Friday, August 19, 2022

हरये नम : हरये नम :

 Hi everyone. माझ्या लहानपणी आमच्या घराजवळ एक मोठं मैदान होतं. अणि त्या मैदानाच्या एका बाजूला कृष्णाचं एक देऊळ होतं. त्या परिसरातील सगळ्यांच्या जिव्हाळ्याचं. काही दुखलं खुपलं जा देवळात. बरं नसेल वाटत जा देवळात. काही शुभवार्ता कळली जा देवळात. वाईट बातमी कळली जा देवळात. मनातलं भलं बुरं सगळं सगळं त्या कृष्णापाशी रितं करायचं. मोकळं व्हायचं आणि जीवनाला नव्याने सामोरं जायचं. त्या कृष्णाने कुणा कुणाचं काय काय ऐकलं असेल त्यालाच ठाऊक. त्या देवळात सगळे सण , उत्सव खूप उत्साहाने साजरे केले जायचे. 

आता हे सगळे आठवायचे कारण म्हणजे येऊ घातलेली गोकुळाष्टमी. गोकुळाष्टमी च्या आदल्या दिवशी पासुनच देवळात लगबग असायची. आम्ही सगळी पोरंटोरं गोकुळाचा देखावा उभा करण्यात मग्न व्हायचो. देवळाच्या अंगणात मोठल्या रांगोळ्या काढल्या जायच्या. दादा लोकं देवळाला रोषणाई करायला घ्यायचे. आणि आजी आजोबा नीट लक्ष ठेवायला सूचना करायला जातीने हजर असायचे. पण खरं तर लक्ष सगळे असायचे जन्माष्टमी ला संध्याकाळी होणाऱ्या गोपाळकाल्यावर. 

काय नसायचे त्या गोपाळकाल्यात. सगळ्या चविंचा एक सुंदर मिलाफ म्हणजे गोपाळकाला. सगळ्या जातीधर्माच्या, भाषेच्या परिसीमा ओलांडून एक होणे म्हणजे गोपाळकाला. सांपत्तिक स्थिती ने तटस्थ व्हावे असा क्षण म्हणजे गोपाळकाला. कोण्या घरचे दही, कोणिकडचे पोहे, कुठल्या लाह्या तर कुठले लोणचे. हे  सगळे सगळे एकरूप होऊन राधे कृष्ण राधे कृष्ण च्या तालात कधी कृष्णाचा लाडका 'काला' होऊन जायचे कळायचे ही नाही. आणि असा हा रूचीप्रद प्रसाद जिव्हेला स्पर्शला की डोळे तृप्तीने आपसूकच मिटले जायचे. 

तर अशी ही देवळातील जन्माष्टमी ची पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण. ह्या देवळात होणा-या गोपाळकाल्याची कृती खाली देत आहे. राधे कृष्ण राधे कृष्ण. 


साहित्य


२ वाटी ज्वारीच्या लाह्या

२ वाटी साळीच्या / धानाच्या लाह्या

१/२ वाटी चण्याची डाळ (३-४ तास भिजलेली)

१-२ हिरवी मिर्ची बारीक चिरून

३-४ tbsp दही 

१/२ केळं  ( गोल चकत्या / चिरून )

१/४ वाटी पेरू बारीक चिरून

१/४ वाटी काकडी ( सोलून, बारीक चिरून )

१/४ वाटी नारळाचा चव किंवा ओल्या खोबऱ्याचे ( नारळाचे ) बारीक तुकडे

१/२ वाटी कोथिंबीर बारीक चिरून

३-४ tsp लिंबाचं गोड लोणचे

२-३ tsp आंब्याचे तिखट लोणचे

मीठ चवीनुसार

साखर चवीनुसार


फोडणी - ऐच्छिक


१ tbsp तेल

१/२ tsp मोहरी

१/४ tsp हिंगकृती


१) एका मोठ्या भांड्यात सगळे साहित्य एकत्र नीट मिसळून घ्यायचे

२) हवे असल्यास फोडणी घालयाची

३) चविष्ट असा गोपाळकाला तयार 


टीप :


१) लाह्या वगळल्यास कुठलेही साहित्य आपल्या आवडीनुसार, उपलब्धतेनुसार आणि चवीनुसार कमी जास्त करता येते.

२) गोपाळकाला थोडा ओलसर हवा असल्यास दह्याचे प्रमाण वाढवावे किंवा दह्याच्या ऐवजी ताक घ्यावे.

३) डाळिंबाचे दाणे असल्यास गोपाळकाल्याला नैसर्गिक गोडवा मिळतो. चवीला छान लागतो व दिसतो ही छान.

४) मला स्वतःला गोपाळकाला फोडणी न घालता केलेला आवडतो. त्यात सगळ्या पदार्थांची स्वतःची चव उठून येते.


