Friday, August 19, 2022

हरये नम : हरये नम :

 Hi everyone. माझ्या लहानपणी आमच्या घराजवळ एक मोठं मैदान होतं. अणि त्या मैदानाच्या एका बाजूला कृष्णाचं एक देऊळ होतं. त्या परिसरातील सगळ्यांच्या जिव्हाळ्याचं. काही दुखलं खुपलं जा देवळात. बरं नसेल वाटत जा देवळात. काही शुभवार्ता कळली जा देवळात. वाईट बातमी कळली जा देवळात. मनातलं भलं बुरं सगळं सगळं त्या कृष्णापाशी रितं करायचं. मोकळं व्हायचं आणि जीवनाला नव्याने सामोरं जायचं. त्या कृष्णाने कुणा कुणाचं काय काय ऐकलं असेल त्यालाच ठाऊक. त्या देवळात सगळे सण , उत्सव खूप उत्साहाने साजरे केले जायचे. 

आता हे सगळे आठवायचे कारण म्हणजे येऊ घातलेली गोकुळाष्टमी. गोकुळाष्टमी च्या आदल्या दिवशी पासुनच देवळात लगबग असायची. आम्ही सगळी पोरंटोरं गोकुळाचा देखावा उभा करण्यात मग्न व्हायचो. देवळाच्या अंगणात मोठल्या रांगोळ्या काढल्या जायच्या. दादा लोकं देवळाला रोषणाई करायला घ्यायचे. आणि आजी आजोबा नीट लक्ष ठेवायला सूचना करायला जातीने हजर असायचे. पण खरं तर लक्ष सगळे असायचे जन्माष्टमी ला संध्याकाळी होणाऱ्या गोपाळकाल्यावर. 

काय नसायचे त्या गोपाळकाल्यात. सगळ्या चविंचा एक सुंदर मिलाफ म्हणजे गोपाळकाला. सगळ्या जातीधर्माच्या, भाषेच्या परिसीमा ओलांडून एक होणे म्हणजे गोपाळकाला. सांपत्तिक स्थिती ने तटस्थ व्हावे असा क्षण म्हणजे गोपाळकाला. कोण्या घरचे दही, कोणिकडचे पोहे, कुठल्या लाह्या तर कुठले लोणचे. हे  सगळे सगळे एकरूप होऊन राधे कृष्ण राधे कृष्ण च्या तालात कधी कृष्णाचा लाडका 'काला' होऊन जायचे कळायचे ही नाही. आणि असा हा रूचीप्रद प्रसाद जिव्हेला स्पर्शला की डोळे तृप्तीने आपसूकच मिटले जायचे. 

तर अशी ही देवळातील जन्माष्टमी ची पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण. ह्या देवळात होणा-या गोपाळकाल्याची कृती खाली देत आहे. राधे कृष्ण राधे कृष्ण. 


साहित्य


२ वाटी ज्वारीच्या लाह्या

२ वाटी साळीच्या / धानाच्या लाह्या

१/२ वाटी चण्याची डाळ (३-४ तास भिजलेली)

१-२ हिरवी मिर्ची बारीक चिरून

३-४ tbsp दही 

१/२ केळं  ( गोल चकत्या / चिरून )

१/४ वाटी पेरू बारीक चिरून

१/४ वाटी काकडी ( सोलून, बारीक चिरून )

१/४ वाटी नारळाचा चव किंवा ओल्या खोबऱ्याचे ( नारळाचे ) बारीक तुकडे

१/२ वाटी कोथिंबीर बारीक चिरून

३-४ tsp लिंबाचं गोड लोणचे

२-३ tsp आंब्याचे तिखट लोणचे

मीठ चवीनुसार

साखर चवीनुसार


फोडणी - ऐच्छिक


१ tbsp तेल

१/२ tsp मोहरी

१/४ tsp हिंगकृती


१) एका मोठ्या भांड्यात सगळे साहित्य एकत्र नीट मिसळून घ्यायचे

२) हवे असल्यास फोडणी घालयाची

३) चविष्ट असा गोपाळकाला तयार 


टीप :


१) लाह्या वगळल्यास कुठलेही साहित्य आपल्या आवडीनुसार, उपलब्धतेनुसार आणि चवीनुसार कमी जास्त करता येते.

२) गोपाळकाला थोडा ओलसर हवा असल्यास दह्याचे प्रमाण वाढवावे किंवा दह्याच्या ऐवजी ताक घ्यावे.

३) डाळिंबाचे दाणे असल्यास गोपाळकाल्याला नैसर्गिक गोडवा मिळतो. चवीला छान लागतो व दिसतो ही छान.

४) मला स्वतःला गोपाळकाला फोडणी न घालता केलेला आवडतो. त्यात सगळ्या पदार्थांची स्वतःची चव उठून येते.


II श्रीकृष्णारपणमस्तू II


फोटो - गुगल वरून साभार... 


रोहिणी 

मुंबई


0 प्रतिसाद्: