जगण्याची ...
सर्व ब्लॉगर मित्र - मैत्रिणिंना आणि असंख्य वाचकांना दिवाळीच्या अनेक हार्दीक शुभेच्छा. ही दिवाळी आपणा सगळ्यांना सुख, सम्रुद्धी, समाधान आणि आरोग्यपुर्ण जावो. 
दिवाळीचे निमित्य साधुन मी तीन वर्षांपूर्वी ह्याच ब्लॉग वर टाकलेली कविता आज परत येथे देत आहे.
अंधाराचा ठाव घेती
दिवाळीचे दिवे,
आसमंत उजळतील
तुझे माझे दिवे.
लक्ष लक्ष तेवतील
स्नेहार्द्र दिवे,
प्रीतगंध दरवळतील
प्रेमाचे दिवे.
तुझ्या माझ्या प्रितीची
साक्ष आहेत दिवे,
शब्द मुकी होतात
आणि बोलु लागतात दिवे ...
फोटो - गुगल इमेजेस वरून.
24 तारखेला सकाळी लवकर उठलो... भराभर सगळं आटोपुन हॉटेल मधेच नाश्ता केला आणि हेलसिंकी साठी निघालो. सेंट पिटर्सबर्ग ते हेलसिंकी हे अंतर साधारण 400 किमी आहे..म्हणजे खरं तर 4 तासांचा प्रवास. पण मधे बॉर्डर क्रॉसिंग असल्यामुळे आणि गर्दी मुळे आम्हाला वेळ लागला. फिनलॅंड मधे प्रवेश केल्यावर खर्या अर्थाने आमची स्कॅंडिनेवीया ची ट्रिप सुरु झाली. रस्ता खुप काही मोठा नव्हता. 2 ते 3 लेन्स दोन्ही बाजुनी एवढाच असेल पण होता मात्र एकदम गुळगुळीत... छोट्या छोट्या टुमदार गावांमधुन वळणं घेत घेत मधे मधे समुद्राला विळखे घालत घालत आमचा प्रवास मजेत सुरु होता. जेव्हा कुठलं छोटसं गाव समुद्रकिनारी असे तिथे लोकांच्या छोट्या छोट्या फेरी बोट्स किनार्यापाशी बांधुन ठेवलेल्या असत.
वेगवेगळ्या रंगांच्या वेगवेगळी नक्षी काढलेल्या त्या छोट्या बोटी इतक्या मस्त दिसत होत्या. बरेच जण उन्हाळा असल्यामुळे आपला पुर्ण कुटुंब कबिला घेउन समुद्रसफरी वर निघाले होते... सगळीकडे उत्साही वातावरण जाणवत होतं.
जस जसं आम्ही हेलसिंकी च्या जवळ जात होतो तसतशी कंट्रीसाईड बदलत होती.... सर्वदुर पसरलेली हिरवीगार कुरणं, त्यावर चरणारे बैल, गाय, मेंढ्या ई. प्राणी, मधेच सोनपिवळ्या फुलांचा गालिचा घातलेली शेते, बंगलीवजा दिसणारी; छोटिशी तरीही देखणी रंगीबेरंगी लाकडी घरे आणि हमखास उठुन दिसणारे युरोपीयन स्टाईल चर्च. किती पाहु आणि किती नाही असे होत होते. पण एवढ्या सगळ्या देखाव्यात एक गोष्ट आमच्या लक्षातच आली नव्हती की आमचा जीपीएस नीट काम करत नव्हता. ( हे आम्हाला हेलसिंकी ला पोचल्यावर कळलं :-) ) एक तर तसा सरळ सरळ रस्ता होता आणि शिवाय साईनबोर्ड्स होते त्यामुळे आम्ही जीपीएस कडे बघितलं सुद्धा नव्हतं. आम्ही साधारण 4 च्या सुमारास हेलसिंकी ला पोचलो. आणि सरळ आधि टुरीस्ट इनफॉरमेशन ऑफिस गाठलं. ते सरळ रस्त्यावरच असल्यामुळे आम्हाला फारसं काही शोधावं लागलं नाही. तिथल्या मदतनिसाने 1-2 