Tuesday, November 10, 2009

असे पाहुणे येती...

मी आणि दादा लहान असताना आमच्या घरी सतत पाहुणे असायचे. घरी कोणि पाहुणे येणार म्हटलं की आम्हा भावंडांच्या अक्षरश: अंगात येत असे. आणि त्यात जर पाहुण्यांना आमच्या वयाची मुलं असली की विचारायलाच नको. आमचा धुमाकुळ बघुन आईचा चेहरा मात्र बघण्यासारखा व्हायचा. आमची आई स्वभावाने अगदी गरीब आणि बाबा प्रचंड प्रेमळ असले तरी जमदग्निचा अवतार त्यामुळे बाबांनी अगदी वेळेवर जरी सांगितले की पाहुणे येणार आहेत तरी कपडे बदलुन बाहेर निघालेली आई निमुटपणे परत घरात कामाला लागलेली मला आठवते आहे.


आता मला जेव्हा या पाहुण्यांना तोंड द्यावं लागतं तेव्हा सारखी मला आई(आणि देव पण)आठवते. काय कुणास ठाऊक पण आमच्या राशीला सदैव पाहुणे लागलेले असतात :). माझा बोलघेवडा स्वभाव आणि नवर्‍याचा काय वाटेल ते झालं तरी नाही म्हणणार नाही चा नारा. त्यामुळे आओ जाओ घर तुम्हारा. आता तर आम्ही आदरातिथ्यात एकदम एक्स्पर्ट :) आणि प्रसिद्धही :( झालो आहोत.


आमच्या सोयीसाठी मी आणि नवर्‍याने पाहुण्यांची ढोबळमानाने दोन ग्रुप्स मधे विभागणी केली आहे. पहिला - भेटायला येऊन जेवुन खाऊन जाणारे पाहुणे आणि दुसरा - घरी रहायला येणारे पाहुणे. आणि दोन्ही प्रकारच्या पाहुण्यांचे इक्वली वाईट अनुभव आलेले आहेत. तरी त्यातल्यात्यात भेटायला येऊन जेवुन खाऊन जाणारे पाहुणे परवडले. मी लिहिणार आहे दोन्ही पाहुण्यांवर पण आजचा मान पटकावला आहे घरी रहायला येणार्‍या पाहुण्यांनी :).


