जगण्याची ...
किती दिवस झालेत लिहुन.... बरेच महिने उलटले.... पण लीहिण्याची ऊर्मी अजुनही ताजी आहे.... क़ाय नाही मिळालं मला ह्या मधल्या दिवसात... मातृत्वाचं सुख, सहचरयाचा सहवास, समृद्ध करणारे वाचन आणि अनुभव आणि बाळाने नव्याने शिकवलेली सहनशिलता... हे सारे तुमच्यासोबत share करण्यासाठी मी परत आले आहे... आणि विशेष आभार मानते marathiblogs.net वर लिहिणारया सर्व bloggers चे ज्यांच्यामुळे मला परत लिहिण्याची स्फुर्ती मिळाली....( मधल्या काळात लिहीत नसले तरी नियमीत blogs वाचत होते. )
तर आजची पोस्ट आहे माझ्या बाळावर... बाळ कसली बघता बघता 18 महिन्यांची झाली माझी सोनुली... तिच्या जन्मापासुन आजपर्यंत दिवस कसे फु्लपाखरासारखे उडुन गेले कळले सुद्धा नाही.... तिचा पहिला स्पर्श, तिचा पहिला हुंकार, तिच्या जावळाचा सुवास, सारे काही काल घडल्यासारखे वाटते...
आणि आता तर तिच्यामागे पळता पळता नुसती दमछाक होते... कधी restroom मधे स्वयंपाकघरातील भांड्यांची भातुकली मांडलेली असते तर कधी नवीन कपड्यांचा wonder wipe झालेला असतो. कधी देवघरातील देवांना नवीन देवघर मिळतं आणि चपला जोडे सोफ्यावर विराजमान झालेले असतात तर कधी उशी ची sledge झालेली असते... किती खोड्या आणि किती नाटकं आणि परत मनवण्याची हातोटी एवढी की एक बोळकंभर निर्व्याज हसु सुद्धा पुरेसं ठरावं... असं हसुन हात समोर पसरुन स्वारी गळ्यात पडुन बिलगली की राग गेलाच म्हणुन समजा!!
हे सारं काही मी भरभरुन अनुभवते आहे.... कारण मला माहिती आहे की हे दिवस फुलपाखरी असतात रंगीबेरंगी पण पापणी लवायच्या आत भुर्र्कन उडुन जाणारे... आणि त्यांना आठवणिंच्या तंतुत बांधुन ठेवण्यासाठी सुरु असलेली माझी धडपड ...
टायची गाठ सैल करत आनंदने सोफ्यावर अंग टाकले आणि अनिता ने आणलेला पाण्याचा ग्लास तोंडाला लावला... आजही तो दमला होता आणि आजही त्याला घरी यायला उशीर झाला होता. अनिताला काही हे नवे नव्हते. सारखे येणारे foreign delegations, त्यांच्याशी होणारया meetings, contracts, कंपनीत सांभाळावी लागणारी वरिष्ठांची मर्जी, ह्यातच आनंदचा दिवस रात्र एक व्हायचा. हे सारे अनिता जाणुन होती...
तेव्हढ्यात अमेयचा रडण्याचा आवाज आला आणि अनिता भानावर आली. अमेयला गेले दोन दिवस बरं नव्हतं त्यामुळे त्याची सारखी किरकिर सुरु होती. ती लगेच त्याला शांत करायला गेली कारण आता आनंदला घरी आल्यावर peace of mind हवा असतो हे तिला माहिती होतं. अमेयच्या रडण्याने त्याची अजुन चिडचिड झाली असती... तिला पुढे स्वयंपाकघरातलं काम सुद्धा दिसत होतं.
अनिता सुद्धा आनंद प्रमाणेच उच्चशिक्षित होती. पण अमेयच्या जन्मानंतर तिने काही वर्षे नोकरी सोडुन अमेय कडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला... त्याच सुमारास आनंदला कंपनीत बढती मिळाली पण बढती बरोबरच त्याच्यावरची जबाबदारी देखिल वाढली... त्यामुळे आनंदला आता अनिता आणि अमेय साठी वेळ काढणे कठीण व्हायला लागले होते...