दिवसात आम्हाला कधिकधि कायकाय बघता येइल हे नीट समजावुन सांगितले. त्याने आम्हाला दोन पर्याय दिले होते. एक म्हणजे हेलसिंकी सिटी कार्ड आणि दुसरा पर्याय होता सिटी ट्रांसपोर्ट कार्ड. हि दोन्ही कार्ड्स 24 तास, 48 तास, 72 तास अशी दिवसाप्रमाणे उपलब्ध होती. आम्ही 24 तासांची दोन सिटी ट्रांसपोर्ट कार्ड्स घेतली. त्यात आम्ही बस, ट्रॅम, बोट कशानेही प्रवास करु शकत होतो... तर साधारण आम्ही प्लॅन ठरवला आणि त्याचदिवशी 1-2 ठिकाणी भेट देण्याचे ठरवले. संध्याकाळचे पाचच वाजले होते आणि सर्व प्रेक्षणिय स्थळं रात्री 8 पर्यंत सुरु होती. आमचं हॉटेल 7-8 किमी अंतरावर होतं त्यामुळे आम्ही ठरवलं की आधि पटकन हॉटेल ला जाउ गाडी पार्क करु आणि मग फिरतीवर निघु म्हणजे शहरात पार्कींग चा प्रश्न येणार नाही कारण युरोप मधे शहरात पार्कीग खुपच महाग आहे. आणि सिटी ट्रांसपोर्ट कार्ड आहेच.
मग नवर्याने झोकात जीपीएस काढला त्यात डेस्टीनेशन मधे हॉटेल चा पत्ता आधिच टाकला होता. आणि गाडी सुरु केली. थोड्यावेळाने जीपीएस ने आपला इंगा दाखवायला सुरुवात केली. सारखं आपलं रुट रिकॅल्क्युलेशन. कधी सरळ जायला सांगायचा कधी उजवीकडे / डाविकडे पण दिड तास झाला आम्ही काही ईछ्चित स्थळी पोचत नव्हतो. त्यातच काही मागमुस नसतान मुसळधार पाऊस सुरु झाला. मग आम्ही विचार केला की आपण साईन बोर्ड्स चा आधार घेउ. पण फिनलॅंड मधे इतक्या बेक्कार साईंस आहेत की त्याप्रमाणे तुम्ही गेलात तर कधिच हव्या त्या ठिकाणी पोचणार नाही. आणि पाऊस पण ईतक्या जोरात पडत होता की प्रत्येक बोर्ड वाचायला गेलो असतो तर रात्रच झाली असती. आणि रस्त्यांची नावे आणि बिल्डिंग नंबर वाचणं तर शक्यच नव्हतं( स्कॅडिनेवीया मधे 12 ईंच बाय 10 ईंच च्या छोट्या पत्र्यावर रस्त्यांची नावं आणि बिल्डिंग नंबर असतात. ती पण मुख्य रस्त्याहुन 8 ते 10 मीटर अंतरावर.) हॉटेलवाल्याला फोन केला तर तो म्हणे की मॅप असल्याशिवाय तो फोनवरुन सांगु शकत नव्हता. तरी त्याने 2-4 खाणाखुणा सांगितल्या आणि बेस्ट लक म्हणुन फोन ठेवुन दिला. आमच्याकडे होता टुरिस्ट मॅप त्यात काहिच डिटेलिंग नव्हतं. आली का आता पंचाईत. मग गाडी एका ठिकाणी पार्क केली शांतपणे तो नकाशा बघितला. जवळपासचे सर्व साइन बोर्ड्स वाचले. आणि त्या हॉटेलवाल्याने सांगितलेल्या खुणा आणि थोडा कॉमन सेंस ह्या वरुन एकदाचं ते हॉटेल शोधुन काढलं. पण तोवर रात्रिचे 8 वाजले होते. बाहेर पडायचा कंटाळा आला होता आणि शिवाय गुगल वरुन पुढच्या सगळ्या प्रवासाचे नकाशे सुद्धा घ्यायचे होते म्हणुन मग बाहेर जाणे रद्द केले.