आमचं नुकतंच लग्नं झालं होतं. आम्ही स्वत:च सेटल होत होतो अशात नवर्‍याने वर्दी दिली की त्याच्या मित्राची बदली त्याच गावात झाली असल्या कारणाने सुरवातिचे 10-12 दिवस तो आणि त्याची बायको आपल्या सोबत राह्तील. मी अगदी आनंदाने होकार दिला. नाहितरी मला तिथे कोणि मैत्रिण नव्हती त्यामुळे मी एकदम खुश. नवरा मात्र गालातल्या गालात हसत होता. पण माझ्या आनंदापुढे मी त्याच्या हसण्याकडे तेव्हा लक्षच दिलं नाही. आता मला कळतंय त्याला एवढं हसु कसलं येत होतं ते :). ते घर 4 खोल्यांच होतं. बैठकिची खोली, स्वयंपाकघर, आमची बेडरूम आणि देवघर. त्यांची व्यवस्था देवघरात केली होती. ठरल्या दिवशी आले. सुरवातिला एकदम मोकळे फ्रेंडली वाटले मनात म्हटलं चला सुरूवात तर छान झाली. पण नंतर वागण्याची एक एक तर्‍हा बघायला मिळाली. त्या मित्राची बायको 4 महिन्यांची प्रेग्नंट होती. त्यामुळे आधिच माझ्यावर जरा दडपण होतं. मी नवीन लग्न झालेली. काय खायला द्यायचं कसं द्यायचं एकुणच काही महिती नव्हतं. ती आरामात उठायची सकळी 9.30 / 10.00 ला. मग बाईसाहेबांना पलंगावरच आधि बेड टी द्यावा लागायचा. आधि हातात पाणि द्या मग चहा द्या. मग निवांत कधि कप तर कधि 2 कप चहापान व्हायचं. मग डुलतडुलत जायची आन्हिकं आटोपायला. आंघोळ झाली की मेक अप करून तयार व्हायला परत अर्धा तास. मला कळायचा नाही की घरीच तर बसायचं आहे तर मेक अप कशाला. मी आपली सकाळी सहाला उठुन केर वारे करून भराभर आंघोळ आटोपली की जो बुचडा बांधायची तो बाहेर जायचं नसेल तर तसाच. मग कपडे भिजवा, नाश्ता बनवा. नवर्‍याला द्या त्याच्या मित्राला द्या. ते दोघे नाश्ता करून निघुन जायचे. मग ती तयार झाली की हातात गरम नाश्ता परत कप 2 कप चहा. असा मनसोक्त नाश्ता झाला की निघुन जायची तिच्या एका मैत्रिणीकडे. मी परत घर आवर, जेवणाची तयारी कर. ह्यात वेळ जायचा. जेवायच्या वेळेला नवरा बायको यायचे जेवायचे आणि परत दुपारची झोप काढायला आपल्या खोलीत निघुन जायचे. झोप झाली की परत चहा आणि तयार होऊन बाहेर गेले की थेट रात्री साडे नऊ ला जेवायला यायचे. परत रात्रीचे जेवण झाले की त्यांच्यासोबत पत्ते खेळा. नाही म्हणायची सोय नाही कारण पाहुणचार करण्याचा पहिला वहिला अनुभव स्पॉइलस्पोर्ट व्हायचे नव्हते :). ते आरामात उठायचे त्यामुळे त्यांना झोप यायची नाही आणि मी डुलक्या घेत घेत आपले पत्ते दाखवत दाखवत कसाबसा खेळ संपायची वाट बघायची. एक दिवस तर तो मित्र चक्क घरातच नखं कापुन फरशीवर टाकत होता. मी म्हटलं अरे खाली पेपर वगैरे घे आताच केर फरशी झाली आहे. तर त्यावर हसुन म्हणाला काही होत नाही. मला अशिच सवय आहे आमच्याकडे आम्ही असेच करतो. ह्यावर काय बोलणार? त्याची बायको रेस्टरूम ला ज्या चपला घालुन जायची त्याच चपला घरभर वापरायची. मला किळस यायची. शिवाय त्यांची सोय देवखोलीत केली होती तिथेही ती त्याच चपला घालुन जायची. मला रहावलं नाही. तिला म्हटलं अगं निदान देवखोलीत तरी त्या चपला वपरू नकोस तर म्हणे आमच्या घरी आम्ही त्याच चपला वापरतो. मग मात्र मी तिला म्हटलं की तुल रेस्टरूम ला जायला आणि घरात वापरायला दोन वेगळे जोड देते मी. त्याच चपला घालु नकोस. एकुणच जरा त्रासदायक प्रकरण झालं. त्रास झाला तो झाला आणि वर अभ्यास पण बुडला तो वेगळाच.


