रविवार, सप्टेंबर ०९, २००७

पैलतिर

दुर्लक्षितच जगले

आता कोणि विचारले तरच नवल आहे

दुखावलेल्या मनाला

फुलापेक्षा काट्याचेच अप्रुप जास्त आहे


हळुवार भावनांचा

चुरडुन केर झाला

खोट्या मोहक हास्ये

नात्यांना जपायचे आहे


ह्या फसव्या दुनियेत

उभे आयुष्य ठाकले आहे

डोळे मात्र आताच

पैलतिरावर आहे...

शनिवार, सप्टेंबर ०८, २००७

शब्द

शब्द कधि हसरे आणि नाचरे

रडताना हसवणारे,

शब्द कधि दु:खद आणि बोचरे

हसता हसता टचकन पाणी आणणारे...


शब्द कधि लाघवी कधि प्रेमळ

मायेची फुंकर घालणारे,

शब्द कधी कठोर आणि निष्ठुर

रेशिमबंध तोडणारे....


शब्द कधि उन्मत्त, कधि मस्तवाल

आपल्याच गुर्मीत गुरगुरणारे,

शब्द कधि लाचार आणि आश्रित

लाजेने झाकोळणारे...


शब्द कधि चकचकीत आणि साखर पेरलेले

फसवुन सख्य साधणारे,

शब्द कधि अबोल आणि मुग्ध

संयत अनुनय करणारे...


शब्द कधि खोटे कधि फसवे

खोल गर्तेत ढकलणारे,

शब्द कधि खरे आणि आश्वासक

’गड्या कामाला लाग’ म्हणणारे...


शब्द कधि सख्खे आणि जवळचे

पण जवळच्यांना दुरावणारे.

शब्द कधि परके कधि दुरचे

पण हळुवार जवळिक जपणारे...


कधि सारे शब्द विसरुन

नि:शब्द असे जगायचे आहे

शब्दांच्याही पलिकडचे

शब्दांशिवाय जाणायचे आहे...

सोमवार, ऑगस्ट २७, २००७

अशी ही बनवाबनवी!

भर दिवसाच्या उजेडात

कृष्णकृत्ये सुरु असतात;

डोळे मिटणारया मांजराला

सर्व लोकच आंधळे भासतात!


गुंड आणि शिपाई सुद्धा

लाचेपायी त्रस्त असतात;

एका हाताने घेउन

दुसरयाने देत असतात!


नेते मंडळींचा इथे

सुरु असतो वेगळाच खेळ;

पुढील निवडणुक येईपर्यंतं

आश्वासनांवरच निभते वेळ!


रात्र आणि दिवसामागुन

सुरु असतो हाच खेळ;

एकीला हाताशी धरुन

दुसरीशी ठरवली जाते वेळ!


बाहेरचे काय घेउन बसलात

घरात सुद्धा असेच असते;

आज नक्की करतो म्हणुन

उद्यावर ढकलले जाते!


शेवटी सगळे लोक हे

मांजराचीच जमात असतात

जाता जाता डोळसाला

चक्क आंधळं ठरवुन जातात!!

शुक्रवार, ऑगस्ट २४, २००७

पत्रं

तु तिथे अन् मी इथे....

तु तुझ्या कामात व्यस्त आणि मी इथे अवघडलेली,

उदरात होणारी प्रत्येक हालचाल तुझ्या अस्तित्वाची जाणीव करुन देणारी,

तुला मात्रं अजुन पुरेशी sink in न झालेली!

दोघांचाही डोळा आहे उद्यावर पण संदर्भ वेगळे,

प्रत्येकचजण शोधतयं आकाश आपले मोकळे...

‘माझं जग, माझी Identity, माझी space’, तुझे लाडके शब्द,

तुझ्याच असणारया मला करतात सतत विद्ध!

तुझ्या कविता वाचुन जग तुझ्या जवळ आले

मी मात्रं प्रेमाचे दोन शब्द वाचायला आसुसले!

फार काही अपेक्षा नाही एकच मागणे मागते

वेळात वेळ काढुन मला लिहिशील का दोन ओळी?

;;