जगण्याची ...
येता एकेक आठवण
जागे होती मृत क्षण
ताकदीने विलक्षण
प्रसन्न तर कधी सुन्न !
कधी कुणाचे ते बोल
कधी कुणाचा चेहरा
कधी कस्तुरी सुगंध
कधी मोराचा पिसारा !
आभासावर भास
खोल खोल जाई श्वास
मृगजळाची ही कास
जीव घेणारच खास !
काय होई ते नकळे
जसे जीवा लागे पिसे
सत्य आणि असत्यातील
कसे अंतर मिटले !
काहितरी करा
कोणितरी हे थांबवा
मनाचिये रोग
कोणि करेल का बरा?
आटपाट नगरात कोणी एक डोंबारी होता. घरी अठराविश्वे दारिद्र्य आणि त्यात बायको आणि तीन कच्याबच्यांची जबाबदारी... दिवसभर उन्हातान्हात, पावसापाण्यात तो डोंबारयाचा खेळ करत वणवण करायचा आणि लोकांचं मनोरंजन करुन मिळतील ते चार पैसे कमवायचा... संध्याकाळी घरी परतताना मिळाळेल्या चार पैश्यातून मिठ-मिर्ची घेउन तो जायचा तेव्हा कुठे घरात चुल पेटायची... दिवसभर राबल्यावर, संध्याकाळी बायको – पोरांसोबत ओलंसुकं खाताना त्याला परत माणसात आल्यासारखं वाटायचं आणि त्याचा डोंबारयाचा मुखवटा पार गळुन जायचा...