त्यानंतर चा अनुभव आला दिड वर्षांपूर्वी. नवर्‍याने नेहेमीप्रमाणे या या घर आपलेच आहे म्हटल्यावर कोण नाही येणार? एक कुटुंब मुंबईला जायला निघाले होते. त्यांची आमची अजिबात ओळख नव्हती. केवळ नाव ऐकुन होतो. त्यांच्या गावापासुन डायरेक्ट फ्लाईट नसल्यामुळे आमच्याकडे 2 दिवस राहुन मग पुढे जाणार होते. गृहस्थ बायको आणि 2 मुलिंना सोडायला आले होते. मुंबईला बायको आणि पोरी तिघी जाणार होत्या आणि त्यांचे बाबा कामाच्या गावी परत जाणार होते. बाप रे ती बाई म्हणजे भयंकर प्रकरण होतं. तिच्या त्या दोघि पोरी बास हा शेवटचा दिवस असं मानुन धिंगाणा घालत होत्या. लिविंग रूम चं अक्षरश: समरांगण झालं होतं. सोफ्यावरचे सगळे कुशन्स खाली होते. कुठे कुठे जास्त धसमुसळे पणा केल्यामुळे उसवले होते. झाडांची पाने तोडुन घरभर विखुरली होती. डायनिंग टेबल च्या खुर्च्या बैठकिच्या खोलीत आणि सोफ्याचे सिंगल सिटर डायनिंग रूम मधे. लेकीच्या खेळण्यांची तर पार वाट लावली होती. लेकिच्या गोष्टिच्या आणि कवितांच्या पुस्तकांनी मारामारी केल्यामुळे सगळी पुस्तकं खिळखिळी झाली होती आणि काही काही पानं सुटी झाली होती. हे सगळं होत असताना त्या पोरींची आई मस्त बसुन होती आणि म्हणत होती मी ह्यांना सांभाळु शकत नाही. आपली पोरं एका अनोळख्या घरी धिंगाणा घालत असताना कोणि इतकं शांत कसं बसु शकत आश्चर्यच आहे. लेक तेव्हा अगदीच तान्ही काही महिन्यांची होती. मदतीला घरात कोणि नाही. नवरा पण नेमका तो आठवडा ऑफिसच्या कामाने गावाबाहेर गेला होता. बरं त्या पोरी वाढत्या वयाच्या त्यांना सारखी भुक लागायची. मग त्यांना खायला द्या. वर परत आंटी ये नही वो चाहिये. रिपीट नही चाहिये. अश्या फर्माईशी. आणि आई जणु काही आराम करायलाच आली होती. सारखं कुकिंग नाहितर भांडी घासणे (हाताने कारण डिशवॉशर नाहिये :)), व्हॅक्युम करणे, कपडे धुणे हेच सुरु होतं. एक दिवस त्या बाईला रात्रिचं जेवण बनवायला सांगितलं तर येत नाही म्हणुन तिने सरळ हात वर केले. मधे त्या बाईच्या नवर्‍याचा फोन आला तो तिला विचारत होता की कशि आहेस तर निर्लज्ज बाई म्हणते की मला नको रोहिणीलाच विचार कशि आहेस ते. तिला जास्त गरज आहे. अस्सा राग आला होता. मला अक्षरश: तिच्या झिंज्या उपटाव्याश्या वाटल्या :).. अशात त्यांची फ्लाईट रद्द झाली आणि पुढची फ्लाईट 4 दिवसानंतरची होती. फारच त्रासाचा ठरला तो आठवडा.


