जगण्याची ...
पूर्णत्व म्हणजे तरी काय? ते व्यक्तिसापेक्ष आहे का? तसं असेल तर, प्रत्येक जीव , मर्यादांनी बद्ध. मर्यादांची, अद्न्यानाची जेवढी जास्त विपुलता, विशालता, तेवढ्या प्रमाणात एखाद्याला कोणतीही मामुली गोष्ट परिपूर्ण वाटेल. वास्तवाशी इमान राखणं अत्यंत आवश्यक. वास्तव म्हणजे काय नेमकं?
स्वत:ची पात्रता.
समाजात आपणा आपल्याबद्दल जी प्रतिमा उभी केली असेल किंवा आपल्या आणि समाजाच्याही नकळत आपली जी प्रतिमा तयार झाली असेल, ती पुसण्याचं सामर्थ्य पाहिजे. एकांतात, एकाकीपणात, प्रत्येकानं आत डोकावून पाहावं. जाहीरपणे मान्य करण्याच सामर्थ्य नसेल, तर तीही वास्तवता. स्वत:ची स्वत:ला संपूर्ण ओळख असते, कारण माणूस स्वत:पासून पळू शकत नाही.स्वत:च्या सावलीवर जो भाळला, तो फसला.
एक मांजर सकाळी रस्त्यावर आलं. सूर्याच्या तिरक्या किरणांमुळं मांजराला स्वत:ची लांबपर्यंत पसरलेली सावली दिसली. मांजर म्हणालं,
'आज कमीत कमी एखादा घोडा मारून खाल्ल्याशिवाय भूक भागायची नाही.'
सूर्य वरवर येऊ लागला.
सावलीकडे पाहून मांजर म्हणालं,
'घोड्याची काही जरूरी नाही. एखादी शेळी सुद्धा चालेल.'
सूर्य आणखी वर आला. सावलीची लांबीही त्याप्रमाणात कमी झाली.
मग मांजर म्हणालं,'एखादा ससाही चालेल.'
ऐन दुपारी सावली पायांतळीच आली. तेंव्हा मांजर व्याकूळ होत म्हणालं,
'फक्त एक उंदराचं पिल्लू पुरे.'
व्याकुळावस्थेत स्वत:ची जी ओळख होते, ती 'वास्तवता'. स्वत:ची ओळख. त्या प्रमाणातच प्रत्येकाची 'पूर्णत्वाची' व्याख्या वेगळी असणार.
एखाद्या कलाकृतीत कोणत्याही माणसाला कुठलाही पर्याय किंवा बदल सुचवता येत नाही, तेंव्हा ते 'पूर्णत्व'.
( आपण सारे अर्जुन - व. पु. काळे )
2 प्रतिसाद्:
वा! व. पु. द ग्रेट! Keep posting!
Thanks Sumedha....
Post a Comment