Friday, November 06, 2009

अल्बम

काल दुपारी सहजच मी जुने फोटो बघत होते. आमचं लग्न झाल्यानंतरचे फोटो... बाप रे नवरा किती बारीक दिसतो आहे आणि मी कसली बावळट दिसते आहे असे काही बाही कमेंट्स टाकत त्या फोटोंचं मी चविष्टपणे रसग्रहण करत होते :)... आणि एकापाठोपाठ एक अश्या अनेक कडु गोड आठवणी यायला लागल्या. कडु कमी आणि गोडच जास्त.

आमचं लग्न झालं तेव्हा मी आणि नवरा आम्ही दोघेही शिकत होतो. त्यामुळे मॅरीड स्टुडंट म्हणुन आम्हाला रहायाला घर मिळालं होतं. घर कसलं अगदी रानावनात असलेलं चंद्रमोळी (सिमेंटच) झोपडंच होतं. आजुबाजुला गर्द वनराई आणि सोबतिला असंख्य पक्षी आणि प्राणी. दोन पायाचे, चार पायाचे आणि सरपटणारे सुद्धा :).

तर आम्ही जेव्हा त्या घरात पाय ठेवला तेव्हा आमच्याकडे प्रत्येकी 2 सुटकेसेस, पुस्तकं आता बाहेर पडतात की काय इतक्या ठासुन भरलेल्या पुस्तकांच्या 4 ट्रंका, स्वयंपाकाच्या भांड्यांचं आणि त्यातच देव इत्यादी असलेलं एक आणि मसाले आणि इतर राशन असलेलं एक अशि दोन छोटी खोकी एवढंच सामान होतं. मला अजुनही आठवतय की गृहप्रवेशाच्या वेळेस सुद्धा शेजारच्या सरदारजी घरातुन कुंकु आणलं होतं. गृहप्रवेश तर झाला. घरात गेल्या गेल्या लक्षात आलं की अरे सगळीकडे नुसत्या मोठ्यामोठ्या काचेच्या खिडक्याच आहेत. आणि आपल्याकडे तर परदेच नाहीत. मग काय भराभर आपआपल्या सुटकेसेस उघडुन पांघरायच्या चादरी आणि माझ्या ओढण्या काढल्या आणि तात्पुरती परद्यांची सोय झाली.

हळुहळु संसार करायला आणि घर चालवायला काय काय लागतं ह्याचा अंदाज यायला लागला. नवरा 12 वी नंतर कायम घराबाहेरच होता आणि अश्या ठिकाणी होता जिथे त्याचा आणि चुलीचा काहीही संबंध आला नाही. त्यामुळे स्वयंपाक करण्याची जबाबदारी आपसुकच पुर्णपणे माझ्यावरच होती. मला स्वयंपाक करता येत होता पण पुर्वी कधी जबाबदारी घेऊन करायची वेळच आली नव्हती ती आता आली होती. पण तरी सुरवातिचे काही दिवस जेव्हा दोघांनाही खुप भुक लागायची आणि पोटात कावळे कोकलायला लागायचे तेव्हा लक्षात यायचं बाप रे अजुन काहिच शिजवलेलं नाहिये. मग काय भराभर वरण भाताचा कुकर लावायचा. त्यावरून आमची परत भांडणं व्हायची कारण नवरा भाताचा कट्टर विरोधक होता आणि मी म्हणायचे की कणिक भिजवुन पोळ्या करायच्या आणि भाजी चिरून फोडणिला टाकायची त्यापेक्षा वरण भात लवकर होतो. आणि तसही नवरा कोकणस्थ आणि मी माहेरून देशस्थ त्यामुळे मला काही आमटी जमायची नाही आणि फोडणिचं वरण त्याच्या पसंतीस उतरायचं नाही त्यामुळे परत कुरकुर :).

