गुरुवार, जुलै ०९, २००९

मराठी की इंग्रजी?

मराठी की इंग्रजी...मराठी की इंग्रजी...सध्या ह्या विचाराने डोकं भणभणायला लागलं आहे...

आत्ता कुठे माझी पोर बोबडे बोल बोलु लागली ( वय 1 1/2 वर्षे ) आणि हौसेने आम्हीही तिला चित्रांचं पुस्तक आणुन 'तो बघ काऊ , ती बघ चिऊ, हा वाघोबा बरं का..असे काही बाही शिकवायला लागलो. पण थोड्याच दिवसात लक्षात आलं की पुढे वर्ष दिड वर्षाने जेव्हा शाळेत ऍडमिशन साठी इंटरव्यु होइल तेव्हा हे काऊ, चिऊ आणि वाघोबा कामी येणार नाही... तेव्हा तिला A for Apple हेच उत्तर द्याव लागेल.


झालं हा विचार जेव्हापासुन डोक्यात आला तेव्हापासुन सारखं वाटतं की मराठीत शिकवायचं की इंग्रजीत शिकवायचं? आम्ही परदेशात जरी राहात असलो तरी घरी पुर्णपणे मराठी वातावरण आहे आणि घरी बोलतो पण मराठीतच. त्यामुळे आताकुठे लेकिची मराठी भाषेशी ओळख व्हायला सुरुवात झाली आहे तर लगेच दुसरी भाषा तिच्यावर लादणे कितपत योग्य आहे? ( ह्या वरताण म्हणजे शेजारी पाजारी तिच्याशी अजुन तिसर्‍याच भाषेत बोलतात :-) ) आणि पुढे तिच्या शालेय शिक्षणाचा विचार करता इंग्रजीत शिकवणेच योग्य ठरतं.

आम्हीसुद्धा आधि सगळं मराठीतच शिकलो पण आज दोघांनाही इंग्रजीची उत्तम जाण आहे. पण परत मनात असाही विचार येतो की समजा आज शिकवलं सगळं मराठीत तरी आमचं विंचवाचं बिर्‍हाड. आज इथे तर दोन / तिन वर्षाने अजुन कुठे. त्यामुळे शिक्षण पुढे उच्चशिक्षण हे सगळं इंग्रजीत होणार हे नियतीने आधिच ठरवलेले. मग अश्यात इंग्रजीत शिकवणेच योग्य. पण म्हणुन आपल्या मातृभाषेत शिकवायचं नाही का? मग तिला मराठी येइल कसे? परदेशात राहुन मोडकं तोडकं मराठी बोलणारे पण मराठी वाचता न येणारे, मराठीत बोललेलं कळणारे पण मराठीत बोलता न येणारे किंवा अजिबातच मराठी न येणारे अनेक लहान मुलं बघितली आहेत. आपली लेक तशी होउ नये असे मनापासुन वाटते.

हे सगळे विचार हल्ली डोक्यात गर्दी करतात. पण मला असं वाटतं की ही पण एक पासिंग फेज़ आहे. आपण नेटाने प्रयत्न केला तर तीला मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषा निट अवगत होतिल. गरज आहे ती फक्त थोड्या संयमाची. बघुया पुढे काय होते ते :-) ...

गुरुवार, जुलै ०२, २००९

Soulmate (भाग 3 )

रुची आणि त्या तरुणाची पहिली भेट होउन आता 5-6 महिने झाले होते. दोघांनीही एकमेकांना नजरेनच जोखलं होतं, ओळखलं होतं आणि स्विकारलं होतं.

त्या दिवशी रुची ला खाली पार्क मधे जायला जरा उशिरच झाला. बघते तर तो एका बेंचवर बसला होता. तिची वाट बघत असल्यासारखा. आश्चर्य म्हणजे आज पार्कमधे त्याच्याशिवाय कोणिही नव्हतं. मग तिला आठवलं की कालच शेजारच्या बाई तिला सांगत होत्या की आता मुलांची परिक्षा सुरु होणार आहे. कदाचित मुलं अभ्यास करत असतील, तीने स्वत:शिच विचार केला. आणि त्या तरुणाच्या समोरच्या बेंचवर जाउन बसली. त्याच्याकडे बघुन कळेल न कळेलसं हळुच हसली. त्याने ही हलकेच हसुन प्रतिसाद दिला.