त्यानंतर चा अनुभव आला 7-8 महिन्यांपूर्वी. मी आईकडे गेले होते. नवरा आम्ही गेल्यावर 15 दिवसांनंतर येणार होता. नवर्‍याची खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणुन मी त्याच्यासाठी बर्‍याच पोळ्या आणि पराठे बनवुन गेले होते. 15 दिवसांनी नवरा आल्याआल्या त्याला एक मेल आली. आमच्या परिचितांपैकी एका बाईला 4-5 दिवस आमचं घर रहायला हवं होतं कारण तिने भाड्याने घेतलेले घर रीपेयर्स साठी बंद होतं. आम्ही विचार केला ठिक आहे. नाहितरी घर रिकामं आहे. आणि ती बाई तिथे राहिली तरी आपल्याला काही करावं लागणार नाही. पण घरी परत आल्यावर डोक्याला हात लावुन घ्यायची वेळ आली. एक तर ती बाई 4-5 दिवस म्हणुन प्रत्यक्षात 15 दिवस राहिली. तिने फ्रिजमधल्या सगळ्या भाज्या संपवल्या होत्या. ग्रोसरी संपवली होती. दुध सगळं संपवलं. कॉलिंग कार्ड सगळं वापरलं. व्हॅक्युम केलं नाही. त्यामुळे घरात सगळीकडे धुळ झाली होती. मी नवर्‍यासाठी लाटलेल्या पोळ्या आणि पराठे नवर्‍यानेही खाल्ले नव्हते. त्याने ते वाचवुन ठेवले ह्या विचाराने की आल्याआल्या बायकोला परत लाटायला नको. तर ह्या बाईने त्या सगळ्या पोळ्या आणि पराठे सुद्धा संपवले. रेस्टरूम मधे कमोड वापरलं ते सुद्धा स्वच्छ केलं नाही आणि वर पडलेले पिवळे डाग दिसायला नको म्हणुन वरती हार्पिक घालुन ठेवलं होतं. फ्लश केल्यावर तिने केलेला चालुपणा लक्षात आला. ग्रोसरी, दुध, फळं भाज्या वापरल्या ते ठिक आहे. पण निदान परत घरात आणुन तरी ठेवावं. खाली दुकान आहे. असही नाही की 4 कोस जावं लागतं. आणि डोक्यात तिडिक गेली की गावात पाय ठेवल्या ठेवल्या घरी परतत असताना तिने फोन केला की घरात दुध संपलं आहे. तुमच्या मुलीसाठी लागेल तेव्हा घरी येता येता रस्त्यात थांबुन विकत घ्या म्हनजे फजिती होणार नाही. संताप झाला नुसता. घराखाली दुकान आहे तर म्हणे मला दिसलं नाही. ही बाई स्वत: ह्या गावात 4 वर्षांपासुन नोकरी करतेय. खालचं दुकान नाही सापडलं तर अजुन माहिती असलेल्या दुकानातुन वस्तु आणता आल्या असत्या. एवढं करूनही वर आभार नाही की दिलगिरी नाही. अगदी हद्द च केली त्या बाईने :(.


हे काही ठळक अनुभव. बारीक सारीक अनुभव तर बरेच आहेत. त्यामुळे आता पाहुणे यायचे म्हटले की अंगावर काटाच येतो. ते पाहुणे नको, शारिरीक, मानसिक आणि आर्थिक झीज नको आणि एकुणच होणारा मन:स्ताप ही नको.

18 प्रतिसाद्:

Anonymous said...

Your story is very difficult to believe.

You saw : a) a woman who could not cook, b) who had two daughters who were hungry all the time, and c) who did not like to repeat a dish.

How do you imagine she manages to feed her daughters when there is no Rohini to help her out? Assuming she is not rich enough to keep buying food with abundant variety, her daughters are unlikely to acquire such demanding habits when their mother cannot even cook. If she is sufficiently rich, you have the option of showing a little courage and telling her bluntly that you have limited physical energy and she should spend her way to her daughters' satisfaction. Otherwise it becomes a tale not of demanding guests but of nincompoop hosts.

In my experience, most guests are reasonably sensitive, and hosts sometimes have to worry that the guests are not starving or inconveniencing themselves because of shyness.

Ajay Sonawane said...

तुझे पाहुण्यांचे अनुभव ए॑कुन मलाच इथे राग येत होता , तुझा तर काय तिळपापडच झाला असेन. घर वापरा ते वापरा आणि पुन्हा वर असा त्रास. माझी आई घरावर कावळा बसुन ओरडायला लागला की त्याला हाकलायची , ते आता पटलं.

भानस said...

रोहिणी अग माणसं की भुतं? शी,दुस~याच्या घरी जाऊन ( तेही स्वत:ची गरज म्हणून )हा इतका गलथानपणा व फायदा उठवायचा म्हणजे.....आपला भिडस्तपणा नडतो गं. आणि अशी लोकं एका नजरेत ओळखतात कुठे डाळ शिजेल आणि कुठे नाही ते.किती त्रास झाला गं तुला. बिचारी लेकही सुटली नाही यातून.:( ह्म्म्म....पुढच्या वेळी येऊच देऊ नकोस. तू इतके केलेस म्हणून ते कधीही तुला नावाजणार नाहीत उलट निंदाच करतील. याउलट आम्ही, एकतर कुणाकडे जायचे म्हणजे दहा वेळा विचार करतो. आणि आईचा कानमंत्र गिरवतो..कामावे तो सामावे. यजमान आपल्याला आवर्जून बोलावतील इतका जिव्हाळा लावावा....तरच ते म्हणतील ना...असे पाहुणे येती आणिक...
पुढच्या भागाची वाट पाहते आहे. :)

रोहिणी said...