आम्ही ज्या गावी राहायचो तिथे प्रचंड ह्युमिडिटी होती. त्यामुळे अन्न लवकर खराब व्हायचं म्हणुन मग तातडिने आधि फ्रिज घेतला. पण मला ह्युमिडीटीची अजिबातच सवय नसल्यामुळे मला खुपच त्रास व्हायला लागला. म्हणुन मग एसी घेतला. आम्ही राहायचो ते शैक्षणिक संस्थेच्या आवारात. तिथुन गाव होतं 12-15 किमी अंतरावर. मग घर लावायचं आणि चालवायचं म्हणजे भाजीपाला किराणा व इतर सामान आणायला तर बाहेर पडायलाच हवं. जायला यायला सोय व्हावी म्हणुन मग वाहन घेतलं कारण प्रत्येक वेळी वाहन हायर करून जाण्यापेक्षा स्वत:चे वाहन घेणे स्वस्त पडते. ह्या सगळ्या खर्चांमुळे आमची सगळी शिल्लक कामी आली. मग परदे घेणं पुढे ढकललं :) तात्पुरत्या परद्यांवर आम्ही खुश होतो :). मग आम्ही एक यादी केली होती. त्यात गरजेप्रमाणे प्रत्येक महिन्यात काय घ्यायचे हे लिहिले होते. त्यात परद्यांचा नंबर 5 महिन्यांनी आला आणि मिक्सर / फूड प्रोसेसरचा दिड वर्षाने :). तोवर आम्ही सगळं काम खलबत्त्यावर केलं :).

सुरवातीचे काही महिने आमच्या ज्या पुस्तकांच्या ट्रंका होत्या त्याच बैठकिच्या खोलीत बसायला वापरायचो. त्या जरा जुन्या होत्या. त्यामुळे त्यावर कोणि बसलं की लगेच त्या कुरकुरायच्या आणि मला हसु आवरायचं नाही :). पलंग येईपर्यंत आमची वळकटी आणि सिमेंटची फरशी यांची घट्ट मैत्री झाली होती. हळुहळु सामन जमत गेलं आणि आमचं बस्तान बसत गेलं. हे सगळं सुरू असताना एकिकडे अभ्यास, परिक्षा, असाईनमेंट्स , प्रोज़ेक्ट्स सुरूच होते. आम्ही दोघेही दोन वेगवेगळ्या खोलीत बसुन अभ्यास करायचो. तो त्यच्या लॅपटॉपवर मी माझ्या. तेव्हा एकाच घरात रहात असुन सुद्धा आम्ही तासंतास गूगल टॉक वर चॅट करायचो :). खुप मजा यायची. एकीकडे एसी, फ्रिज, लॅपटॉप( शैक्षणिक संस्थेच्या आवारात राहात असल्यामुळे इंटरनेट फ्री होते :))आणि दुसरीकडे बसायाला ट्रंका, झोपायला वळकटी आणि दारांना परद्यांच्या ऐवजी चादरी आणि ओढण्या असा प्रचंड विरोधाभास आमच्या घरी होता :). आणि आम्ही त्यात खुश होतो कारण तो आमचाच निर्णय होता. दोघांच्याही पालकांनी वेळोवेळी काहितरी निमित्याने, प्रसंगाने आम्हाला मदत करायचा प्रयत्न केला. पण आम्हाला आमचं घर उभारायच होतं ते आमच्या आई बाबांसारखच. आपल्या हिमतीवर, मेहनतीवर आणि नशिबावर. त्यामुळे जे जसं होतं त्यात आम्ही खुप खुश आणि पुर्णपणे समाधानी होतो आणि आहोत :).

आमच्या त्या घराला मागे एक छानसं अंगण होतं. तिथे रोज सकाळी मोर यायचा. पुढे पुढे आमची त्या मोराशी दोस्ती झाली तो आला की रोज मी त्याला काही काही खायला द्यायचे. आणि त्याच्याशी खुप गप्पा मारायचे :). त्याला ब्रेड खुप आवडायचा. ब्रेड चे तुकडे टाकले की अगदी खुश व्हायचा आणि खाऊन झाल्यावर कधि ठुमकत ठुमकत अगंणभर फिरायचा नाहितर आपल्या पिसांचा पसारा फुलवुन माझ्यासाठी खास नाच करायचा. नवर्‍याने काढलेले त्याचे फोटो आणि व्हिडीओ अजुन जपुन ठेवले आहेत आणि त्याने मला भेट दिलेले एक छानसे मोरपीस सुद्धा :).

खुप छान होते ते दिवस. रोज समोर एक नवं आव्हान असायचं. व्यक्तिगत नाहितर व्यावसायिक. पण दोघांनी मिळुन त्या सगळ्या प्रॉब्लेम्स ना तोंड द्यायला मजा यायची. नवर्‍याची साथ खमकी आणि खंबीर होती पण मायेचा हळुवार ओलावा सुद्धा होता. आजुबाजुचे लग्न झालेले मित्र मैत्रीणी बघितले आणि आमच्याकडे बघितलं की आम्हाला वाटायचच नाही की खरच आपलं लग्न झालेलं आहे. मला तर कायमच वाटायच की हा अजुनही माझा मित्रच आहे नवरा नाही. आणि नवर्‍याचेही माझ्याबद्दल काही वेगळे मत नव्हते :).