II श्रीकृष्णारपणमस्तू II


फोटो - गुगल वरून साभार... 


रोहिणी 

मुंबई


पुनःश्च हरी ओम

Hello everyone. ह्या ब्लॉग वर शेवटची पोस्ट टाकून १ तपापेक्षा जास्त काळ उलटून गेला. बाप रे. मधली वर्षे कशी भराभर गेली ते कळलेच नाही. अधून मधून लिखाणाची उर्मी यायचीही पण काही ना काही कारणाने पुढे ढकलल्या जायचे. बरेच काही घडले ह्या काही वर्षांत. त्या बद्दल हळूहळू लिहीनच आता. पण मागच्या महिन्यात जुन्या मैत्रिणींशी भेट झाली. त्या दरम्यान ब्लॉग बद्दल बोलणे झाले. आणि वाटले की खरंच आता आपण पुन्हा लिहायला सुरुवात करायला हवी. म्हणून हा पंक्ती प्रपंच. चुकले माकले तर समजून घ्या. चला तर मग सुरू करूया.... पुन:श्च हरि ओम!!

Friday, January 29, 2010

टॅगले....

श्री ताईने आणि अजय ने टॅगुन तसे बरेच दिवस (दिवस? महिने... :-)) झालेत पण मायदेशी असल्याकारणाने ब्लॉग लिहायला, वाचायला अजिबातच वेळ झाला नाही. आधि तर ही काय भानगड आहे तेच कळेना. पुरणपोळीचं जेवण चांगलच मानवलं होतं. परत दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर इकडे तिकडे थोडं नाक ( की डोळे? ) खुपसुन बघितल्यावर जरा जरा उमजायला लागलं :). उत्तरं द्यायला तसा बराच उशीर होतो आहे पण तरीही जमेल तशी प्रामाणिक उत्तरं देण्याचा प्रयत्न करते. त्यातुनही एका शब्दात उत्तरं द्यायची ती पण पंधरा मिनिटात म्हणजे मजाच येणार. बघुया कितपत जमतंय ते...
1.Where is your cell phone?

थोड्यावेळापूर्वी लेक घेऊन खेळत होती. आता कुठेय माहिती नाही. वाजला की कळेल. :).


2.Your hair?

गडद तपकिरी, मऊ


3.Your mother?

जीवलग


4.Your father?

संध्याकाळी 'सकाळ' वाचतात :)


5.Your favorite food?

महाराष्ट्रीयन (शाकाहारी )


6.Your dream last night?

मला स्वप्नच येत / पडत नाहीत :(


7.Your favorite drink?

अपेय आणि चहा सोडुन काहीही ( त्यातल्या त्यात लिंबु सरबत, कॉफी आणि स्ट्रॉबेरी शेक चालेल :D )


8.Your dream/goal?

आपल्या घरात एक समृद्ध वाचनालय असावे.


9.What room are you in?

डायनिंग रूम. लॅपटॉप साठी सगळ्यात सुरक्षीत जागा.


10.Your hobby?

वाचन, प्रवास, गाणे


11.Your fear?

नथिंग


12.Where do you want to be in 6 years?

मायदेशी


13.Where were you last night?

घरी

14.Something that you aren’t diplomatic?

काय विचारता राव.... पोस्टिंगच मुळात Diplomat म्हणुन झालंय :).


15.Muffins?

Yum


16.Wish list item?

पुस्तकं पुस्तकं आणि पुस्तकं


17.Where did you grow up?

नागपुर, पुणे


18.Last thing you did?

मुलीसोबत नाचले


19.What are you wearing?

शॉर्ट्स आणि टी शर्ट


20.Your TV?

सोनी


21.Your pets?

नाहियेत


22.Friends

मोजकेच


23.Your life?

A Journey ( we actually keep moving every after 2 years :) )


24.Your mood?

कंपोज्ड


25.Missing someone?

हो


26.Vehicle?

शेव्हरोले ऍवीओ


27.Something you’re not wearing?

मुखवटा


28.Your favorite store?

बुक स्टोअर


29.Your favorite color?

पांढरा, अबोली30.When was the last time you laughed?

तासाभरापुर्वी


31.Last time you cried?

मागच्या शुक्रवारी भारत सोडताना


32.Your best friend?

D


33.One place that you go to over and over?

स्वयंपाकघर :) आणि नंतर स्टोअर रूम कारण तिथे वजनाचा काटा ठेवला आहे :D


34.One person who emails me regularly?

ब्लॉग वर प्रतिक्रिया देणार्‍यांव्यतिरीक्त विषेश उल्लेखनीय कोणिच नाही :(


35.Favorite place to eat?