@Anonymous - :) ... I wish it was my imagination. Its your good luck that you always had reasonably sensitive and understanding guests... May god let it be so forever... Best wishes.

रोहिणी said...

@ Ajay - तिळपापड झाला खरा. पण करणार काय? भिडस्तपणा अंगाशी आला. देव करो आणि असे अनुभव कुणालाही न येवो.

रोहिणी said...

@ भानस - भिडस्तपणा नडतो हेच खरं अजुन काय. लहानपणापासुन आईवडिलांनी 'bluntly' वागायला शिकवले असते तर आज ही वेळच आली नसती. आपण सौजन्याने वागतो आणि लोकं पुर्वीचं काही देणं घेणं नसताना आपलिच ऐशी की तैशी करून ठेवतात :).

Mahendra said...

पाहुणे.. म्हणजे अवघड जागचं दुखणं.. अशी जी म्हण आहे ती उगीच नाही. त्याला कांही तरी कारण आहेच.. आणि ते कारण पण पाहुणे शब्दातंच दडलंय..
पाहती उणे ते पाहुणे.. तुम्ही काय कमी केलं तेच पहात रहाणार..आमच्या घराशेजारी एक मॅटर्निटी होम होतं, त्या मुळे कोणिही तिथे आलं, की डबा हा हक्काने आमच्या घरुनच नेला जायचा.. ( त्यांचं घर दुर आहे म्हणुन!)

रोहिणी said...

@ Mahendra - अवघड जागेचं दुखणं, पाहती उणे ते पाहुणे...अगदी अगदी...एक तर मदत करा आणि आणि उत्तम बडदास्त ठेवुनही हे नको ते नको सुरुच. ह्याच्या मित्राची बायको जिचा मी उल्लेख केला आहे तिने प्रेग्नंट असल्याचा काय काय गैरफायदा घेतला हे मी त्या अनुभवातुन गेल्यावर 2 वर्षांपूर्वी लक्षात आलं :). गरज सरो वैद्य मरो अजुन काय.

Anonymous said...

रोहिणी समजू शकते तुझे दु:ख....सगळ्यांनाच असे अनुभव येतात आणि जो करतो तो बोलतो...
पण अश्या वेळी आपल्या भिडस्तपणाचा फार राग येतो ग!!!!

रोहिणी said...

@ Sahajach - हो ना.. खरय.. जो करेल तो बोलेलच. फक्त भिडस्तपणापायी हे बोलणं नंतर असं व्यक्त होतं :). आभार...

Mugdha said...

you are so very tolerant, baapre!! tu kharach mahan aahes...

रोहिणी said...

@ Mugdha - महान वगैरे बनवु नकोस ग बाई... फक्त वाईट वाटतं की सौजन्याने वागुन सुद्धा लोकं आपली बाजु समजुन न घेता नेहमी गैरफायदाच घेतात.

अपर्णा said...

बापरे हा लेख वाचुन तुम्हा दोघांना साष्टांग दंडवत घालावा म्हणतोय.....आतापासुन हा ब्लॉग मी नेहमी वाचत जाईन....सध्या थोडी इतर कामे चालु आहेत म्हणून ही छोटीसी कॉमेन्ट

रोहिणी said...

साष्टांग दंडवत नको गं बाई... शितावरून भाताची परीक्षा करू नये म्हणुन प्रत्येक वेळेस नव्या उमेदीने सुरूवात करतो. बघुया कधि पॉसिटीव्ह रीस्पॉंस मिळतोय ते :). तु पोस्ट वाचलीस आणि आवर्जुन प्रतिक्रिया दिलीस... मनापासुन आभार. लोभ असु देत.