मी काल जो अल्बम बघत होते तो ह्याचमुळे केवळ फोटोंचा अल्बम नसुन सगळ्या आठवणिंचाच अल्बम आहे. ह्या सगळ्या आठवणी म्हणजे एखाद्या अस्सल अत्तराच्या कुपीसारख्या आहेत. कुपीतलं अत्तर कसं कुपी उघडल्याबरोबर बाहेरचं वातावरण गंधमुग्ध करतं. तश्याच ह्या आठवणी. पावसाच्या सरीसारख्या एकापाठोपाठ एक सरसरत येतात आणि कुपीतल्या अत्तरासारखा माझा उरलेला दिवस मुग्धतेने भारलेला करून जातात.

26 प्रतिसाद्:

Ajay Sonawane said...

शुन्यातुन सगळं उभ करण यात ही एक मजा असते , एकदम हलकंफुलका आणि फ्रेश वाटल वाचुन. खुपच छान !

-अजय

रोहिणी said...

@अजय - हो ना खरच. थोडं टेंशन. थोडी भिती आणि खुप सारा आत्मविश्वास ह्याच्या जोरावर सगळं उभारण्यात खरच मजा असते. तुलाही लवकरच अनुभव येवो :). मनापासुन शुभेच्छा.

Anonymous said...

एकूण वर्णन १९६०-७० सुमाराचं वाटतंय, ती एक इंटरनेटवरच्या गूगलटॉकची भानगड सोडल्यास.

मराठीत 'परदा' हा शब्द इंदोर, ग्वाल्हेर किंवा दिल्लीकडे वापरला जातो की काय?

रोहिणी said...

@Anonymous - हे वर्णन फक्त चार - पाच वर्षांपूर्वीचं आहे फार काळ लोटलेला नाही. नाही का? मराठीत परदा हा शब्द इंदोर, ग्वाल्हेर आणि दिल्लीसकटच विदर्भाकडेसुद्धा वापरला जातो.

Anonymous said...

रोहिणीबाई: महाराष्ट्रात 'पडदा' शब्द वापरतात. 'आडपडदा' ऐवजी 'आडपरदा' हा शब्द फारच विचित्र वाटतो, आणि मला 'परदा' शब्द देखील मराठीत वाचल्याचं आठवत नाही. एक गंमत म्हणून गूगलवर 'आडपरदा' आणि 'आडपडदा' हे शब्द शोधून बघा.

चार-पाच वर्षं अलीकडेही आजूबाजूला गर्द वनराई, मोर वगैरे गोष्टी असत हे पर्यावरणवाल्यांना कळवावं लागणार.

Ajay Sonawane said...

पुन्हा एकदा कमेंट देतोय, पण तुझी ही पोस्ट वाचुन मी एक सिनेमा आठवायचा प्रयत्न करत होतो. खुप ताण देऊन सुद्धा तो आठवत नव्हता. आता आठवला तो, तेलगु सिनेमा "Boys" एकदा जरुर पहा. तु जे काही लिहील आहेस ना त्याच्याशी बराच मिळताजुळता. फक्त त्यात घरच्यांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी लग्न केलं होतं वगैरे...सिद्धार्थ आणि जेनेलिया एकदम फ्रेश चेहरे, यू टुब वर आहे तो बहुतेक , जरुर पहा आणि मला सांग. पुन्हा एकदा, पोस्ट मस्तच झाली आहे. असेच किस्से लिहीत रहा.

-अजय

Mahendra said...

रोहिणी
ते फोटो पण पहायला आवडले असते.. आम्हालाही.... :
आता टॅक्सी मधे वाईट ट्राफिक जॅम मधे अडकलोय.. पुण्याहुन परत चाललोय मुंबईला . नंतर सविस्तर लिहिन.. पण आवडलं पोस्ट.. एकदम झकास!!!

भानस said...