दुसर्या दिवशी सकाळी सगळं आवरुन लवकरच बाहेर पडलो.. मस्त ऊन पडलं होतं अगदी प्रसन्न सकाळ होती. गाडी घेऊनच निघालो आणि बाजाराच्या जवळच असलेल्या भारतीय दूतावासात पार्किंग केले. तिथुन जवळुनच सिटी ट्रांसपोर्ट ची बस सुटणार होती. ती बस शहरातल्या सगळ्या प्रमुख प्रेक्षणिय स्थळांजवळ थांबते. हवं तिथे उतरायचं, फिरायचं आणि पुढची मिळणारी सिटी बस पकडायची. ट्रांसपोर्ट कार्ड घेतल्यामुळे खुपच सोय झाली होती. सगळ्यात आधि आम्ही हेलसिंकी ल्युथेरन कथिड्रल बघितलं. निळ्या आकाशाच्या बॅकग्राउंडला चर्च ची ती पांढरी ईमारत अगदी उठुन दिसत होती. त्या चर्च मधला ऑर्गन तर अप्रतिम होता. चर्चनंतर थोडं बाजारात फिरलो. मग बसनेच हेलसिंकी च थिएटर, रेल्वे स्टेशन ई. बघितलं. काय गम्मत असते नाही. आपल्या देशात आपण कधि कुठल्या गावाचं रेल्वे स्टेशन बघणार नाही पण बाहेर देशात मात्र क्षुल्लक जागा सुद्धा बघायची असते, been there done that अजुन काय. खुपच भुक लागली होती. बसमधुन मॅकडोनल्ड दिसलं. मग काय लगेच उतरलो. मी स्कॅंडिनेवीया च्या ट्रिप मधे एक गोष्ट मनापासुन ऐंजॉय केली ती म्हणजे मॅक चं व्हेज बर्गर. मी शाकाहारी असल्यामुळे मॉस्को मधे मला कायम फ्राईज वर समाधान मानावं लागतं. आता तर फ्राईज खाऊन कंटाळ आला आहे. व्हेज बर्गर माझ्यासाठी वेलकम चेंज होता.
पुढे टेंपलऑकिओ चर्च बघितलं. हे चर्च एका मोठ्या दगडात कोरुन बनवलं आहे. सुंदरच आहे. एवढा मोठा दगड तासुन चर्च घडवण्याचं काम खरोखरच कौशल्याचं आहे. आणि ते कोरलं देखिल अश्या काही खुबिने की बघितल्यावर जाणवतं की हे सगळं एकसंध एका दगडातुन कोरलं आहे पण चर्च आहे हे सुद्धा पुरेपुर जाणवतं. आम्ही गेलो तेव्हा तिथे एक लग्न सुरु होतं नवरा नवरी अगदी खुशीत हातात हात घालुन फिरत होते. आलेली आप्तेष्ट मंडळी वधुवरांवर फुलं, फुगे, साबणाचे फुगे ईत्यादिंचा वर्षाव करत होते, गाणि गात होते, मिठ्या मारत होते. मस्त मजा येत होती त्या लग्न सोहळ्याची. तिथुन आम्ही गेलो सिबेलिअस मॉन्युमेंट बघायला. एका फिनिश संगीतकाराच्या आठवणी प्रित्यर्थ हे बांधण्यात आलं आहे. हे ठिकाण बस थांब्यापासुन बरच आत आहे. एका फिनिश जोडप्याने आम्हाला तिथे पोचायला मदत केली. त्यांच्याकडुन कळलं की तिथे जवळच डॉग पार्क आहे. हा पार्क केवळ रजिस्टर्ड कुत्र्यांसाठी राखीव आहे. एका धनाढ्य बाईने आपल्या लाडक्या कुत्रीच्या आठवणीत हा पार्क बांधला. तिथे दर विकेंड ला कुत्र्यांना मोफत जेवण देतात आणि त्यांच्यासठी वेगवेगळे खेळ ठेवलेले असतात. शिवाय डॉक्टरही असतो. हे सगळं ऐकुन खुपच आश्चर्य वाटलं. मग रमत गमत परत बस थांब्यापाशी आलो. बस घेतली आणि शहराच्या छोट्या छोट्या रस्त्यांवरुन फिरुन परत बाजारा जवळ आलो. थोडीफार खरेदी केली. तिथे जवळच भाजी आणि फळांचे स्टॉल्स देखिल होते. इतकी ताजी भाजी आणि फळं बघुन अक्षरश: विकत घेण्याचा मोह होत होता. हे नवर्याला लगेच कळलं आणि त्याने मला ओढतच दुसरीकडे नेलं :-) ...