डायनिंग रूम :)मी बहुदा साखळीतील शेवटची आहे. बहुतेक सगळ्यांनीच टॅगुन झालं आहे. तरी इथे अमृता ला टॅगते आहे.

Tuesday, December 08, 2009

मन वढाय वढाय

काय करू अन काय नको असं झालंय. मन आनंदाने गिरक्या काय घेतंय, मधेच एखादी आठवण येऊन डोळे काय भरून येताहेत. काहितरी गमतीशीर आठवुन एकटीच हसतेय काय. काही विचारू नका.. का? मी जातेय माझ्या देशात. माझ्या भारतात. ओळखिच्या देशात, ओळखिच्या वातावरणात आणि ओळखिच्या भाषांत.

तेच ओळखिचे गंध, तेच ओळखिचे आवाज, तेच ओळखिचे आपुलकिचे स्पर्श सगळं पुन्हा पुन्हा अनुभवण्यासाठी, अनुभवुन मनाच्या डबीत घट्ट बंद करून कधिही निसटू न देण्यासाठी.

आजीने बोटे मोडीत कडकडून काढलेली दृश्ट, बाबांचा डोक्यावरून फिरणारा हात, दादाने ओढलेले केस, आईने सुकली गं पोर माझी म्हणुन कुरवाळलेले गाल, आवडता पदार्थ केल्यावर सासुबाईंनी पाठीवर दिलेली शाबासकीची थाप, सासर्‍यांच्या फोटोशी केलेला मुक संवाद आणि माझ्याच मनात आलटुन पालटुन चालणार्‍या डायलॉग्स वर फोटोतीलच त्यांचं टिपीकल फौजी हसणं, एकमेकींचे ( सगळ्यांत चांगले )कपडे घालण्यासाठी वहिनीशी केलेली झटापट :) आणि नंतर गळ्यांत गळे घालुन वाटुन खाल्लेला एकच पेरू. हे सगळं सगळं मला परत भेटणार आहे.

प्रत्येकासाठी भेटवस्तु घेताना त्यांच्या सोबत घालवलेले असंख्य क्षण आठवणी बनुन मनाभोवती फेर धरताहेत. मग हे नको तेच घेऊया. छे! हा रंग तिला नाही आवडायचा. ही नक्षी किती सुंदर दिसेल नाही, असे निवांत चवीचवीने शॉपींग सुरु आहे.


सासुबाईंच्या खास फर्माईशी पुर्ण करण्यासाठी पाककृतींची सारखी उजळणी सुरु आहे. आणि दादाने माझे केस ओढल्यावर त्याचे क्रु कट असलेले केस हातात कसे पकडायचे ह्याची प्रॅक्टीस नवर्‍याच्या डोक्यावर सुरु आहे :). आणि थंडीमुळे बाबांच्या भेगाळलेल्या पायांना रोज रात्री कोकम तेल लावायचं बुकिंग ही आधिच करून ठेवलंय.

आई आवाजावरून जरा ( जरा बरं का आई ! :) ) दमल्यासारखी वाटतेय. तिच्यामधे नवा उत्साह भरण्यासाठी तिच्यासोबत बाहेर भरपुर भटकणार आहे आणि मनसोक्त खादाडी करणार आहे. आताच ऑर्कुट वर एका कम्युनिटी वरून बाहेर खायचे छान छान ठिकाणं उतरवुन घेतले आहेत :). चक्क लिस्ट केली आहे. नवरा कामात बिझी आहे म्हणुन नाहितर ही लिस्ट बघुन त्याने मला माझ्या वाढणार्‍या वजनावरून चांगलेच चिडवले असते :).


आणि हो ह्या सगळ्यांतुन वेळ काढुन मी तुम्हा सर्वांचे ब्लॉग्स देखिल वाचते आहे पण तुमचे ब्लॉग वाचता वाचता मन परत काहितरी आठवणींत हरवते आणि प्रतिक्रिया द्यायचीच राहते. त्याबाद्दल मोठ्या मनाने माफ करा बरं का :).

सकाळपासुनच माझं अतिशय आवडतं गाणं सतत गुणगुणतेय. मुळ कविता आहे कृ. ब. निकुंब ह्यांची आणि हे गाणं गायलं आहे सौ. सुमन कल्याणपुर ह्यांनी.घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात!

"सुखी आहे पोर" सांग आईच्या कानात
आई भाऊ साठी परी मन खंतावतं!

विसरली का गं भादव्यात वर्सं झालं
माहेरीच्या सुखालागं मन आचवलं!

फिरून फिरून सय येई जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग शेव ओलाचिंब होतो!

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगनिया करी कशी गं बेजार!

परसात पारिजातकाचा सडा पडे
कधि फुलं वेचायला नेशिल तु गडे!

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय!

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला!

हे गाणं तुम्ही ऐकु शकता इथे...

;;