रोहिणी खूप छान वाटलं वाचताना. आम्ही जेव्हां ठाण्याला आमचं घर घेतलं तेव्हां माझे सगळे स्त्रीधन विकले होते. मंगळसूत्र सोडून...पण कधीही खंत वाटली नाही. जेव्हां नवरा-बायको दोघे मिळून मनापासून आपले विश्व उभारतात तेव्हां सगळ्या अडचणींवर मात करण्याची कलाही साधते, मार्गही सापडत जातात. नाते अजूनच दृढ होत जाते. आज चार-पाच वर्षांपूर्वीचं हे सारं आठवतानां तुझे मन आनंदाने, अभिमानाने व भावनावशतेने भरून आलेले या सगळ्या उजळणीतून माझ्यापर्यंत पोहोचले बघ. आता लेकही सामिल झालीये यात.:)तुझी अत्तराची कुपी सगळ्यात मौल्यवान ठेवेने-सुगंधाने भरून जाणार आहे.

रोहिणी said...

@अजय - नक्की बघेन तो सिनेमा. यु ट्युब वर आहे. आताच चेक केलं. बघितला की कळवते तुला. पुन्हा एकदा मनापासुन आभार :).

रोहिणी said...

@Anonymous - नक्किच महाराष्ट्रात पडदा शब्द वापरतात. परदा हा शब्द मराठी नाहिच. तो हिंदी शब्द आहे. चुक दुरुस्त केल्याबद्दल मनापासुन आभार. पण मला असं वाटतं की भाषा ही केवळ पुस्तकांतुन नाही तर ती बोलिभाषेतुन जास्त जगते आणि तग धरते. मी विदर्भातुन आले त्या भागात परदाच म्हणतात आणि मला वाटतं विदर्भ महाराष्ट्रातच येतं. मी ब्लॉगवर माझ्या बोलीभाषेत लिहिते त्यात फार काही चुक आहे असे मला वाटत नाही. नाहितर माझे लिखाण (माझे मलाच )हे पुस्तकी वाटले असते. अजुन एक, माझे प्रांजळ मत आहे की आज जेव्हा मराठी भाषेचाच र्‍हास होतो आहे तेव्हा निदान आपण सगळ्यांनीच एखाद्या शब्दावरून किस पाडण्यापेक्षा ती भाषा तग धरेल असे काहितरी केले तर जास्त बरे नाही का. महेंद्र काकांनी ह्याच विषयावर 9 सेप्टेंबर 2009 ला मराठीचे शत्रु ह्या नावाने एक पोस्ट टाकली आहे. ती जरूर वाचा.  

'चार-पाच वर्षं अलीकडेही आजूबाजूला गर्द वनराई, मोर वगैरे गोष्टी असत हे पर्यावरणवाल्यांना कळवावं लागणार.' - जरूर कळवा. गावाचे, शैक्षणिक संस्थेचे नाव आणि पत्ता मी देईन आणि सोबत पुरावा म्हणुन आम्ही काढलेले फोटो आणि व्हिडिओ सुद्धा :).

आवर्जुन प्रतिक्रिया दिलीत... आभार.

रोहिणी said...

@ Mahendra - आज ट्रॅफिक जाम चा दिवस दिसतोय. आज मी पाच तास अडकले होते शहरातल्या शहरात. आतच आले आणि तुमची कमेंट बघितली. मनापासुन आभार. लवकरच बोलुया. फोटो आणि व्हिडिओ बॅक अप घेताना एका डीव्हीडी वर टाकले. ती डीव्हिडी शोधुन मग पोस्ट टाकेपर्यंत धीर धरवला नाही :).

रोहिणी said...

@भानस - बापरे सारे स्त्रीधन विकले म्हणजे खरोखरच हिम्मत केली. अर्थात साथीदाराची भरभक्कम साथ असली की आपण काटेरी मार्ग ही हसत हसत पार करतो. एका मनातुन दुसर्‍या मनापर्यंत पोचले. अजुन काय पाहिजे. माझे लिहिणे सफल झाले. दोघांनी मिळुन घर उभारताना नाते अजुनच दृढ होते हे मात्र अगदी खरय. मनापासुन आभार.

काल निर्णय said...

नमस्कार! 'टेकन-फॉर-ग्रँटेड' वातावरणापासून दूर, स्वबळावर संसाराची सुरुवात, उभारणी करताना आलेले अनुभव खूपसा शहाणपणा शिकवून जातात. विशेषतः अतिशय सहजसुलभ आणि संघर्षहीन आयुष्य जगणारी काही माणसं आणि त्यांचं 'असेल हरी तर देईल खाटल्यावरी' पद्धतीने पुढे सरकणारं जीवन पाहता हे स्वानुभवसिद्ध शहाणपण आणि कर्तृत्व खूप प्रकर्षानं जाणवतं. तुमचा ब्लॉग, त्यातील तुमचे अनुभव तुमच्या शैलीत वाचणं हा खूप छान अनुभव आहे. पुढील सर्व वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!