आमची फेरी ला रेपोर्टिंग ची वेळ होतच आली होती त्यामुळे अजुन न भटकता आम्ही गाडी घेऊन फेरी च्या गेट कडे निघालो. मी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या बोटिने प्रवास करणार होते त्यामुळे खुपच ऎक्साईटेड होते आणि नवर्याला सवय असल्यामुळे तो तेवढाच थंड होता :-) यथावकाश क्यु मधे आमचा नंबर आला. आमचं बुकींग तिथल्या ऑफिसरने तपासलं आणि आम्हाला आत सोडलं. चौथ्या डेक वर आम्हाला गाडी पार्क करायला पाठवलं आणि त्या प्रचंड मोठ्या बोटिच्या पोटात आम्ही हळुच शिरलो आणि बाहेरच्यांना दिसेनासे झालो. फारच मजा वाटत होती आत जाताना. तेवढ्या वेळात मोठ्या माश्याच्या तोंडातुन त्याच्या पोटात जाताना लहान लहान माश्यांनाही असेच वाटत असणार असे आणि असलेच काहीबाही गमतीशिर विचारही डोक्यात येऊन गेलेत.
गाडी पार्क करुन आम्ही आमच्या केबिन कडे निघालो. आमचं केबिन दहाव्या डेकवर होतं. छान होतं केबिन. केबिन च्या खिडकितुन मस्त खालची दुकानं दिसायची. माणसांची लगबग दिसायची.
आणि केबिन च्या बाहेर भली मोठी काचेची खिडकी. जिथुन नजर ठरेपर्यंत निळाशार पसरलेला समुद्र दिसायचा. हे सगळं बघुन मन खुपच सुखावुन गेलं. मी त्या जागेचं लागलीच समुद्रखिडकी असं बारसं पण करुन टाकलं. केबिन मधे सामान टाकुन समुद्रखिडकी पाशी जरावेळ रेंगाळुन आम्ही वरती मुख्य डेकवर गेलो. केस विस्कटणारा भन्नाट खारा वारा आणि दोस्ती करु पाहणारे सीगल पक्षी अनुभवण्यात वेळ कसा गेला कळलच नाही. खाली आमच्यासाठी एक सरप्राईज वाट बघतच होतं.
मॉस्को - सेंट पिटर्सबर्ग
23 जुलै ला प्रवासाला सुरुवात करायची हे नक्की ठरले आणि आम्ही तयारीला लागलो. हातात अवघा दिड दिवस होता. 21 ची संध्याकाळ / रात्र आणि 22 चा पुर्ण दिवस. तेवढ्या वेळात सामान एकत्र करुन भरणे जरा धावपळीचेच झाले कारण बर्याच गोष्टी बाहेरुन विकत आणायच्या होत्या. विकत आणलेल्या वस्तु, कपडे, खाण्याच्या वस्तु, हाताशी असलेली बरी म्हणुन घेतलेली आमची औषधे, लेकीची औषधे, गरम कपडे , पादत्राणे, लेकीचे खाण्याचे हाल नको म्हणुन मग वरण भातासाठी डाळ तांदुळ (पाठोपाठ सगळे मसाले आलेच :-) ) शिजवायला राईस कुकर, असं करत करत सामान वाढतच गेलं आणि हा ढिग झाला. मनात जरा धाकधुकच होती की एवढं सामान बघुन नवरा नक्कीच ओरडणार पण अहो आश्चर्यम नवरा म्हणला 'आपलीच गाडी आहे मग काय हवं ते घे. शेवटी प्रवास सोयीचा आणि सुखकर व्हायला हवा'. झालं मग काय माझ्यातली सुगृहिणी जागृत झाली आणि मी सामानाच्या त्या ढिगात चारदोन गोष्टी अजुन घातल्या.
