Wednesday, July 01, 2009

Soulmate (भाग 2 )

मग नजरेचे हे खेळ रोजचेच झाले. रुची संध्याकाळी पार्क मधे जायची तेव्हा तो आधिच आलेला असायचा. कुणाची तर वाट बघत असल्यासारखा. रुची दिसल्यावर त्याच्या चेहर्‍यावरचा,'ती आज दिसेल की नाही' चा संभ्रम हलकेच सैल व्हायचा. रुची सुद्धा त्याच संभ्रमात असायची आणि तो दिसल्यावर कळत नकळत तिला स्वस्थता लाभायची. हळुहळु शेजारणीं कडे चौकशी केल्यावर तिला कळले की तो कोणत्या तरी दुतावासात काम करतो. तो, त्याची बायको आणि त्यांची छोटी मुलगी तिथे 3 वर्षांपासुन रहात आहेत आणि त्याची बायकोही कुठेतरी नोकरी करते. पण रुची ला त्याचे नाव आणि त्याचा देश मात्र कळु शकले नाही.

रुची ने स्वत:ला आवर घालण्याचा बराच प्रयत्न केला. हरप्रकारे मनाची समजुत घातली. तो विवाहित आहे, एक छोटी मुलगी आहे, आपल्याला त्याचं नाव गाव काहिच माहिती नाही आणि सरतेशेवटी तो एक परदेशी आहे. पण त्याच्याबद्दल तिला इतके जबरदस्त आकर्षण वाटत होते की ही सारी कारणे त्यापुढे फोल ठरायची. ती अक्षरश: लोहचुंबकासारखी त्याच्याकडे खेचल्या जायची.

पण ह्या सार्‍या प्रकारात रुची ला त्याच्याबद्दल शारीरीक आकर्षण कधिच वाटले नव्ह्ते. वाटायची ती केवळ अनामिक ओढ. का कोण जाणे पण तो सुद्धा आपल्याकडे ओढल्या जातोय असे सारखे तिला वाटायचे. त्याच्याही डोळ्यांत तिला कधिही लालसेचा लवलेशही दिसला नाही. त्या नजरेत जे काही होतं ते नितळ, निर्मळ आणि निरागस होतं. आपलसं वाटणारं आणि आपलसं करणारं होतं. आणि ह्याचे तिला बरेचदा आश्चर्य वाटायचे. की हे असं कुठलं नातं आहे जिथे दोन पुर्णपणे अनोळखी व्यक्ती एकमेकांची नाव साधी नावं सुद्धा माहिती नसताना इतक्या प्रचंड वेगाने एकमेकांकडे खेचल्या जात आहेत. ते ही आदिभौतीक पातळीवर. तिथे कसलीच अपेक्षा नव्हती. शारिरीकही नाही आणि मानसीकही नाही. प्रतिक्षा होती ती केवळ Relate करण्याची आणि होण्याची.

कधि एकदा संध्याकाळ होते आणि त्याला डोळाभर बघते असे रुचीला व्हायचे. त्याच्या त्या शांत निळ्या डोळ्यांत डोकावुन बघताना सगळं कसं विसरायला व्हायचं. आजुबाजुचं भानच सुटायचं. आणि त्या नंतर मिळायची ती अपुर्व शांती. सारं जग त्या क्षणी थांबल्यासारखं वाटायचं. स्तब्ध आणि निश्चल.


दोघेही केवळ भारावल्यासारखे जणु नजरेनेच बोलायचे. जसे काही जन्मोजन्मी ते दोघे भेटत आले होते. अनोळखी व्यक्ती बद्दल वाटणारी प्रचंड ओढ, अनामिक आकर्षण आणि एका नजरेतच हा तर माझ्याच अस्तित्वाचा भाग आहे असे वाटायला लावणारी संवेदना. हे पुर्वजन्माचे संचित नाहितर काय आहे? पण अश्याही परिस्थितीत दोघांनाही वर्तमानाची जाणीव होती. दोघांनाही आपाआपल्या मर्यादा ठाउक होत्या.

रोज खाली आल्यामुळे दोघांमधे थोडा मोकळेपणा आला होता. कधितरी एखादं मंदस्मित, कधि हाय - हॅलो ची देवाणघेवाण सुरु झाली. पण ते तेवढ्यापुरतच. त्यांच्यात संवाद नव्हता आणि दोघेही संवाद घडावा म्हणुन जाणुन बुजुन प्रयत्नही करत नव्हते. एकमेकांशी बोलण्याची त्यांना कधी गरजच वाटत नव्हती. गरज होती ती फक्त मनं रिती होण्याची.

आणि अश्यातच तो दिवस आला...


(क्रमश:)

;;