रोहिणी said...

@काल निर्णय - स्वबळावर संसाराची सुरुवात, उभारणी करताना आलेले अनुभव खूपसा शहाणपणा शिकवून जातात हे अगदी खरय. शहाणपणा शिकवतातच शिवाय मॅच्युरीटी येते ती वेगळीच. आम्ही अनेक टक्के टोणपे खाल्लेत. अगदी जवळचे मित्र म्हणवणार्‍यांनी फसवले. पण लॉंग टर्म मधे बघितलं तर त्या गोष्टिचा फायदाच झाला पुढे माणसांची पारख करण्यात. शुभेच्छांसाठी मन:पूर्वक आभार.

Dk said...

hehehe rohini sahii lihilys :) majaa aalee vaachtana aata savdeene tuza purn blog vaachen :)

रोहिणी said...

@ Deep - मनापासुन स्वागत आणि आवर्जुन प्रतिक्रीया दिलीत त्याबद्दल अनेक आभार. मी लिहिलेलं तुम्हाला आवडलं, आनंद झाला. अशिच भेट देत रहा.

Dk said...

hahahaha tumhee?? nako kharch khoop odd vaatty! ki mi tula aho jaaho karu?

रोहिणी said...

@Deep - नको :). अहो जाहो नको... अगं तुगं च ठीक आहे :).

Mugdha said...

sadhdyaa maajhya aayushyaatahi ashich kahishi phase chaalaliye.. ;)

chhan lihiles..manapasun.. :)

रोहिणी said...

@ मुग्धा - हो गं... मी समजु शकते...पण मजा येत असेल ना... तु ह्या पोस्ट ला एकदम रीलेट करु शकत असशिल... तुम्हा दोघांना पुढिल वाटचालीसाठी मनापासुन शुभेच्छा.

अपर्णा said...

खूप छान लिहिलंस...आणि तुझी शैली मला आवडली...सध्या माझं घर सोडणं चालु आहे ना त्या पार्श्वभूमीवर हा एक वेगळा अनुभव मला एका वेगळ्या जगात घेऊन गेला...आणि हो तू किती नशीबवान आहेस माहित आहे का?? मोर आणि छान निसर्गसानिध्यात दोघांचा अभ्यास खरंच छान होत असेल...अगं निसर्ग सान्निध्यात राहिलं तर नक्की पक्षी दिसतात असं तुझ्या त्या अनामिकाला खास सांगणं आहे....:)

रोहिणी said...

आवर्जुन वाचलंस छान वाटलं :). घर बदलणे म्हणजे तुल खुपच काम पुरत असेल ना. हो खरंच निसर्ग सान्निध्यात मस्त होतो अभ्यास. आणि अनामिकाचे म्हणशिल तर हल्ली मी अनामिक ह्या टायटल ची कोणतिही कमेंट मनावर घेत नाही. बरेच अनुभव आले आहेत. विचार करतेय की कमेंट साठी Anonymous ऑप्शनच रद्द करावे. म्हणजे सगळी डोकेदुखीच जाईल :).

anjali said...

kahi lokana changalya goshtitahi kurapat kadhayachi savay aste.ashya lokanna neglect karne changale nahi ka?
Jast kahi bolat nahi pan tuza anubhav swatahala jagawasa vatala.
Tuze anubhav asech share karat jaa

anjali said...

kahi lokana changalya goshtitahi kurapat kadhayachi savay aste.ashya lokanna neglect karne changale nahi ka?
Jast kahi bolat nahi pan tuza anubhav swatahala jagawasa vatala.
Tuze anubhav asech share karat jaa

रोहिणी said...

@ अंजली - ब्लॉगवर स्वागत :). माझे लिखाण तुम्हाला आवडले आणि माझे अनुभव तुम्हाला जगावेसे वाटले म्हणजे माझे लिहिणे तुमच्यापर्यंत पोचले :). सध्या जरा व्यस्त आहे त्यामुळे ब्लॉगवर लिहिणे होत नाहिये. लवकरच सुरु करेन. आवर्जुन प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी खुप खुप आभार. भेट देत रहा :).

rohini said...

khuuup chhan lihile aahe,, lekh aavadala,, dolyasamor chitra ubhe rahile !