"किती उशीर केलास भेटायला... मी किती वर्षं वाट बघतोय." तो म्हणाला. " हो ना.. उशिर झाला खरा. जाउ दे.. कसा आहेस?" भारावलेली रुची म्हणाली. " मी ठिकच आहे म्हणायचं. वेड्यासारखा तुझा शोध घेत फिरत होतो. शेवटी 6 महिन्यांपुर्वी इथे भेटलीस." आणि त्यांचे हितगुज सुरुच रहिले. दोन जीव कितीतरी वर्षांनी भेटले होते. काळवेळ ह्यांच्या सीमा ओलांडुन, जन्मांचे फेर धरत चुकवत, एकमेकांशी जडु बघत होते.

दोघांनाही एकमेकांची ओळख पटु लागली. ते द्वैत एकाकार होउ लागले. आणि एकमेकांत असलेल्या आत्मिक अद्वैताची खात्री पटली. दोघांचाही वर्तमान जन्मातील आत्मिक शोध संपला होता. अतिव आनंदाने दोघांचेही डोळे पाझरु लागले. रुची ला तो क्षण घट्ट धरुन ठेवावा असं वाटलं. काय नव्हते त्या क्षणात, मन:शांती, समाधान, आनंद, आयुष्यातले सगळे जीवनरस त्या एका क्षणात एकवटले होते. त्या एक क्षणाने त्या दोघांनाही पुर्णत्व प्राप्त करुन दिले होते. त्यांचा हा जन्म सार्थकी लागला होता.


आणि रुची ने अलगद आपले डोळे उघडले. अजुनही ती भारलेल्या अवस्थेत होती. तो तरुण तिच्यासमोरच बसला होता. दोघांची नजरानजर झाली आणि त्यांचे चेहरे उजळुन निघाले. शिव आणि शक्ती चे ही अद्वैत रुप मोहक होते. पण लगेचच त्याचा चेहरा दु:खाने झाकोळला. त्याला वर्तमानाची जाणीव झाली. त्याने प्रथमच तिच्याशी संवाद साधला आणि तिला सांगितले की त्याची दुसर्‍या देशात बदली झाली आहे आणि 2 दिवसातच तो त्याच्या कुटुंबासोबत जायला निघणार आहे. आणि हे सांगण्यासाठीच तो तिची वाट बघत होता. तिने त्याला विचारले की आता परत कधी भेटणार त्यावर तो म्हणाला आजसारखचं somewhere...sometime.... एवढं सांगुन तो जाण्यासाठी पाठमोरा वळला.


रुची हळहळली, आत्ता कुठे नात्याची जाणीव झाली होती की परत हा पाठशिवणीचा जीवघेणा खेळ सुरु झाला होता. परंतु क्षणार्धातच ती सावरली आणि तिचं मन भरुन आलं.तिचा शोध संपला होता. आज तिला तिचा Soulmate भेटला होता.

बुधवार, जुलै ०१, २००९

Soulmate (भाग 2 )

मग नजरेचे हे खेळ रोजचेच झाले. रुची संध्याकाळी पार्क मधे जायची तेव्हा तो आधिच आलेला असायचा. कुणाची तर वाट बघत असल्यासारखा. रुची दिसल्यावर त्याच्या चेहर्‍यावरचा,'ती आज दिसेल की नाही' चा संभ्रम हलकेच सैल व्हायचा. रुची सुद्धा त्याच संभ्रमात असायची आणि तो दिसल्यावर कळत नकळत तिला स्वस्थता लाभायची. हळुहळु शेजारणीं कडे चौकशी केल्यावर तिला कळले की तो कोणत्या तरी दुतावासात काम करतो. तो, त्याची बायको आणि त्यांची छोटी मुलगी तिथे 3 वर्षांपासुन रहात आहेत आणि त्याची बायकोही कुठेतरी नोकरी करते. पण रुची ला त्याचे नाव आणि त्याचा देश मात्र कळु शकले नाही.

