Tuesday, June 16, 2009

अमेरीकेप्रमाणे इथेसुद्धा रोजचं काम करायला maid मिळत नाही. आणि मिळालीच तर परवडत नाही :) .... त्यामुळे आम्ही कधितरी महिना दिड महिन्यातुन एकदा maid ला बोलवतो आणि काचेची दारं खिडक्या पुसणे, सगळं घर झाडुन पुसुन स्वच्छ करणे इ. कामे करवुन घेतो.....

काही दिवसांपुर्वी आम्ही अशिच काही कामे करवुन घ्यायला एका maid ला बोलावले... ती आधिसुद्धा दोन तिन दा आमच्याकडे येऊन गेल्यामुळे मी निर्धास्त होते. काय कामे करायची कशी करायची हे तिला ठाऊक होते. त्यामुळे सारख्या तिला सुचना द्य़ायला लागणार नाही म्हणुन मी खुश होते... कारण maid येणार म्हणलं तर मलाच tension येतं :) . ठरल्या वेळेला ती आली आणि कामं करायला सुरुवात केली. इकडल्या बायका जरा हळुबाई असतात. अगदी अलगद अलगद नाजुक साजुक पद्धतिने कामं करतात. ( त्यामुळे जास्त वेळात कमी कामं होतात आणि पैसे तासाप्रमाणे द्य़ायचे असतात हे त्यामागचं गणित :) )

तर त्यादिवशी ही maid जरा जास्तच रेंगाळत होती असे मला वाटले पण मी तिकडे फार काही लक्ष दिले नाही. मधेच पाणी प्यायला स्वयंपाकघरात गेले तर तिथे ही माझे मसाल्यांचे कॅबिनेट धुंडाळत होती. मला बघितले तर म्हणे बरण्या निट लावुन ठेवते आहे.. झालं मी खुश.... नंतर माझ्या लक्षात आले की हिने आपली पर्स आतल्या खोलीत नेउन ठेवली आहे कारण pasaage way मधे, तिच्या नेहेमिच्या जागी तिची पर्स नव्हती जी तिने आल्याआल्या तिथे ठेवली होती. मग मी बघितले तर ही बाई खोलिचे दार लावुन आत होती. दारावर टकटक करुन मी आत गेले तर गडबडीत हातात फडकं घेऊन खिडकी पुसायला लागली आणि तिची पर्स मला तिथेच दिसली. त्यामुळे मला जरा शंका आली पण मी काही बोलले नाही.

थोड्यावेळाने ती दुसर्‍या खोलीत गेली. तेव्हा मी परत त्याच खोलीत गेले. तिची पर्स अजुनही तेथेच होती आणि पर्स ची चेन अर्धवट उघडी होती. खरं सांगायचं तर मला तिची पर्स तपासायची खुप इच्छा होत होती पण दुसरं मन अडवत होतं की असा कसा दुसर्‍यांच्या पर्स ला हात लावायचा मग ती maid ची का असेना.... पर्स तपासु का नको...तपासु का नको शेवटी धडधडत्या मनाने आणि कापर्‍या हाताने मी तिची पर्स बघितली तर लेकीचा खाऊचा डबा मला त्यात दिसला उघडुन बघते तर काय त्यात शिगोशिग गरम मसाला भरला होता. छातीतील धडधड अजुनच वाढली ... तो डबा मी तसाच परत पर्स मधे ठेवला आणि स्वयंपाकघरात गेले. तसाच एक डबा दाखवुन तिला म्हणलं असा अजुन एक डबा होता कुठे गेला तर ती माहिती नाही म्हणत खांदे उडवत निघुन गेली... निट बघते तर काय संध्याकाळच्या जेवणासाठी करून ठेवलेली भाजीसुद्धा गायब झाली होती :) . शेवटी गेली ती एकदाची पण मला मात्र सारखं तिच्या पर्स ला हात लावला म्हणुन अपराधी वाटत होतं. संध्याकाळी नवरा घरी आल्यावर त्याला सगळा झाला प्रकार सांगितला. नवर्‍याने तिला लगेच फोन लावुन विचारले तर सगळं कबुल केलं. पण मला मात्र सारखं तिच्या पर्स ला तिच्या नकळत हात लावल्याचं वाईट वाटत होतं. दोन तीन दिवसांनी तिने डबा परत आणुन दिला पण रिकामा :) .....

लहानपणापासुन, चोरी करू नये, खोटे बोलु नये, दुसर्‍यांच्या वस्तुंना विचारल्याशिवाय हात लावु नये...ह्या आणि अश्याच कितीतरी गोष्टी मनावर बिंबवल्या गेल्या असतात... वय वाढल्यावर वरवर कितीही मुखवटे घातले तरी आत खोलवर कुठेतरी संस्कारांचे हे रोपटे चांगलेच मुळ धरलेले असते..त्यामुळे त्या दिवसानंतर कितीतरी दिवस मलाच अपराधी वाटत होतं आणि मनात सल होती. खरंतर तुम्ही म्हणाल एवढीशी तर गोष्ट आणि किती त्याचा बाऊ करायचा. पण मी मात्र अजुनही तो दिवस आठवला की मलुल होते कारण मला तिच्या पर्स ला हात लावायचा नव्हता. डोक्याचा नुसता भुगा झाला आहे विचार करून...आता तुम्हीच सांगा मी योग्य केले की अयोग्य?

;;