मनासारखे आणि गरज असलेले व नसलेले ( गरज नसलेल्या वस्तु कुठल्या हे घरी परत आल्यावर कळले :-) ) सामान जमवुन 22 च्या रात्री 2 वाजता आमचं गाठोडं बांधुन तयार झालं आणि रामप्रहरी सहा वाजता प्रवासाला सुरुवात करायची असे ठरवुन पहाटे पाच चा गजर लावुन आम्ही निश्चिंत मनाने गाढ झोपी गेलो. गजराने आपले काम चोख बजावले होते, पाच वाजता त्याने उठा उठा म्हणुन ठणाणा केला पण 10 मिनिटात उठतो असे सांगुन नवर्याने त्याला गप्प केले आणि अशी काही साखरझोप लागली की सरळ सकाळी सात वाजता जाग आली. मग पळापळ, धावाधाव, आरडाओरडा, एकमेकांवर चिडणे, आरोप प्रत्यारोप करणे असे सगळे प्रकार करुन आणि उरलेल्या वेळात आन्हिकं आवरुन 9 वाजता आम्ही प्रयाण केले.
आम्ही निघालो तोपर्यंत मॉस्को च्या रहदारीने चांगलेच बाळसे धरले होते त्यामुळे मॉस्को च्या बाहेर पडायला आम्हाला दुप्पट वेळ लागला. नंतर चा प्रवास मात्र छान झाला. मधे मधे रस्ता दुरुस्तिची कामं पुण्याची आठवण करुन देत होती. तेवढे वगळुन संपुर्ण रस्ताभर हिरवीगार शेतं, रंगीवबेरंगी फुलं, हलकेच खळाळत हसणार्या तब्बल 12 छोटुकल्या नद्या आणि गर्द हिरवी घनदाट जंगलां नटलेल्या निसर्गराजाने आम्हाला सोबत केली. वाटेत ट्रेन चे दोन डबे जोडुन एक मस्त उपहारगृह केलं होतं. ते बघुन मजाच वाटली.
प्रवासात आमचे आणि कॅमेर्याचे तोंड अखंड सुरु होते. निरनिराळे चिप्स, छान छान चवीचे फळांचे रस, सॅंडविच असा सगळा खाउ आम्ही गट्टम करत होतो आणि आमचा कॅमेरा जे जे सुंदर दिसत होते त्यांना टिपण्यात मग्न होता. माझ्या माकड उड्या सुरु होत्या. कधी नवर्यासोबत पुढे तर कधी लेकी बरोबर मागे. कधी नवर्याला सोबत तर कधी लेकीला. मज्जा आली. लहानपणी झाडावर चढुन एका फांदी वरुन दुसर्या फांदीवर उडी मारायचे त्याची आठवण झाली. पाच तास सलग गाडी चालवुन नवर्याला जरा कंटाळ आला होता, गाडीत पेट्रोल ही भरायचं होतं आणि आम्हालाही रेस्टरूम ला जायचं होतं. तसं एक छानसा पेट्रोल पंप बघुन आम्ही गाडी थांबवली. इथे शहराबाहेरचे पेट्रोल पंप खुपच देखणे असतात. निसर्गरम्य ठिकाणी बांधतात. आणि तिथेच सगळ्या सोयी सुविधा असतात. स्वच्छ आणि प्रशस्त रेस्टरूम्स, एक छोटसं स्टोअर आणि छोटेखानी पण अतिशय स्वच्छ आणि बर्यापैकी पदार्थ असलेले उपहारगृह. आणि बरेच ठिकाणी बाहेर बाकडी टाकलेली असतात.
एकदम ढाब्याचा फील येतो. प्रदुषण मुक्त गार झुळकांत उन्हाची ऊब घेत आणि वाफळत्या कॉफिचे घोट रिचवण्यात वेगळिच मजा येते. या पेट्रोल पंपावर आम्ही साधारण तासभर घालवला. मस्त मजा आली. उपहारगृहातील पीटर ने तर अफलातुन कॉफी बनवली होती. छान तरतरीत होउन आम्ही पुढे निघालो.
यथावकाश 722 किमी अंतर 9 तासात पुर्ण करुन संध्याकाळी 6 वाजता आम्ही सेंट पिटर्सबर्गमधिल आमचे वास्तव्य असणार्या हॉटेल ला जाउन पोचलो. नवर्याचा खुप जवळचा एक मित्र सुद्धा ऑफिस च्या कामानिमित्त तिथेच राहायला होता. आम्ही 3 वर्षांनी भेटत होतो. मग काय त्या संध्याकाळी आम्ही धमाल केली. रात्री तंदुरी नाईट्स ला भारतीय जेवण जेवलो ( जेवण ठिकठाकच होतं पण अनेक दिवसांनी बाहेर भारतीय जेवण जेवलो त्याचच अप्रुप ) आणि दुसर्या दिवशीची आखणी करण्यात कधीच मध्यरात्र झाली.