रुची ने स्वत:ला आवर घालण्याचा बराच प्रयत्न केला. हरप्रकारे मनाची समजुत घातली. तो विवाहित आहे, एक छोटी मुलगी आहे, आपल्याला त्याचं नाव गाव काहिच माहिती नाही आणि सरतेशेवटी तो एक परदेशी आहे. पण त्याच्याबद्दल तिला इतके जबरदस्त आकर्षण वाटत होते की ही सारी कारणे त्यापुढे फोल ठरायची. ती अक्षरश: लोहचुंबकासारखी त्याच्याकडे खेचल्या जायची.

पण ह्या सार्‍या प्रकारात रुची ला त्याच्याबद्दल शारीरीक आकर्षण कधिच वाटले नव्ह्ते. वाटायची ती केवळ अनामिक ओढ. का कोण जाणे पण तो सुद्धा आपल्याकडे ओढल्या जातोय असे सारखे तिला वाटायचे. त्याच्याही डोळ्यांत तिला कधिही लालसेचा लवलेशही दिसला नाही. त्या नजरेत जे काही होतं ते नितळ, निर्मळ आणि निरागस होतं. आपलसं वाटणारं आणि आपलसं करणारं होतं. आणि ह्याचे तिला बरेचदा आश्चर्य वाटायचे. की हे असं कुठलं नातं आहे जिथे दोन पुर्णपणे अनोळखी व्यक्ती एकमेकांची नाव साधी नावं सुद्धा माहिती नसताना इतक्या प्रचंड वेगाने एकमेकांकडे खेचल्या जात आहेत. ते ही आदिभौतीक पातळीवर. तिथे कसलीच अपेक्षा नव्हती. शारिरीकही नाही आणि मानसीकही नाही. प्रतिक्षा होती ती केवळ Relate करण्याची आणि होण्याची.

कधि एकदा संध्याकाळ होते आणि त्याला डोळाभर बघते असे रुचीला व्हायचे. त्याच्या त्या शांत निळ्या डोळ्यांत डोकावुन बघताना सगळं कसं विसरायला व्हायचं. आजुबाजुचं भानच सुटायचं. आणि त्या नंतर मिळायची ती अपुर्व शांती. सारं जग त्या क्षणी थांबल्यासारखं वाटायचं. स्तब्ध आणि निश्चल.


दोघेही केवळ भारावल्यासारखे जणु नजरेनेच बोलायचे. जसे काही जन्मोजन्मी ते दोघे भेटत आले होते. अनोळखी व्यक्ती बद्दल वाटणारी प्रचंड ओढ, अनामिक आकर्षण आणि एका नजरेतच हा तर माझ्याच अस्तित्वाचा भाग आहे असे वाटायला लावणारी संवेदना. हे पुर्वजन्माचे संचित नाहितर काय आहे? पण अश्याही परिस्थितीत दोघांनाही वर्तमानाची जाणीव होती. दोघांनाही आपाआपल्या मर्यादा ठाउक होत्या.

रोज खाली आल्यामुळे दोघांमधे थोडा मोकळेपणा आला होता. कधितरी एखादं मंदस्मित, कधि हाय - हॅलो ची देवाणघेवाण सुरु झाली. पण ते तेवढ्यापुरतच. त्यांच्यात संवाद नव्हता आणि दोघेही संवाद घडावा म्हणुन जाणुन बुजुन प्रयत्नही करत नव्हते. एकमेकांशी बोलण्याची त्यांना कधी गरजच वाटत नव्हती. गरज होती ती फक्त मनं रिती होण्याची.

आणि अश्यातच तो दिवस आला...