Dk said...

hmmm phaar kahi chaan nahi ha anubhav! navryala saangaaych na ki baaba re bolaavaaych asel tar mat hi kar mala! :)


bryaachda kaay hot aapla bhidst sawbaav, lok kaay mhnteel vagaire vichaar phaaaaaar karto aapan! ghar aani hotelaat phark aahe he samorchyala sarlch saangaayla have! anyway tu mahaan aahes evdhch mhanen mi :)

रोहिणी said...

@ Deep - are baba navara jamel tevadhi madat karatach asato. kadhi kadhi mala majhyach bhidast swabhavacha rag yeto. aso. pratyekveles vatata ki apan nahi mhanava ani ekhadya garajuchi kharokhaeach advanuk vhayachi. mhanun retat asato. aavrjun pratikriya dilis abhar.

mau said...

आज कळले माझ्या सारखीच एक समदु:खी पण आहे ह्या जगात.अगदी सेम २ सेम अनुभव मला ही आलेत.मी पण लग्न करुन दिल्लीला आले.नविन संसार,थोडकी भांडी कुंडी,मोजकेच सामान...आणि त्यात ढीगभर पाहुणे..तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका..पण मी ८-१५ दिवसाचे पाहुणे अक्षरश:झेलले आहेत.म्हणजे कित्येक वेळा तर एका दरवाज्याने एका पाहुण्याला टाटा बायबाय झाले आणि दुस~या दरवाज्याने दुसरे..आणि त्यात आल्हाददायक कमीच...अशे पाहुणे खरच अगदी नको वाटतात.आणि हल्लीच माझ्या घरी माझ्या नव~याचा एक मित्र त्याच्या सौ आणि मुलाला घेउन घरी दुपारी २ वाजता आला.त्याचा पोरगा म्हणजे उदंड कार्ट...म्हणायला ही बरे वाटत नाही,पण नाईलाज...रात्री ११ पर्यंत थांबले,जायचे नाव नाही.तोस्तोवर त्यांच्या मुलाने घर म्हणजे कुरुक्षेत्र केलेले..आम्ही सोडुन सगळ घर खाली.आणि आईसाहेब शांत...शेवटी ११ ला मीच नवरोजींना इशारा केला की बस्स आता..ह्यांना पोचवा..माझं पोर [वय:९] त्या पोराला संभाळुन थकुन झोपी गेले.पण हा पठ्ठा ३ वर्षाचा झोपायचे काही नाव घेइना..शेवटी त्याला आमच्याच गाडीत घालुन पोचवायला जेंव्हा गाडी सुरु केली.तेंव्हा त्याचे डोळे मिटलेले मी पाहिले.पण...जशी गाडी थांबली तशी पुन्हा रावसाहेब उठले..आलं का घरं..असा प्रश्न ऐकु आला.नकळत माझ्या तोंडातुन बापरे !! असा शब्द निघाला..धन्य त्या मातेची..अवढ कस कोणी शांत राहु शकत???

त्यामुळॆ आश्चर्य वाटायची काहीच गरज नाही..असतात असे एक एक महारथी...
आपलाच भिडस्त स्वभाव नडतो हे काही खोटे नाही.

रोहिणी said...

@ माऊ - खुप त्रास होतो ना असले पाहुणे आले की. त्यातुन जर नविनच लग्न झालं असेल तर मग विचारायलाच नको. अपवाद वगळता लग्नापुर्वी आईच करत असते सगळं. आणि लग्नानंतर एक्दम असे पाहुणे आले की चांगलीच तारांबळ उडते. तुम्ही सांगितलेला अनुभव ही वाईटच. काय करावे कितिही म्हटलं तरी नाही म्हणवत नाही कुणाला. भिडस्तपणाच अजुन काय. तुम्ही माझ्या ब्लॉग वर आलात आणि वाचुन आवर्जुन प्रतिक्रिया दिलीत खुप छान वाटलं :).