळ्यात आवडता, नुकतेच न्हायलेल्या तान्हूल्याच्या अंगाचा वास....

रोहिणी said...

@सहजच - अरे हो नव्या रंगाच्या वासाबद्दल लिहायलाच विसरले. मला सुद्धा फार आवडतो नव्या रंगाचा विषेशत: ऑईल पेंट चा वास. आणि हो लग्नातला निशिगंध आणि शेवंतीचा वासही खासच :). वेगळिच नजाकत असते त्या वासात. प्रतिक्रियेबद्दल मनापासुन आभर. लोभ असु देत :).

Anonymous said...

'पेट्रोलचा आक्रमक वास' असा कोणीतरी प्रयोग केला आहे. आणि हे 'आक्रमक' विशेषण चपखल वापरल्याबद्दल शान्ताबाई शेळक्यांनी त्याचा उल्लेख केला आहे.

प्रसिद्‌ध पत्रकार कै श्री बर्नार्ड लेव्हिन यांनी आगपेटीच्या कडेला विशिष्ट वास येतो, त्याचा उल्लेख केला होता. बर्‍याच काड्या पेटवून झाल्यावर तर तो एकदमच ज़ाणवतो.

रोहिणी said...

@Anonymous - माहिती बद्दल आभार. मला हे माहिती नव्हते. धन्यवाद.