(क्रमश:)

रविवार, जून २८, २००९

Soulmate ( भाग 1 )

नेहेमीप्रमाणे संध्याकाळी रुची खाली पार्क मधे गेली. तिचे डोळे त्यालाच शोधत होते. तिकडे तोही कधिचा आला असावा. त्याचेही लक्ष तिच्या वाटेकडेच होते. दोघांच्या भिरभिरणार्‍या नजरेची भेट झाली आणि क्षणभर आपल्या ह्रुदयाची धडधड बंद पडते की काय असे रुची ला वाटले...

रुची दिल्लीला एका नामांकीत कंपनीत नोकरीला होती पण आधि उच्च शिक्षणाच्या ध्यासामुळे आणि नंतर नोकरीमुळे अजुन तिचे दोनाचे चार झाले नव्हते. तिकडे आई वडिलांची खटपट सुरु होतिच पण रुची कही त्यांना दाद देत नव्हती. 6 महिन्यांपुर्वीच ती कंपनीच्या दिल्ली शाखेत रुजु झाली होती. कंपनीने तिला राहायला एका पॉश सोसायटी मधे फ्लॅट दिला होता. त्याच इमारतीत एक परदेशी तरुण राहायचा. तो रोज संध्याकाळी त्याच्या बाळाला घेउन खाली पार्क मधे यायचा. रुची सुद्धा रोज खाली जायची. पार्क मधली हिरवळ, अवतिभवती सळसळणारी झाडं, खेळणारी बागडणारी मुलं बघितली की तिला कसं प्रसन्न वाटायचं.

एक दिवस शेजारणींशी पार्कमधे गप्पा मारता मारता तिने सहज बघितलं तर तो परदेशी तरुण तिच्याकडेच बघत होता. तशी रुची दिसायला बरी होती. सावळी असली तरी नाकीडोळी रेखीव होती. तिच्या वागण्याबोलण्यात एक प्रकारचा उमदेपणा होता. त्यामुळे तिचे व्यक्तिमत्व अजुनच फुलुन यायचे. कॉलेज मधे ती मुलांमधे बरीच लोकप्रिय होती पण तिने कधि कुणाला भाव दिला नव्हता. पण आज अचानक त्या तरुणाला बघुन तिला काहितरी वेगळं जाणवलं. ती सुद्धा पहिल्या नजरेतच त्या तरुणाकडे आकर्षीत झाली होती. तो तरुण होतापण तसाच कुणाही तरुणीने आकर्षीत व्हावे असा. भरपुर उंची, कसदार बाहु, कमावलेले शरीर, उन्हामुळे रापलेला तांबुस गोरापान रंग, पिंगट केस आणि शांत निळे डोळे. काय नव्हते त्या डोळ्यांत. आणि ती नजर. सारखी रुची ला त्याच्याकडे बघायला परावृत्त करत होती. राहुन राहुन काहितरी कारण काढुन रुची त्या तरुणाकडे बघत होती.


तिकडे त्याचीही अवस्था काही निराळी नव्हती. तो सुद्धा रुचीकडेच बघत होता. दोघेही एकमेकांकडे बघुन केवळ नजरेनेच भारावुन गेले होते. पण रुचीने स्वत:ला आवरले. असे आकर्षीत व्हायला आपण काय टिनेजर आहोत का आणि शिवाय तो बाळाला घेउन आला आहे. एकुण देह्बोलीवरुन ते बाळ त्याचच वाटतय. घरी त्याची बायको पण असेल. तो आपल्याला बघतोय असा आपला उगाच गैरसमज झाला असावा अशि स्वत:च स्वत:ची समजुत काढली. एकवार आजुबाजुला बघुन घेतले. पण हा नजरेचा खेळ कुणाच्याही लक्षात आला नव्हता. तिने हुश्य केले आणि घरी जायला निघाली. ती वळली पण तिला सारखे वाटत होते की तो तरुण अजुनही आपल्यालाच बघतोय. आणि तिने आपला चालण्याचा वेग वाढवला.
(क्रमश:)

;;