जेवणं आटोपली आणि मागचं आवरुन अनिता आपल्या खोलित आली... अपेक्षेप्रमाणे आनंद laptop वर काम करत होता... आज अनिता खुपच वैतागली होती तिला पण वाटायचं की आपण आनंद बरोबर चार घटका बोलावं रोजच्या आयुष्यातलं काही बाही बारिक सारीक share करावं पण आनंदला वेळच नसायचा... शेवटी अनिता कंटाळली आणि डोळ्यांवर आडवा हात ठेवुन झोपी गेली...
Laptop वर काम संपत आल्यावर आनंदने नेहेमीप्रमाणे mails check करायला सुरुवात केली... त्याची दुसरया दिवशीची foreign delegation सोबत असणारी meeting अचानक रद्द झाली होती. त्यामुळे त्याला दुपारनंतर चा वेळ मोकळाच होता. खुप दिवसांनी त्याला असा वेळ मिळणार होता. आणि त्याला एकदम लक्षात आले की किती दिवस त्याने अनिताशी मनसोक्त गप्पा मारल्या नव्हत्या... अमेयला प्रेमाने जवळ घेतले नव्हते की त्याच्याशी खेळला नव्हता... त्या तिघांनी एकत्र असा वेळच घालवला नव्हता. घरचं, बाहेरचं आणि अमेयचं करताना अनिताची होणारी तारांबळ त्याने पाहिली होती. आता झोपेतही तिचा चेहरा त्याला ओढलेला आणि थकलेला दिसत होता. आनंदला फारच अपराधी वाटू लागलं. त्याने मग ठरवलच की काही झालं तरिही आता उद्यापासुन चार दिवस रजा घ्यायची आणि मस्त बाहेर कुठेतरी फिरून यावं. अनितालाही तेव्हढाच बदल आणि आपण तिघे सोबत असु. हा विचार मनात आल्याबरोबर आनंदचा थकवा कुठल्याकुठे पळाला आणि त्याने हलकेच अनिताच्या चेहेरयावरची बट बाजुला सारली. त्याला उगाचच वाटु लागले की अनिताही झोपेत हळुच आपल्याकडे बघुन हसतेय...
येता एकेक आठवण
जागे होती मृत क्षण
ताकदीने विलक्षण
प्रसन्न तर कधी सुन्न !
कधी कुणाचे ते बोल
कधी कुणाचा चेहरा
कधी कस्तुरी सुगंध
कधी मोराचा पिसारा !
आभासावर भास
खोल खोल जाई श्वास
मृगजळाची ही कास
जीव घेणारच खास !
काय होई ते नकळे
जसे जीवा लागे पिसे
सत्य आणि असत्यातील
कसे अंतर मिटले !
काहितरी करा
कोणितरी हे थांबवा
मनाचिये रोग
कोणि करेल का बरा?
आटपाट नगरात कोणी एक डोंबारी होता. घरी अठराविश्वे दारिद्र्य आणि त्यात बायको आणि तीन कच्याबच्यांची जबाबदारी... दिवसभर उन्हातान्हात, पावसापाण्यात तो डोंबारयाचा खेळ करत वणवण करायचा आणि लोकांचं मनोरंजन करुन मिळतील ते चार पैसे कमवायचा... संध्याकाळी घरी परतताना मिळाळेल्या चार पैश्यातून मिठ-मिर्ची घेउन तो जायचा तेव्हा कुठे घरात चुल पेटायची... दिवसभर राबल्यावर, संध्याकाळी बायको – पोरांसोबत ओलंसुकं खाताना त्याला परत माणसात आल्यासारखं वाटायचं आणि त्याचा डोंबारयाचा मुखवटा पार गळुन जायचा...