खरचं शिर्षका सारखचं होतं ते सगळं अगदी. चित्रवत, अद्भुत आणि निसर्गरम्य...
स्कॅंडिनेविया च्या ट्रिप ला जायचे असे बरेच दिवसापासुन नवर्याच्या डोक्यात घोळत होते. आणि मुळातच भटकायला आवडणारी मी त्याच्या विचाराला जमेल तसे खतपाणि घालत होते :). तर तिथे जायला हवं ते उन्हाळ्यातच. पण सुरुवातच झाली ती सुट्टी मिळेल की नाही ह्या शंकेने. नवर्याच्या ऑफिस मधे एकाची बदली ड्यु होती. आणि त्याच्या जागी नवा माणुस यायचा होता. त्या दोघांची ऑफिशियल जबाबदारी नवर्याची असल्यामुळे त्याला सुट्टी मिळायची सुतराम शक्यता नव्हती. पण हे बदली प्रकरण विमानाची तिकिटे न मिळाल्यामुळे पुढे ढकलले गेले आणि आम्हाला ट्रिप प्लॅन करायला उत्साह आला. थोडिफार माहिती काढुन ठेवली आणि व्हिसा साठी अप्लाय करणार त्याच दिवशी नवर्याच्या असिस्टंट ची गर्भार बायको थोडी गुंतागुंत झाल्यामुळे हॉस्पिटल मधे ऍड्मिट झाली. त्यामुळे ती जोवर पुर्ववत होत नाही तोवर व्हिसा साठी अप्लाय करायचं नाही असं आम्ही ठरवलं. त्यात काही दिवस गेलेत.
नंतर सगळं ठिक सुरु आहे बघुन आम्ही व्हिसा साठी अप्लाय केला. पण व्हिसा मिळाला आणि त्याच्या दुसर्याच दिवशी ऑफिस च्या कामाने तातडिने नवर्याला बाहेरगावी जावे लागले. काम ठरलेल्या वेळेत संपले तर ठिक नाही तर अनिश्चित कालावधी साठी नवर्याला तेथे रहावे लागणार होते. पण तिसर्याच दिवशी नवरा परत आला आणि आम्ही लगेच दोन दिवसाने जाण्याचे ठरवले. आता एवढ्या वेळेवर आम्हाला रहायला जागा मिळेना त्यामुळे आम्हाला आमच्या प्लॅन मधे फेरफार करावे लागले. कोपेनहेगन ला जाण्याचे रद्द केले आणि बाकिची ट्रीप रिशेड्युल केली. आम्ही कारनेच जाणार होतो त्यामुळे बाकी तिकिट बुकिंग चा प्रश्न नव्हता. त्यामुळे शेवटी जायला मिळेल की नाही हा बरेच दिवस सुरु असलेला गोंधळ एकदाचा संपला आणि आम्ही 23 जुलैला सकाळी प्रयाण केले. मॉस्को - सेंट पीटर्सबर्ग - हेलसिंकी - स्टॉकहोम - ग्योतेबर्ग - ओस्लो - वॉस - स्टॉकहोम - हेलसिंकी - सेंट पीटर्सबर्ग - मॉस्को असा एकुण प्रवास जवळपास 4,500 किमी होता.
सगळा प्रवास छान झाला आणि छोटीने पण त्रास दिला नाही. मस्त मजा आली. खुप फिरलो, खुप फोटो काढले, पायाचे तुकडे पडेपर्यंत चाललो आणि मस्त तुडुंब खाल्लं सुद्धा. कालच आम्ही परत आलो. पुढिल लेखांमधे आम्ही कुठे कुठे फिरलो, कुठले फोटो काढले, काय खाल्लं सगळं सविस्तर लिहीन. आता मात्र पाटी टाकते. खुप दमायला झालं आहे आणि अशक्य झोप येते आहे. तोपर्यंत तुम्ही स्कॅंडिनेविया ची माहिती इथे वाचु शकता.